rajkiyalive

राजकीय आखाड्यातील पैलवान

 

सांगली जिल्ह्यातील राजकारणात यापूर्वी अनेक पैलवांनांनी सहभाग घेतला. परंतु राजकारणात अभूतपूर्व यश मिळवले ते केवळ कवठेपिरानचे हिंदकेसरी मारूती माने आणि सांगलीची बिजलीमल्ल संभाजी पवार यांनीच.

दिनेशकुमार ऐतवडे, सांगली

सांगली जिल्ह्यात यापूर्वीही काही पैलवानांनी राजकारणात आपले नशिब आजमावले

लोकसभेच्या निवडणुकांचे वेध सर्वांंनाच लागले आहेत. 2024 मध्ये जरी लोकसभा निवडुका असल्या तरी आत्तापासूनच काहींची तयारी सुरू झाली आहे. काँग्रेसकडून विशाल पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे तर भाजपकडून संजयकाका आणि पृथ्वीराज देशमुख यांचे नाव आघाडीवर आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनीही गेल्या आठवड्यात आपला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला आणि लोकसभेला आपणही इच्छुक असल्याचे त्यांनी सुचित केले आहे. पैलवानांना राजकारणाचे आकर्षण कायमचे आहे. सांगली जिल्ह्यात यापूर्वीही काही पैलवानांनी राजकारणात आपले नशिब आजमावले काहींना यश आले तर काहींना अपयश आले आहे. त्याचाच घेतलेला हा आढावा…
सांगली जिल्ह्यातील राजकारणात यापूर्वी अनेक पैलवांनांनी सहभाग घेतला. परंतु राजकारणात अभूतपूर्व यश मिळवले ते केवळ कवठेपिरानचे हिंदकेसरी मारूती माने आणि सांगलीची बिजलीमल्ल संभाजी पवार यांनीच.

हिंदकेसरी मारूती माने यांनी केवळ सांगली जिल्हा, महाराष्ट्र नव्हे तर देशातही आपले नाही केले.

कवठेपिरानसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या हिंदकेसरी मारूती माने यांनी केवळ सांगली जिल्हा, महाराष्ट्र नव्हे तर देशातही आपले नाही केले. जकार्तावीर आणि हिंदकेसरी असलेल्या मारूती मानेंनी केवळ कुस्त्यांचा आखाडाच गाजविला नाही तर राजकीय आखाड्यातही आपली चुणूक दाखवून दिली. स्व. वसंतदादा पाटील यांनी त्यांना राजकारणात आणले. दादांनी मारूती माने यांच्या पैलवानकीचा आणि त्यांच्या प्रसिध्दीचा पुरेपूर वापर करून घेतला. मारूती माने यांनी आपल्या राजकारणाची सुरूवात गावापासूनच केली. कवठेपिरान गावचे ते सलग 25 वर्षे सरपंच होते. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली. त्यानंतर झालेल्या पहिल्याच जिल्हा परिषद निवडणुकीत मारूती मानेंनी बाजी मारली. 1972 पर्यंत ते जिल्हा परिषद सदस्य होते. 1970 ते 80 पयंर्ंत ते सांगलीच्या वसंतदादा कारखान्यात संचालक आणि उपाध्यक्षपदी कार्यरत होते. 1985 साली पंतप्रधान असलेल्या राजीव गांधी यांनी मारूती मानेंना राज्यसभेत घेतले. दिल्लीतील एका रस्त्याला मारूती माने यांचे नाव आहे, यावरून मारूती माने दिल्लीपयर्ंत आब राखून होते हे दिसून येते.

हेही वाचा

भाजपकडून प्रादेशिक पक्षांचे निर्मुलन

फडणवीसांचा भाजप कधी संपून जाईल सांगता येणार नाही

गोपिनाथ मुंडे यांनी शब्द टाकला आणि हिंदकेसरी लोकसभेच्या आखाड्यात उतरले

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते सलग पाच वर्षे चेअरमनही होते. आयुष्याच्या उत्तरार्धात काँग्रेसच्या नेत्यांचे त्यांचे पटले नाही. गोपिनाथ मुंडे यांनी शब्द टाकला आणि हिंदकेसरी लोकसभेच्या आखाड्यात उतरले परंतु त्यात त्यांना यश आले नाही. मारूती मानेंनी गावच्या राजकारणात एवढी पकड मजबूत ठेवली होती की ते असेपर्यंत ग्रामपंचायत आणि सोसायटीची निवडणूक बिनविरोध होत होती.
त्यांच्या पश्चात त्यांचे पुतणे पै.भीमराव माने यांनी आपल्या राजकारणाची सुरूवात गावच्या सरपंचपदापासून केली. त्यानंतर त्यांनी एकदा कवठेपिरान जिल्हा परिषद मतदार संघातून राष्ट्रवादीकडून निवडून आले. सध्या ते कवठेपिरान ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत.

राजकारणात यशस्वी झालेले दुसरे पैलवान म्हणजे सांगलीचे आप्पा अर्थात बिजलीमल्ल पै. संभाजी पवार.

राजकारणात यशस्वी झालेले दुसरे पैलवान म्हणजे सांगलीचे आप्पा अर्थात बिजलीमल्ल पै. संभाजी पवार. आपल्या चपळाईने कुस्तीचा डाव मारणार्‍या आप्पांनी राजकारणातही भल्याभल्यांना माती चारली. स्व. राजारामबापुंचे कार्यकर्ते असणार्‍या संभाजी पवारांनी राजकाणाची सुरूवात शिवसेना या पक्षातर्फे केली. परंतु राज्यभर नाव झाले ते 1987 च्या विधानसभा पोटनिवडणुकीत. वसंतदादा पाटील यांची निवड राज्यस्थानच्या राज्यपालपदी झाली आणि सांगलीची जागा रिकामी झाली. या जागेवर पोटनिवडणूक लागली. सांगलीतून काँग्रेसची उमेदवारी दादांचे पुतणे विष्णुअण्णा पाटील यांना मिळाली. सर्व विरोध एकत्र येत पुलोदकडून संभाजी पवारांना जनता दलातून उमेदवारी मिळवून दिली. ही निवडणूक राज्यभर गाजली.

विधानसभा पोटनिवडणुकीत मिळालेले यश नशिबाने मिळाले नाही हे संभाजी पवारांनी दाखवून दिले.

या निवडणुकीसाठी शरद पवार, मृणाल गोरे, जॉर्ज फनार्र्ंडीस, मधू दंडवडे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आणि अभूतपूर्व यश मिळाले. दादा जिवंत असताना दादांची सांगली विरोधकांना मिळाली. दादांची जागा घेणारा असा कोणता पैलवान आहे, हे पाहण्यासाठी विधानसभेत सर्व आमदार संभाजी पवार आल्यानंतर उठून उभे राहिले होते. विधानसभा पोटनिवडणुकीत मिळालेले यश नशिबाने मिळाले नाही हे संभाजी पवारांनी पुढील चार निवडणुकीत विजय मिळवून दाखवून दिले.

संभाजी पवार, मिरजेचे शरद पाटील आणि अ‍ॅड. व्यंकाप्पा पत्की ही त्रिमुती राज्यात गाजली

1990 मध्ये पुन्हा एकदा विष्णुअण्णांचा पराभव केला. 1995 मध्ये प्रकाशबापू आणि मदन पाटील या दोघांना एकाचवेळी पराभूत केले. 1999 मध्ये मात्र त्यांना काँग्रेसच्या दिनकर पाटील यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर 2004 मध्येही मदन पाटील यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. 2009 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आणि मदन पाटील यांचा पुन्हा एकदा पराभव केला.
संभाजी पवार केवळ आमदारकीवर गप्प बसले नाहीत. जनता दलाने त्यांना प्रदेशाध्यक्ष केले. त्यांनी आपले सहकारी अ‍ॅड. व्यंकाप्पा पत्की यांनाही विधानपरिषदेवर घेतले. राज्यात सांगलीचे संभाजी पवार, मिरजेचे शरद पाटील आणि अ‍ॅड. व्यंकाप्पा पत्की ही त्रिमुती राज्यात गाजली होती.

नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजमध्ये प्रवेश

आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात संभाजी पवारांनी आंबेडकर स्टेडीयम येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर 2009 ची निवडणुक त्यांना जिंकता आली. परंतु 2014 च्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपची उमेदवारी संजयकाका पाटील यांना मिळाली आणि आप्पा नाराज झाले. त्यावेळी संजयकाका आप्पांचे विरोधक होते. त्यांना विचारात न घेता संजयकाका यांना उमेदवारी देण्यात आली. सांगलीत नरेंद्र मोदी सभेला आले तरीही संभाजी पवारांनी आपला ठेका सोडला नाही. संजयकाका विजयी झाले परंतु आप्पा भाजपपासून लांब गेले. त्यांचे पूत्र पै. पृथ्वीराज पवार शिवसेनेत दाखल झाले. त्यांनीही विधानसभेची निवडणूक लढवली परंतु त्यांना त्यात यश आले नाही.

सध्या पृथ्वीराज पवार भाजपमध्ये असले तरी विधानसभा त्यांना दूरच आहे.

सांगलीतील दुसरे पैलवान सध्या महाराष्ट्र कुस्ती महासंघाचे कार्याध्यक्ष असलेले हरिपूरचे नामदेवराव मोहिते यांनीही राजकारणात मोठ्या जिद्दीने काम केले. पुलोद ते काँग्रेस असा त्यांचा प्रवास राहिला परंतु राजकारणात म्हणावे तेवढे त्यांना यश मिळाले नाही. वसंतदादांचे कायमच विरोधक राहिलेल्या नामदेवराव मोहितेंनी अनेकवेळा विधानसभा लढवली परंतु त्यांना यश आले नाही. सध्या ते काँग्रेसमध्ये कुस्ती महासंघाचे कार्याध्यक्ष आहेत. येणार्‍या लोकसभा निवडणुकीची तयारी करीत असलेले डबल महाराष्ट्र पै.चंद्रहार पाटील यांनीही आपल्या राजकारणाची सुरूवात जिल्हा परिषदेपासून केली आहे. त्यांनाही लोकसभेचा आखाडा खुणावत आहे. त्यादृष्टींनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली आहे.

अनेक पैलवानांनी राजकारणात आपले नशीब आजमाउन पाहिले.

दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना भेटण्यास बोलाविले होेत. परंतु सध्याची राजकीय परिस्थिती बेभरवशाची असून, येणार्‍या काळात आपली भूमिका स्पष्ट करू असे सांगितले आहे. एकंदरीत राज्यात आणि जिल्ह्यात अनेक पैलवानांनी राजकारणात आपले नशीब आजमाउन पाहिले. काहींना यश आले तर काहींना अपयश आले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज