15 ऑगष्टच्या ग्रामसभेत पात्र लाभार्थींची निवड – तृप्ती धोडमिसे
जनप्रवास । प्रतिनिधी
सांगली : ग्रामीण भागातील इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) पात्र कुटुंबांसाठी मोदी आवास घरकुल योजना राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची निवड यादी 15 ऑगस्ट रोजीच्या ग्रामसभेत करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकरी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिल्या आहेत.
राज्य शासनाचे सर्वांसाठी घरे 2024 हे धोरण आहे.
त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणा-या पात्र लाभार्थ्याना सन 2024 पर्यंत स्वतःचे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील बेघरांना घरकूल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकूल योजना राबविण्यात येत आहेत. सन 2011च्या सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणात प्राधान्यक्रम यादीत ज्या कुटूंबांचा समावेश नव्हता, अशा पात्र कुटूंबासाठी आवास प्लस सर्वेक्षण करण्यात आले. मात्र या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या यादीत राज्यातील मोठ्या प्रमाणावर पात्र लाभार्थ्यांची नावे विविध कारणांमुळे अंतर्भुत होऊ शकली नाहीत. इतर मागास प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांसाठी कोणतीही योजना नव्हती. त्यामुळे सन 2023-24 या वर्षापासून महाराष्ट्र शासनाने इतर मागास प्रवर्गासाठी मोदी आवास घरकूल योजना सुरु केली आहे.
15 ऑगस्ट रोजीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी उपस्थित राहून मोदी आवास योजनेसाठी गरजू लाभार्थ्यांची नावे निश्चित करावीत, असे आवाहन मुख्य कार्यकरी अधिकारी धोडमिसे यांनी केले आहे.
हेही वाचा
जयंत पाटील यांच्यापुढे प्रत्येकवेळी नवा उमेदवार
मोदी आवाससाठी लाभार्थी निवडीचे निकष
आवास प्लसमधील प्रतिक्षा यादीत नाव असलेले लाभार्थी, आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतु रिजेक्ट झालेले पात्र लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गतच्या कायम स्वरूपी प्रतीक्षा यादीमध्ये समाविष्ठ नसलेले लाभार्थी, घरात कोणीही कमावता नाही अशा विधवा किंवा परितक्त्या महिला कुटूंब प्रमुख, पुरग्रस्त क्षेत्रामधील अथवा पिडीत लाभार्थी, जातीय दंगलीमुळे घराचे नुकसान झालेली व्यक्ती, नैसर्गिक आपत्ती बाधित व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती, इतर पात्र कुटुंबांना मोदी आवास योजनेचा लाभ मिळेल.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



