rajkiyalive

सांगा ‘सरकारांनी’ करायचं काय?

खासदारांच्या तासगाव-कवठेमहांकाळसाठी पुत्राच्या फिल्डिंगमुळे वितुष्टात भरच!

प्रथमेश गोंधळे
खासदार संजय पाटील यांनी लोकसभेच्या भाजप उमेदवारीवर दावा सांगितला आहेच. सोबत तासगाव-कवठेमहांकाळमधूनही पुत्र प्रभाकर यांच्या उमेदवारीच काय भावी आमदाराचीही घोषणा त्यांनी अन् कार्यकर्त्यांनी केलीय. त्यादृष्टीने मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. वास्तविक संजय पाटील यांनी खासदारकीची संधी साधून विधानसभेला मात्र दोनवेळा दगा दिल्याच्या भावनेने ज्येष्ठ नेते व प्रबळ दावेदार माजी मंत्री अजितराव घोरपडे (सरकार) यांच्याशी वितुष्ट आहे. आता तर पुत्रप्रेमापोटी उमेदवारीत गृहीतच न धरता त्यांच्या अशा भूमिकेमुळे वितुष्टात आणखी वाढ झाली आहेच. एवढेच नव्हे तर आता सरकारांनी करायचं काय, असा प्रश्न त्यांच्या समर्थकांतून उपस्थित केला जात आहे.
मोदी लाटेला बळ देण्याबरोबरच जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे नामोहरम करण्यासाठी सन 2014 मध्ये भाजपच्या कमळाला इनकमिंगचे खतपाणी देण्यात आले. यामध्ये संजय पाटील, अजितराव घोरपडे, माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार शिवाजीराव नाईक, पृथ्वीराज देशमुख, दिनकर पाटील आदींनी थेट भाजपप्रवेश करीत हात बळकट केले, तर आमदार अनिल बाबर यांनी महायुतीतील शिवसेनेचा मार्ग पत्करला. साहजिकच या सर्वांच्या बळावर संजय पाटील यांना लोकसभेची उमेदवारी आणि त्यातून काँग्रेसचा बालेकिल्ला नेस्तनाबूत करण्याची संधी मिळाली.

हेही वाचा

जयंत पाटील यांच्यापुढे प्रत्येकवेळी नवा उमेदवार

वारसा असूनही… न झालेले आमदार…

साहजिकच संजय पाटील यांच्याकडून जिल्ह्याचे सर्वसमावेशक नेतृत्व आणि सहकार्‍यांना विधानसभेला बळ मिळेल अशी अपेक्षा होती. सुरुवातीला त्यानुसार शिराळ्यातून शिवाजीराव नाईक, जतमधून विलासराव जगताप, खानापूर-आटपाडीतून अनिल बाबर यांना आमदारकीची संधी मिळाली. सोबतच सांगलीतून सुधीर गाडगीळ आमदार झाले, तर मिरजेतून विद्यमान पालकमंत्री सुरेश खाडे यांनाही दुसर्‍यांदा विजयश्री मिळविता आला. एकूणच एकमेका सहाय्य करू अन् मोदी लाटेवर आठपैकी सहाजण आमदार झाले. मात्र तासगाव-कवठेमहांकाळमधून माजी गृहमंत्री स्व.आर.आर. पाटील यांना चितपट करण्यात घोरपडेंना, तर पलूस-कडेगावमधून माजी मंत्री स्व.पतंगराव कदम यांना चितपट करण्यात पृथ्वीराज देशमुख यांना अपयश आले. यामध्ये बोटचेपी भूमिका घेतली आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विरोधकांना सहकार्य केल्याचे खापर खासदार संजय पाटील यांच्यावर आले होते. त्यानंतर बर्‍याच कारणांनी या सर्वांचेच खासदारांशी वितुष्ट वाढत गेले.
यात सर्वाधिक होरपळले ते घोरपडे सरकार. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर श्रीमती सुमनताई यांच्याविरोधात पोटनिवडणुकीत आणि पुन्हा 2019 च्या निवडणुकीतही घोरपडेंना पराभवाला समोर जावे लागले. यामध्येही संजय पाटील यांची अंडरस्टँडिग भूमिका कारणीभूत असल्याचा थेट आरोप करीत सरकारांनी भाजपश्रेष्ठींकडे तक्रारी केल्या आहेत. एकूणच या सर्वांमुळे खासदार विरुद्ध सरकार हा संघर्ष पक्षात राहूनही वाढतच राहिला आहे. आता तर घोरपडेंना गृहीतच न धरता संजय पाटील यांनी पुत्र प्रभारकरच हे तासगाव-कवठेमहांकाळचे भाजपचे उमेदवार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे घोरपडे आणि त्यांचा गट खासदारांविरोधात आक्रमक झाला आहे. घोरपडे समर्थकांनी प्रभाकर यांना उमेदवारी असेल तर आम्ही करायचं काय, असा संतप्त सवाल केला आहे. एवढेच नव्हे तर खासदारांच्या लोकसभा उमेदवारीलाच कात्री लावण्यात जी यंत्रणा सक्रिय आहे त्यातही घोरपडे यांनी उघड आघाडी घेतली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज