rajkiyalive

दहा वर्षांत जिल्ह्यात नवीन काय?

परिवर्तनानंतरही ना मोठे प्रकल्प, ना योजना : कागदोपत्रीच घोषणांचा पाऊस; विकासाच्या वल्गना

 अमृत चौगुले, जनप्रवास 

शहरासह तालुकानिहाय परिस्थिती पाहता जिल्ह्याची अधोगतीच सुरू असल्याचे चित्र

केंद्र मोदी आणि राज्यात डबल-तिबल इंजिन सरकारचा 24 बाय 7 विकासाचा दावा केला जात आहे. परंतु दुर्दैवाने दोन टर्म (अडीच वर्ष महाविकास आघाडीचा वजा) कालावधी मोठा कालावधी मिळूनही दुर्दैवाने शहरात दाखवावा असा एकही नवी योजना, प्रकल्प आले नाहीत. ना ड्रायपोर्ट, ना आयटी पार्क; विकासाचे लक्ष वेधले जावे असे कामच झाले नाही. उद्योग-व्यवसायाची नव्याने उभारणी सोडाच, आहे तेही मोडित निघाले असून शहरासह तालुकानिहाय परिस्थिती पाहता जिल्ह्याची अधोगतीच सुरू असल्याचे चित्र आहे. कागदोपत्रीच घोषणांचा पाऊस आणि विकासाच्या वल्गना होताहेत. एकूणच मोदी असो वा ट्रिपल इंजिन सरकार सांगलीच्या विकासाचं घोडं अडलं कुठं, असा सवाल जनतेतून विचारला जात आहे.

हे प्रश्न वर्षानुवर्षे आ-वासून उभेच !
1) ना विमानतळाचा पत्ता; ना विकासाचे उड्डाण
2) ड्रायपोर्ट/ लॉजिस्टिक पार्क कागदोपत्रीच संशयाच्या भोवर्‍यात
3) ना बसपोर्ट, ना ट्रक टर्मिनस, वाहतुकीची कोंडी कायम
4) मिरज जंक्शन, सांगली रेल्वेस्थानक दुर्लक्षितच
5) नवीन एकही एमआयडीसी नाही, आहे त्यांची दुरवस्था
6) अन्न-फळे, भाजीपाला प्रक्रिया उद्योग नाही
7) आयटी पार्क, मोठ्या उद्योगाच्या निव्वळ चर्चाच
8) उच्च शिक्षणानंतरही नोकरीच्या संधीअभावी तरुण पिढी स्थलांतरीत

दुर्दैवाने सांगली जिल्हा अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत पिछाडीवर आहे हे मान्यच करावे लागेल.

प्रतिकूल वातावरण, मुबलक साधन सामग्रीसह कुशल मनुष्यबळ असूनही दुर्दैवाने सांगली जिल्हा अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत पिछाडीवर आहे हे मान्यच करावे लागेल. अर्थात विकासाभीमुख व्हिजन आणि इच्छाशक्तीचा अभाव हेच एकमेव त्याचे कारण आहे. अर्थात याला तत्कालिन नेतृत्वांवर ठपका ठेवणे कितपत योग्य-अयोग्य हा वादाचा विषय आहे. पण आतापर्यंत स्वातंत्र्यानंतर धरण, एमआयडीसीसह पायाभूत सुविधांची जी प्रगती झाली आहे ती मान्य करावी लागेल. पण 21 व्या शतकात गतीमान विकासाची जी भूक आहे ती मात्र अद्याप पूर्ण होऊ शकली नसल्याने महापालिका क्षेत्र आणि जिल्हा तसा पिछाडीवर राहिला आहे.

हेही वाचा

लोकसभेसाठी आले साडेपाच हजार मतदान यंत्रे

विकासाचे पूल ठरत आहेत महापुराला कारणीभूत

मोदी-फडणवीस सरकारच्या केंद्र, राज्यातील विकासाची गंगा सांगलीपर्यत पोहोचू शकली नाही

अर्थात या सर्वांचा विचार करून जसा देशात, महाराष्ट्रात बदल झाला तसा सांगली जिल्ह्यातही बदल होऊन भाजपला परिवर्तनरूपाने विकासाची क्षीतिजे कवेत घेण्यासाठी जनतेने दोन टर्म (सुमारे दहा वर्षांपैकी अडीच वर्षे महाविकास आघाडी) संधी दिली. पण दुर्दैवाने मोदी-फडणवीस सरकारच्या केंद्र, राज्यातील विकासाची गंगा सांगलीपर्यत पोहोचू शकली नाही. आता याला कारणीभूत कोण हा वादाचा विषय असला मुंबई, पुणे, नागपूर राहू द्या, सोलापूर, अमरावतीएवढाही विकासाचा वेग सांगली गाठू शकली नाही. एवढेच कशाला कोकणाचा विकास होतो तेवढाही सांगली जिल्ह्यात झालेला नाही. सिंधुदुर्गचे चिपी विमानतळ होते, मग सांगलीला अद्याप न होण्यामागे लोकप्रतिनिधींची उदासीनता आणि पाठपुराव्याचा अभाव हेच कारण आहे.

चांदोली धरण, वारणा नदी उशाला असूनही शिराळा डोंगरी भागातील अनेक गावात पाण्याचा प्रश्न कायम

पुणे-बंगलोर महामार्गाला संलग्न इस्लामपूर विकासाची गती गाठू शकले, पण दुर्दैवाने इस्लामपूरहून सांगलीकडे विकासाची गती रस्त्यांच्या खड्ड्यांतच अडकली आहे. महत्प्रयासाने आता हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाला आहे, पण तो कधी पूर्ण होईपर्यंत कुर्मगतीच राहणार आहे. चांदोली धरण, वारणा नदी उशाला असूनही शिराळा डोंगरी भागातील अनेक गावात पाण्याचा प्रश्न कायम आहे. दुसरीकडे कोणताही मोठा उद्योगधंदा नसल्याने विकास खुंटलेला आहे. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांची अवस्था तशीच आहे.

सांगली शहर व सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्राची तहानही पूर्ण भागू शकलेली नाही.

जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या सांगली शहर व सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्राची तहानही पूर्ण भागू शकलेली नाही. जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी एखादाही मोठा उद्योग उभारू शकला नाही. राज्यातील नामवंत वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयासह खासगी महाविद्यालयांतून मोठे टॅलेंट निर्माण होऊन ते देशच काय, विदेशातही मोठे संशोधन, विज्ञान, तंत्रज्ञानात अग्रेसर झाले आहे. सांगलीत संधी नसल्याने हे सर्व टॅलेंट अजूनही बाहेरच जात आहे. परिणामी सांगलीत एकही मोठा उद्योग निर्माण होऊ शकला नाही. त्याला इन्फ्रास्ट्रक्चर निर्मिती न होणे हे कारण आहे.

विमानतळ राहू द्या, साध्या एसटीसाठीही बसपोर्ट होऊ शकले नाही

विमानतळ राहू द्या, साध्या एसटीसाठीही बसपोर्ट होऊ शकले नाही. कर्नाटक, आंध्र, गुजरातसह दळणवळण अनेक राज्यांच्या वाहतुकीचे केंद्र असलेल्या सांगलीला ट्रक टर्मिनसचा पत्ता नाही. त्यामुळे विकासाचा खेळखंडोबा आहे. द्राक्ष, डाळिंब, अन्य शेती उत्पादनाबरोबरच साखर निर्मितीचे मोठे केंद्र असूनही त्याच्या वाहतुकीच्या सोयीअभावी मोठी गतीमान बाजारपेठ मिळू शकली नाही. दुसरीकडे वायनरी पार्कसह सर्वच प्रकारच्या फूड प्रोसेसचा उद्योग येथे निर्माण होऊ शकला नाही. एकूणच मोठमोठ्या कंपन्या आणि उद्योग सांगलीकडे वळले नाहीत.

आरोग्य पंढरी असलेल्या सांगली-मिरजेला याच कोंडीमुळे आता घरघर

महाराष्ट्र कर्नाटकासाठी आरोग्य पंढरी असलेल्या सांगली-मिरजेला याच कोंडीमुळे आता घरघर लागण्याची वेळ आली आहे. एवढेच काय, तर अन्य जिल्ह्यांमध्ये आता चांगले तंत्रज्ञान आणि आरोग्य सुविधांची पूर्तता झाल्याने येथील ओढा कमी होऊ लागला आहे. पूर्वीच्या नेतृत्वाने हे केले नसल्यामुळेच भाजपला संधी दिली होती. महाराष्ट्रात याचा विचार करून अन्य ठिकाणच्या नेतृत्वांनी मोठमोठे प्रकल्प आणले, आयटी, टेक्स्टाईल पार्कसह विविध प्रकल्प आणून विकासाला गती दिली. येथील नेतृत्वानेही या सर्वाचा विचार गेल्या दहा वर्षात होऊन त्यादृष्टीने या विकासाची कोंडी फोडणारा मास्टरप्लॅन राबवायला हवा होता. पण दुर्दैवाने त्यादृष्टीने खासदारांसह कोणत्याच आमदारांनी हे न केल्याने जिल्ह्याच्या विकासाचा रथ रुतून बसला आहे. मागे झाले नाही आता यापुढे तरी याची जबाबदारी ज्या नेतृत्वाच्या हाती आहे त्यांच्यात जागृती कधी होणार, विकासाला लागलेला गुणा हटणार असा प्रश्न अनुत्तरीत आहे.

कोल्हापूरचा आदर्श घ्यावा

सांगलीच्या तुलनेत दुर्दैवाने कोल्हापूरच्या नेतृत्वाला मोठी संधी कधी मिळाली नाही. तरीही कोल्हापूरच्या नेतृत्वाने विकासाच्या बाबतीत पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकदिलाने विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला आहे. शहरात रस्ते विकास असो वा विमानतळ, विद्यापीठ असो वा औद्योगिक विकास याबाबतीत लोकजागृती आणि लोकचळवळही तितक्याच ताकदीने उभारली गेली आहे जात आहे. त्यातून एकीचे बळ लोकप्रतिनिधींनाही विकासाबाबत जाब विचारणारे ठरले आहे. पण दुर्दैवाने त्याबाबतीत सांगलीतील लोकशक्तीचीही उदासीनता विकासाच्या कूर्मगतीला कारणीभूत आहे. किमान यापुढे तरी कोल्हापूरचा आदर्श घेऊन विकासासाठी संघटित शक्तीचा रेटा आवश्यक आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज