rajkiyalive

विकासाचे पूल ठरत आहेत महापुराला कारणीभूत

सांगलीत चार किलोमिटर अंतरावर सहा पुल: नाले गायब, अतिक्रमणे वाढली

 

जनप्रवास  सांगली 

कृष्णा नदीला सतत महापूर येत असताना नव्याने पूल उभारले जात आहेत. आयर्विन पूल, बायपास पूल व अंकली येथील दोन पूल पूर्वीपासून आहेत. आता नव्याने दोन पूल बांधले जात आहेत. आयर्विन पुल ते अंकली येथील पुलापर्यंत सहा पुल तयार होणार आहेत. यामुळे जलप्रवाहात मोठे अडथळे निर्माण होत आहे. शहराच्या विकासासाठी इतर शहरे, गावे जोडण्यासाठी कृष्णा नदीवर पूल उभारले जात आहेत. मात्र हेच पूल आता महापुराला कारणीभूत ठरत आहेत. याबरोबर पूर पट्टट्यातील बांधकामे व अतिक्रमणामुळे मुजलेले नाले देखील कारणीभूत आहेत.
कृष्णा व पंचगंगा नदीवर 2021 पर्यंत 22 पुल होते. मात्र गेल्या दोन वर्षात नव्याने आणखी पुलाची उभारणी झाली आहे. शहरातील दळणवळणासाठी पूल आवश्यक आहेत. मात्र त्यामुळे महापुराचा धोका अधिक होत असल्याचे देखील बोलले जात आहे. सध्या कृष्णा नदीवर सांगली-पुणे बायपास पूल, आयर्विन पूल, आयर्विनला नव्याने पर्यायी सुरू असलेला पूल, हरिपूर-कोथळी पूल व अंकली येथे दोन्ही मार्गावर असलेले दोन पूल असे सहा पुल चार किलोमिटरच्या अंतरावर उभारले आहेत. प्रत्येक पुलासाठी आठ ते दहा पिलर उभारले गेले आहेत. मोठे पूल असल्याने पिलर देखील मोठे आहेत. हे पिलर म्हणजे एक प्रकारे पाणी अडविणार्‍या भिंतीच आहेत. त्यामुळे जलप्रवाहात मोठे अडथळे निर्माण होत आहे.

हेही वाचा

सांगलीला पाच दिवस पूराचा धोका नाही

काही दिवसांपूर्वी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी पुलाबाबत नाराजी व्यक्त केली होती. कृष्णा व पंचगंगा या दोन्ही नद्यांना सतत महापूर येत असताना नव्याने पूल उभा करून जलप्रवाहात अडथळे निर्माण केले जात आहेत.मानव आणि निसर्गला जोडणारे नव्हे तर त्यांना तोडणारे हे पूल असल्याचा आरोप त्यांनी केला होता. शिवाय कृष्णा व पंचगंगा नदीच्या महापुराचा अभ्यास त्यांच्या समितीकडून झाला होता. केवळ एक अशासकीय संस्था म्हणून त्यांचा अहवाल शासनाने स्वीकारला नव्हता. यामुळे नव्याने होत असलेल्या पुलामुळे नदी प्रवाहात अडथळा निर्माण होणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. सरकारकडून आपत्ती रोखण्यास मदत होत नाही. उलट आपत्ती वाढविण्यास कारणीभूत असणारे निर्णय घेतले जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. चार किलोमिटरवर असलेले सहा पूल व सांगलीच्या बंधरार्‍यावर पाणी साठवण होत असल्याने नदीच्या पाणी पातळीत देखील झपाट्याने वाढ होत आहे. पाण्याचा प्रवाह नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे महापुरावेळी शहर व विस्तारीत भागात झपाट्याने पाणी घुसले होते.पाण्याचा प्रवास वेगाने होत नसल्याने शहरी व विस्तारीत भागात पाणी घुसत आहे. याला नदीवर बांधलेले पूल जबाबदार आहेत. शिवाय शहरातील नाल्यावर देखील मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी नाल्यावर अतिक्रमण करून नाले गायब केल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या महासभेत अनेकवेळा नाल्यावरील बांधकामांची चर्चा होते, पूर पट्ट्यात नव्याने बांधकाम करू नये, परवाने देऊ नये असे निर्णय होतात. मात्र अनेक ठिकाणी नगरसेवकांच्या आश्रयामुळे बांधकामे झाल्याचे चित्र आहे. नाल्यांचा नैसर्गिक प्रवास थांबल्याने पाणी शहरी भागात घुसत आहे. यासह नदीतील वाळू उपसा, ओढे, नाले यांच्यात भराव टाकून केले जाणारे रस्ते, नद्यांचे खोलीकरण या सर्व गोष्टी निसर्गचक्र घडविण्यास कारणीभूत ठरत आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज