जनप्रवास । दिनेशकुमार ऐतवडे
गेल्या 22 वर्षापासून उसदरासाठी आंदोलन करणार्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी यंदाही जोरदार आंदोलन केले. उसदरासाठी आंदोलन करणे चुकीचे नाही पण त्याला राजकीय वास येत असला तर मात्र आंदोलनाची दिशा बिघडते असाच जणू प्रकार यंदा घडताना दिसत आहे. राजू शेट्टींचे आंदोलन योग्य होते, पण राजकारणाच्या नादात त्याची दिशा भरकटली असेच म्हणावे लागेल..
गतवर्षीच्या उसाला 400 रूपये आणि यंदा जाणार्या उसाला एफआरपी आणि शंभर रूपये एकरकमी मिळावे, अशी त्यांची मुख्य मागणी होती. संपूर्ण राज्यभर जर एकच मागणी असती तर त्याला चांगला जोर आला असता. वास्तविक सर्व कारखान्यांची एफआरपी एकसारखी असू शकत नाही. हंगाम संपल्यानंतर किती उस गाळप झाले, किती उतारा पडला, किती साखरेचे उत्पादन झाले यावर एफआरपी ठरली जाते. नदीकाठच्या उसाचा उतारा चांगला असता. त्यामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नदीकाठावर जी काही कारखाने आहेत त्यांना उतारा चांगला भेटतो आणि त्यांची एफआरपी आपसूकच जास्त निघते.
गेल्या चार वर्षापूर्वी एफआरपीप्रमाणे दर मिळालच पाहिजे ही संघटनेची मुख्य मागणी होती. त्याचा विचार करून सरकारने हा कायदा केला आणि प्रत्येक कारखान्याला एफआरपीप्रमाणे दर देणे बंधनकारक केले. आता सर्वच कारखाने आपला दर एफआरपीप्रमाणे देतात. परंतु ते एकरकमी देत नाहीत. ती एकरकमी मिळावी आणि त्यावर परत आणि शंभर रूपये मिळावेत अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची यंदा मागणी होती.
त्यासाठी राजू शेट्टी यांनी 22 दिवस पदयात्रा काढली. कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार आंदोलन केले, महामार्ग रोखला, काही कारखान्याचे गाळप बंद पाडले परंतु त्याचा म्हणावा तसा परिणाम कारखानदारांवर झाला नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील काही कारखान्यांनी त्यांची मागणी मान्य केलीही परंतु अजून बर्याच बड्या कारखान्यांनी आपले मौन सोडले नाही. 16 डिसेेंबरपर्यंत कारखानदार आणि संघटना यांच्यात बैठका सुरूच होत्या.
हेही वाचा
..तर लोकसभा निवडणूक लढविणार नाही.
शिरोळमधून स्वाभिमानीच्या आक्रोश यात्रेस उत्साहात प्रारंभ
लोकसभेसाठी शेट्टींची मशागत सुरू
आवाडेंशी दुश्मनी शेेट्टींच्या मुळावर
शेतकरी संघटना, अभावग्रस्तांचा प्रभाव
शेतकरी संघटनांना फुटीचा शाप
हातकणंगलेत महाआघाडीची भिस्त राजू शेट्टींवरच
यंदा ऊस खाणार भाव, 3500 रुपये शक्य
एकंदरीत राजू शेट्टी यांनी यंदा सुरूवातील कोल्हापूर जिल्ह्यातील पाच कारखान्यांना आपले टार्गेट केले होते. दत्त शिरोळ, जवाहर हुपरी, वारणा कारखाना, शरद कारखाना, राजारामबापू, दालमिया शुगर हे त्यांच्या हातकणंगले लोकसभा मतदार संघातील कारखाने. प्रकाश आवाडे, जयंत पाटील यांना तर त्यांनी सरळसरळ अंगावरच घेतले. वास्तविक जवाहर कारखाना आणि जयंत पाटील पाटील यांच्या सर्वच कारखान्यांनी आपले दर एफआरपीप्रमाणे दिले आहेतच. तरीही त्या कारखान्यांना टार्गेट केले जात आहे.
राजू शेट्टी यांनी ज्या ज्या कारखान्याविरोधात आंदोलन पुकारले त्यांनी गतवर्षी चांगला दर दिलेला आहेच. परंतु केवळ राजकारणामुळे स्वाभिमानीने त्यांना लक्ष्य केल्याचे दिसत होते. राजारामबापू पाटील कारखान्याच्या सर्वच युनिटने गेल्या वर्षी 3106 रूपये बिल दिले आहे. त्यांची तेवढीच एफआरपी होती. यंदा जाणार्या उसाला एफआरपी 3210 रूपये बसली आहे.
त्यामुळे यंदा कोणत्याही परिस्थितीत राजारामबापू पाटील कारखान्याला कायद्याने 3210 रूपये द्यावे लागणारच आहेत. परंतु कारखान्याने तो जर जाहीर करावा, आम्हाला लिहून द्यावा, अशी मागणी स्वाभिमानीची होती. परंतु त्याला दाद मिळाली नाही. आम्ही दर देणारच आहोत पण कोणी सांगितले म्हणून आम्ही दर देणार नाही, आम्हीही शेतकर्यांचे हित जोपासत आहोतच, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
जयंत पाटील हेच लक्ष्य…
जयंत पाटील यांना टार्गेट केल्यास संपूर्ण इस्लामपूर मतदार संघ तुमच्यामागे राहिल असा सल्ला राजू शेट्टी यांना कुणीतरी दिला. त्यांच्या सांगण्यावरून राजू शेट्टी यांनी थेट राजारामबापू कारखान्याच्या गव्हाणीपर्यंत मजल मारली. परंतु याचा उलटा परिणाम झाला. कारण राजारामबापू कारखान्याचे हजारो शेतकर्यांनी प्रांताना उलट निवेदन दिले. आम्हाला चांगला दर मिळतो, परंतु शेतकरी संघटनेच्या राजकारणामुळे आमची अडवणूक होत आहे, त्यांना रोखा असे निवेदन त्यांनी दिले. जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांची दुसरी आणि तिसरी पिढीही नाराज झाली. राजू शेट्टी यांच्याबद्दल पॉझिटिव्ह असणारेही निगेटीव्ह झाले.
लोकसभेला कोणती भूमिका घेणार ?
सध्या तरी एकला चलोरे अशी भूमिका राज्ाू शेट्टी यांनी घेतली आहे. परंतु इंडिया आघाडी अजूनही त्यांच्याबद्दल आशावादी आहे. भाजपबरोबर एकास एक लढत देण्यासाठी राजू शेट्टी यांच्यासाठी हातकणंगले राखीव ठेवण्यात आले आहे. वंचितचे प्रकाश आंबेडकर हेही त्यांच्यासाठी प्रयत्नशील आहेत. कोणत्याही परिस्थितीत भाजपने महाराष्ट्रात 45 प्लसचे टार्गेट ठेवले आहे. हातकणंगलेचाही त्यामध्ये समावेश आहे. हातकणंगलेमध्ये यंदा भाजपच्या चिन्हावरच उमेदवारी देण्यात येणार आहे. त्यामुळे विरोधक आत्तापासूनच साधव आहेत. त्यात राजू शेट्टींची भूमिका अद्याप स्पष्ट नाही.
त्यांनी जर एकला चलोरेची भूमिका घेतली तर त्यांना फार कष्ट घ्यावे लागणार आहेत. 2009 आणि 2024 मध्ये फार मोठा बदल झाला आहे. त्यामुळे त्यांना रणनिती आखताना तारेवरची कसरत करावी लागेल यात शंका नाही.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.