rajkiyalive

(sugarcane prise ) दत्त इंडिया 3041, दालमिया 3128 देणार

(sangli sugar factory ) अन्य कारखान्यांच्या निर्णयाकडे लक्ष

 जिल्ह्यात ऊसदराबाबत सुरु असलेला तिढा सोमवारी रात्री दत्त इंडिया तर मंगळवारी कोकरुडच्या दालमिया शुगरने सोडविला. दत्त इंडिया 3041 व दालमिया शुगरकडून 3128 रुपये एफआरपी अधिक 100 रुपये देण्याचे मान्य केले. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेला ऊस दराची कोंडी फुटल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरु असलेले आंदोलन मागे घेण्यात आले. परंतु उर्वरित कारखान्यांच्या निर्णयाकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान जिल्ह्यातील कारखानदारांची 16 डिसेंबरला जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.

 

 

जिल्ह्यातील कारखानदारांची ’व्हिडीओ कॉन्फरन्स’द्वारे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी बैठक घेतली होती. या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. यानंतर पुन्हा एक बैठक झाली. तीही अयशस्वी ठरली. यामुळे बैठकीला उपस्थित कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांसह प्रतिनिधींनी ’कोल्हापूर पॅटर्न’ला ठेंगा दाखविल्याचे स्पष्ट झाले. वसंतदादा साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविणार्‍या दत्त इंडिया कंपनीने दर जाहीर करावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी कारखान्यावर धडक मारली. त्यानंतर गेट तोडून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी अडवल्यामुळे झटापट झाली, आंदोलनस्थळी स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले.

सोमवारी रात्री साडेअकरा वाजता सांगलीतील दत्त इंडिया कंपनीच्या उपाध्यक्षांनी एफआरपी 3041 रुपये आणि 100 रुपये जादा असा प्रति टनाला दर देण्याचे मान्य केले आणि ऊसदराची कोंडी फोडली. तसे पत्र मिळताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपले आंदोलन मागे घेतले. सोमवारी सकाळी वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी शेट्टी यांची भेट घेऊन चर्चा केली, यावेळी पोपट मोरे, संदीप राजोबा, महेश खराडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दालमियाकडून 3128 रुपये मिळणार
शिराळा येथील दालमिया कारखान्यानेही (निनाईदेवी) ऊस दराची कोंडी फोडत ऊस दर जाहीर केला. ’स्वाभिमानी’च्या आंदोलनाला यश मिळाले आहे. दालमिया कारखान्याने 3 हजार 128 अधिक 100 रुपये देण्याचे मान्य केले आहे. माजी खा. राजू शेट्टी यांनी सोमवारी रात्री दालमिया शुगरचा काटा बंद आंदोलन करण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दालमिया शुगर कारखान्यावर कांटा बंद आंदोलन सुरू केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी कारखाना तीन तास बंद पाडला. पोलिस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांची झटपट झाली. काटा बंद आंदोलनामुळे राजु शेट्टी यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्यानंतर दालमिया शुगर कंपनीकडून एकरकमी एफआरपी देण्याचे मान्य केले.

 

 

यावेळी वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव, शिराळा तालुकाध्यक्ष देवेंद्र धस, मानसिंगराव पाटील, रविंद्र पाटील, शिवलिंग शेटे, प्रकाश पाटील, चंद्रकांत पाटील, शाहुवाडी तालुकाध्यक्ष सुरेश म्हामुटकर, सातारा जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, विजयकुमार थोरात, मनिष पाटील, अरविंद पाटील, शिवाजी पाटील, गुरुनाथ शिंदे आदी उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज