rajkiyalive

शेतकरी संघटना, अभावग्रस्तांचा प्रभाव

शिवराज काटकर, तरूण भारत
राजू शेट्टी यांच्या भाग्यात राज्यातील शेतकरी चळवळीचा निवडून आलेला खासदार होण्याचे यश लाभले. राष्ट्रीय पातळीवर ते चमकले. पण, त्यांच्याही संघटनेला आणि पक्षाला दुहीचा मोठा शाप लागला.
प्रत्येकाच्या सुवर्णका ळात संघटनेतीलच मंडळी त्यांच्या विरोधात होती.

प्रस्थापित फक्त मजा बघत होते. आजही बघत आहेत…. कदाचित डावपेच तोच असावा…. आभावग्रस्तांचा प्रभाव मोठा आहे. पण, अभाव त्याहून मोठा…. त्यामुळेच त्यांचा संघर्ष संपता संपत नाही….. हा संघर्ष शेट्टींना राष्ट्रीय नेता होऊ देत नाही इतर दोघांना स्थीर होऊ देत नाही* रघुनाथ दादा पाटील, सदाभाऊ खोत, आणि राजू शेट्टी प्रभावी शेतकरी नेत्यांमध्ये यांची गणना होते.

मात्र तरीसुद्धा आजच्या घडीला या तिघांची स्थिती काय आहे असा जेव्हा विचार मनात येतो, तेव्हा तिघांच्याही वाट्याचा संघर्ष संपलेला नाही हेच लक्षात येते. त्यातल्या त्यात सर्वात ज्येष्ठ म्हणून रघुनाथ दादा म्हणजे साक्षात शरद जोशींनी ज्यांना शेतकरी संघटना आणि ऊस आंदोलनाचे सरसेनापती म्हणून निवडले त्यांचा संघर्ष तर आजही सुरूच आहे. भारत राष्ट्र समितीच्या झेंड्याखाली आता त्यांनी नवी लढाई चालवली आहे.

*पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेची त्रिमूर्ती म्हणजे रघुनाथ दादा, सदाभाऊ आणि राजू शेट्टी. अर्थात त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ जयपाल अण्णा फराटे आज हयात नाहीत. संजय कोले यांनी नेमस्त पण आश्वासक पध्दतीने संघटनेची वाटचाल चालू ठेवली आहे. पण, नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जात आहे ती ही मंडळी स्वतःच चक्रव्यूहात अडकली आहेत. त्यांची धडपड डोळ्याला दिसते, यांचा प्रभाव मोठा आहे, पण, आपल्याच माणसांकडून चितपट होण्यात त्यांचा वेळ जातो आहे.

राजू शेट्टी विरोधकांची प्रागतिक आघाडी करण्यात गुंतले असताना त्यांना दुसऱ्या बाजूने अगतिक करण्याचाही प्रयत्न

जीवाभावाचे नेते सदाभाऊ खोत तुटले तसेच आता रविकांत तुपकर दुसऱ्यांदा सोडून जात आहेत. जाताना त्यांनी शेट्टी यांच्या संघटना आणि पक्षावरच दावा करण्यास सुरुवात केली आहे. राजू शेट्टी विरोधकांची प्रागतिक आघाडी करण्यात गुंतले असताना त्यांना दुसऱ्या बाजूने अगतिक करण्याचाही प्रयत्न होत आहे.

भाजपच्या सोबतीने गेलेल्या सदाभाऊ खोत यांना राज्याच्या मंत्रिमंडळात चांगले स्थान मिळाले. भाऊसाहेब फुंडकर यांच्यासारखा नेता कृषिमंत्री पदी लाभला, मात्र त्यांच्या आजारपणामुळे हे खाते सदाभाऊंना राज्यमंत्री असूनही एक हाती हाताळता आले. देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीत उतरून त्यांनी त्या काळात आपली कर्तबगारीही दाखवली. पण आज, सदाभाऊ या सगळ्यापासून दूर आहेत. दूध उत्पादकांसाठी निवेदन, बुलढाणाच्या पूरग्रस्तांना दिलासा देणारा दौरा असे त्यांचे दर्शन होते. पण चळवळीतली माणसं मैदानाबाहेर ढकलली जात आहेत आणि हट्टाने मैदानात येण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे हे लपून राहत नाही!

हेही वाचा

शेतकरी संघटनांना फुटीचा शाप

रघुनाथदादा पाटील बी.आर.एस. पक्षात

*दुहीचा शाप शरद जोशींनाही!*

यांना ओळखले जाते ते शेतकऱ्यांचा पंचप्राण म्हणून. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांनी अर्थशास्त्र शिकवले. तुमची लुबाडणूक होत आहे याची जाणीव करून दिली. सरकार नावाची व्यवस्था तुम्हाला मदतीचा हात देतो असे म्हणत असली तरी, प्रत्यक्षात ती तुमच्या हातात भिकेचा कटोरा देत आहे. हे आयुष्यभर ते लोकांना सांगत राहिले. भाषा साधी, सोपी, सरळ वापरून त्यांनी शेतकऱ्यांना जे सांगितले ते सुटा बुटातल्या भारतीय मध्यमवर्गाला आणि उच्चभ्रूवर्गाला कधी समजलेच नाही.

जोशी सुद्धा ज्यांच्यासाठी लढत होते आणि सोबतीला ज्यांना घेऊन लढत होते, ते सगळेच अभावग्रस्त होते. शेतकरी संघटनेच्या आंदोलनातून शरद जोशींच्या पदरी पडले काहीच नाही. उलट मोठ्या आर्थिक भुर्दंडाला सातत्याने सामोरे जावे लागले. संयुक्त राष्ट्रातील मोठ्या पदाची जबाबदारी सोडून आलेल्या या नेत्याला लाखोच्या समुदायाने वेड्यासारखे प्रेम दिले. पण ‘ मान सांगावा जगाला आणि अपमान सांगावा मनाला ‘ अशा पद्धतीची आर्थिक कुचंबना त्यांच्या वाट्याला आली. मात्र त्यांच्या नेतृत्वावर शंका घेणारे, त्यांना परदेशातून पैसा येतो वगैरे कंड्या कायम पिकवत राहिले. परिणामी जवळचीच मंडळी संशयग्रस्त बनली. त्यांनी जोशींभोवती कोंडाळे केले आणि एकमेका विरोधात कारवाया करत संघटनेला गुंतवून टाकले.

ऊस पट्ट्यातील शेतकऱ्यांचा आवाज म्हणून जोपर्यंत ते कडाडत नाहीत तोपर्यंत या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही.

आपण या ‘प्रिय नरकात’ जगतोय याची जाणीव स्वतः जोशी यांनाही होती. मात्र, ते ती परिस्थिती बदलू शकत नव्हते. जवळच्या नेत्यांना दूर करू शकत नव्हते.आज रघुनाथ दादा, राजू शेट्टी आणि सदाभाऊ सुद्धा याहून वेगळे जगत नाहीत. थोडे अर्थसक्षम आहेत इतकेच. आपण आपल्या हितासाठी प्रसंगी शरद जोशींची साथ सोडली आणि आपल्या पद्धतीचे राजकारण करताना मूळ विचारांना बगल दिली हे ते सुद्धा मान्य करत असतील. त्याचे फटके त्यांना वेळोवेळी बसलेही आहेत.

पण तरीसुद्धा या ऊस पट्ट्यातील शेतकऱ्यांचा आवाज म्हणून जोपर्यंत ते कडाडत नाहीत तोपर्यंत या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. ही इथली वस्तूस्थिती आहे. त्यांच्या भूमिका चुकत असतील, आपल्या एखाद्या भूमिकेने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे हे त्यांना माहिती असेल. पण, तरीसुद्धा वास्तवात टिकण्यासाठी त्यांना या तडजोडी मान्य कराव्या लागतात. कारण, अभाव!

हेही वाचा

1952 : पहिल्याच निवडणुकीत वसंतदादांची विधानसभेत एन्ट्री

1957 : नागनाथअण्णा, जी. डी. बापू विजयी

1962 : राजारामबापू मंत्रीमंडळात

2004 साली आमदार होताना शरद जोशींचे भाजपशी सख्य राजू शेट्टी यांना मान्य झाले नाही.

2004 साली आमदार होताना शरद जोशींचे भाजपशी सख्य राजू शेट्टी यांना मान्य झाले नाही. त्यांनी शेतकरी संघटनेला रामराम ठोकला आणि काँग्रेसशी जवळीक साधली. ती कोणाच्या लक्षात आली नाही कारण ऊस दराचे तीव्र आंदोलन! 2009 पर्यंत त्यांना सदाभाऊ ही येऊन भेटले. 2014मध्ये ते भाजपशी जोडले आणि पुढे परस्परांना भिडले. निवडणुकीत पडले. 2008 च्या दरम्यान रघुनाथदादांनी शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदावरून उचल घेतली आणि थेट शरद जोशींच्या विरोधात दंड थोपटले.

परभणी वगैरे भागात त्यांना चोख प्रतिउत्तर मिळाले आणि सांगलीतही फारशी साथ न लाभल्याने त्यांना जोशींना पुन्हा विठ्ठल मानावे लागले! आजपर्यंत दादांचा जनता दल डावे पक्ष, बसप, शिवसेना, आम आदमी पक्ष आणि बीआरएस असा प्रवास सुरूच आहे. शरद जोशींच्या पेक्षा वेगळा असा स्वतःचा अर्थवादही त्यांच्याजवळ आहे. प्रश्न मांडायची हातोटी आणि तळमळ ही त्यांची जमेची बाजू आणि म्हणूनच त्यांच्या प्रयोगाला थोडीफार साथही लाभते. भले भले त्यांना सोबत घेऊ इच्छितात. त्यांच्या निवडणुकीला उभे राहण्याने राजू शेट्टी निवडून येतात पण दादांना ते भाग्य लाभत नाही.

2009 ला लोकसभेला आपल्यापेक्षा कोणी विद्वान व्यक्ती आपल्या संघटनेतून खासदार व्हावा असे राजू शेट्टींना वाटायचे.

2009 ला लोकसभेला आपल्यापेक्षा कोणी विद्वान व्यक्ती आपल्या संघटनेतून खासदार व्हावा असे राजू शेट्टींना वाटायचे. त्यांनी एका नोकरशाहीच्या रंगाहून वेगळा रंग दाखवणाऱ्या आणि भारताची परदेशात प्रतिमा निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिरोळ मधून खासदारकीचे निमंत्रण दिले. मात्र त्या साहेबांच्या पत्नीला निवडून येण्याची खात्री हवी होती. ते देऊ न शकल्याने शेट्टींना स्वतः लढावे लागले. तो एक प्रवास आणि आज खासदारकीला साहेबच आणि आमदारकीला कोणीच नाही इथेपर्यंत त्यांच्या जवळच्या माणसांची वाटचाल झाली आहे. ती त्यांच्या राष्ट्रीय नेते होण्यास बाधक ठरली आहे.

त्यामुळेच आमच्या पक्षात या असे केजरीवाल अपमानजनक बोलावणे धाडत आहेत. सदाभाऊ मंत्री म्हणून फडणवीस यांना पडणाऱ्या अनेक प्रश्नावर एकच उपाय होते. आज सदाभाऊंवर भाजपमध्ये उपाय शोधला जातोय. भाजपमध्ये असा विचार असणारी माणसंही नाहीत. पण, त्यांच्या मागची मंत्रीपदाच्या वेळची गर्दी आता हटली आहे. सदाभाऊ त्या सगळ्याला मागे टाकून रेठरे धरणाच्या डोंगरात तपस्या करत आहेत….

एखादे आंदोलन पेटल्यानंतर हजारोंचा पाठिंबा सोबत राहतो. मात्र खटले चालवताना कार्यकर्ता एकाकी पडतो

शेतकरी संघटनेच्या आंदोलनात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे दुःख आहे ते म्हणजे, ज्या शेतकऱ्यांसाठी आम्ही अंगावर दरोड्याचे खटले घेतले, गुंडांच्या टोळ्यांपासून स्वतःला वाचवत आंदोलन जिवंत ठेवले, त्या शेतकऱ्यांनी आपल्याला म्हणावी तशी साथ पुढच्या काळात दिली नाही. एखादे आंदोलन पेटल्यानंतर हजारोंचा पाठिंबा सोबत राहतो. मात्र खटले चालवताना कार्यकर्ता एकाकी पडतो आणि तारखांना हजर राहून राहूनच वैतागून जातो. संघटनांना क्षीण करण्याचा डावपेच हा असा आहे.

मग त्यातून मार्ग काढत काढत हे कार्यकर्ते कारखानदारालाही खेळवायला लागतात. त्यांच्यातील दुहीचा फायदा घेतात आणि त्यांची बित्तंबातमी काढून त्यांना छळायला लागतात. कारखानदारांना आपले राजकारण जिवंत ठेवायचे असल्याने, आपला स्पर्धक असणारा त्या त्या जिल्ह्यातील व्यक्ती आणि कारखानदार दूर करण्यासाठी ते हवे ते करायला तयार असतात. त्यातून मग अभावग्रस्तांचे सुद्धा दिवस येतात…. नेहमी फाटक्या कपड्यात फिरणाऱ्यांच्यापैकी काहींच्या अंगावर जेव्हा चांगले नवे कपडे दिसू लागतात तेव्हा इतर साथीदारांना त्याचा आनंद होत नाही.

हेही वाचा

जयंत पाटील यांच्यापुढे प्रत्येकवेळी नवा उमेदवार

वारसा असूनही… न झालेले आमदार…

सांगा ‘सरकारांनी’ करायचं काय?

खेकड्याच्या वृत्तीने शेतकरी संघटनेच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची वाटचाल सुरू

आपल्याकडे असल्या कपड्याचा अभाव आहे आणि एकाला तो मिळाला आहे म्हटल्यानंतर इतर जण त्याच्या अंगावरील तो कपडा खेचायला लागतात. अगदी तशाच खेकड्याच्या वृत्तीने शेतकरी संघटनेच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची वाटचाल सुरू असते. अशाने कुणाच्याच अंगावर कापड राहत नाही. एकेकाळी नेते, कार्यकर्ते एकमेकाला समजून घ्यायचे. इतरांचे ज्येष्ठत्व मानायचे. आता ती स्थिती राहिलेली नाही. परिणामी प्रस्थापितांकडून एकमेकांवर शंका घेणारी माहिती पसरवली जाते. त्याचा बोलबाला होऊन अभावग्रस्तातील अधिक अभावग्रस्त दुसऱ्याच्या विरोधात कारस्थान करू लागतात. इतर त्याला साथ देतात आणि पुढे गेलेल्याला मागे खेचतात.

प्रत्येक संघटनेतील चुणचुणीत आणि प्रभावी माणसाला त्यातून दूर करायचे आणि त्याला स्वतःची संघटना काढायला लावायचे,

2014 नंतर या परिस्थितीत सुद्धा बदल होत आला आहे. प्रत्येक संघटनेतील चुणचुणीत आणि प्रभावी माणसाला त्यातून दूर करायचे आणि त्याला स्वतःची संघटना काढायला लावायचे, त्यासाठी त्याला सर्वतोपरी सहाय्य करायचे असे धोरण आखले जाते. एकत्रित प्रभावी कार्यकर्त्यांच्या संचातून असा एखादा बाजूला काढला जातो. आणि त्याला साथ दिली जाते. यामुळे इतर त्याच्या विरोधात कारवाई करतात आणि ते आपल्या विरोधात कारवाया करतात म्हणून दुसराही भांडण काढू लागतो. गेल्या काही वर्षातील शेतकरी संघटनांमधील भांडण हे अशाच स्वरूपाचे आहे. ज्यांनी त्यांना झुंजवले ते बाजूलाच आहेत. नेते आणि कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात बोलत आहेत. तरीही या सगळ्या झगडणाऱ्यांच्यासाठी लोकांचा जीव तुटतो. तो जनतेसाठी झटणारी ही गुणदोषांनी भरलेली मुठभर माणसंही संपली तर पुढे काय? म्हणूनच!

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज