rajkiyalive

SANGLI CRIME : सांगलीत सेल्फीच्या नादात तरुण गेला वाहून

 

सांगली :

SANGLI CRIME : सांगलीत सेल्फीच्या नादात तरुण गेला वाहून : शहरातील कृष्णा नदीवरील बंधार्यावर मैत्रिणीसह सेल्फी काढताना पाय घसरून एक तरुण पाण्यात वाहून गेला. सदरची घटना रविवार दि. 07 जुलै रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. मोईन गौसपाक मोमीन (वय 24, रा. हनुमाननगर, सांगली) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलिस, जीवरक्षक टीम, महापालिकेच्या अग्निशमन दलाने धाव घेत शोधमोहीम सुरू केली. सायंकाळपर्यंत त्याचा नदीपात्रात शोध घेतला. पण त्याचा ठावठिकाणा लागू शकला नाही. आता उद्या सोमवारी पुन्हा शोधकार्य राबविले जाणार आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, मोईन मोमीन हा बॉक्सर प्रशिक्षक आहे. त्याचे वडील गौसपाक यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून तो आई-वडीलासह हनुमाननगरमध्ये राहतो. त्याला एक बहीण आहे. सध्या तो एका फर्टीलायझर कंपनीत कामाला असून बॉक्सरचे प्रशिक्षणही देत होता. रविवारी सकाळी तो मैत्रिणीसह कृष्णा नदीकाठावर गेला होता.

जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असल्याने कृष्णा नदी तुडूंब भरली आहे.

नदीतील बंधार्यावरून सांगलीवाडीच्या बाजूने तो मैत्रिणीसह चालत येत होता. मोबाईलवर सेल्फी घेताना मोईनचा तोल गेला. तो नदीपात्रात पडला. मोईल हा पट्टीचा पोहणारा आहे. तरीही पाण्याचा वेग अधिक असल्याने तो पाण्यासोबत वाहून गेला. त्याला पाण्याबाहेर येता आले नाही. मैत्रिणीने आरडाओरडा केला. काहींनी बंधार्‍याकडे धाव घेतली. तोपर्यंत मोईन दूरवर गेला होता.

मैत्रिणीने मोईनच्या घरी जाऊन घडलेला प्रकार सांगितला.

नातेवाईकांनी नदीकाठावर धाव घेतली. शहर पोलिसांनाही तरुण वाहून गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे पथकही कृष्णा नदीकाठी आले. आयुष्य हेल्पलाईन टीम, स्पेशल रेस्क्यु फोर्स, महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांना बोलविण्यात आले. त्यांनी बोटीतून मोईनचा शोध घेतला. पण सायंकाळपर्यंत त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता. अंधार झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. आता सोमवारी सकाळी पुन्हा शोधकार्य हाती घेतले जाणार आहे.

महिन्यापूर्वी साखरपुडा, ऑक्टोबरमध्ये विवाह…

मोईन मोमीन याचा महिन्यापूर्वीच साखरपुडा झाल्या असून ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात त्याचा विवाह होणार होता, असे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.

पोलिस म्हणतात, नोंद नाही..

मोईन हा सकाळी नदीपात्रात वाहून गेला. त्याच्या नातेवाईकांनी सायंकाळी शहर पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. तरीही ठाणे अंमलदार मात्र या घटनेची नोंद नसल्याचे सांगत होते. त्यामुळे पोलिसांच्या कार्यशैलीबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज