rajkiyalive

सांगलीतील उमेदवारीचा घोळ संपला

नेत्यांची एकी; शक्तीप्रदर्शनाने गाडी रूळावर , लोकसभा व विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभव व पक्षात जिल्हा नेतृत्वावरून सुरू असलेली एकमेकांच्या जिरवाजिरवीला काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते कंटाळले होते. त्यामुळे अनेक जण पक्षापासून दुरावले होते. मात्र सर्वांना चुका कळाल्या आणि सर्वांनी सामुहिक नेतृत्व स्वीकारले आहे

 शरद पवळ, जनप्रवास

अशोक चव्हाण यांच्या दौर्‍याने कार्यकर्ते रिचार्ज

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचा मेळावा आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या दौर्‍याने कार्यकर्ते रिचार्ज झाली आहे. तर काँग्रेस नेत्यांच्या एकीमुळे कार्यकर्त्यांना देखील बळ आले आहे. तर लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा आता घोळ संपल्याचे चित्र आहे. सांगली जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांमध्ये प्रचंड गटबाजी आहे. ही गटबाजी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, महापालिका व पंचायत समित्यांच्या निवडणुकीमध्ये चांगलीच उफाळून येते. गेल्या जिल्हा परिषदेच्या पंचावार्षिक निवडणुकीत देखील हाच प्रकार झाला, त्यामुळे काँग्रेसला सत्तेपासून दूर रहावे लागते.

मिरजेची पंचायत समिती देखील काँग्रेसला गटबाजीमुळे गमवावी लागली होती.

आजपर्यंतच्या इतिहासात काँग्रेसच्या ताब्यात नोंद असलेली मिरजेची पंचायत समिती देखील काँग्रेसला गटबाजीमुळे गमवावी लागली होती. लोकसभा निवडणुकीवेळी देखील हाच प्रकार झाला. सांगलीची जागा काँग्रेसला मिळण्यासाठी वसंतदादा गटाकडून जोरदार प्रयत्न झाले होते. विशाल पाटील यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्याचा चंग बांधून तयारी सुरू केली होती. मात्र ऐनवेळी ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडून विशाल पाटील यांचे पंख छाटण्याचा प्रकार झाला होता. तरी देखील त्यांनी स्वाभिमानीच्या चिन्हावर निवडणूक लढवली. त्यांना यश आले नाही पण पहिल्या निवडणुकीत त्यांची चांगली मते घेतली होती.

हेही वाचा

राहुल गांधी यांच्या ‘कमबॅक’चा काँग्रेस अन् इंडियाला बुस्टरडोस

संजयकाका आमच्या पक्षात लक्ष घालण्यापेक्षा तुम्हाला तिकीट मिळते का बघा..

खानापूरची काँग्रेस कुणाच्याही दावणीला बांधणार नाही

विधानसभा निवडणुकीत देखील जयश्रीताई व  पृथ्वीराज पाटील यांच्यातील गटबाजी उफाळून आली.

त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील जयश्रीताई पाटील व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यातील गटबाजी उफाळून आली. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना निवडणुकीत उमेदवारी दिली. मात्र त्यांना पक्षातून आवश्यक तितके सहकार्य मिळाले नाही. त्याचा परिणाम त्यांना निसटता पराभव सहन करावा लागला. महापालिकेच्या निवडणुकीत देखील काँग्रेसच्या नेत्यांनी एकमेकांची जिरवाजिरवी केली. पक्षाच्या गटबाजीमुळे पक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक जण पक्षापासून दूर गेले तर काहींनी पक्षाशी संपर्क देखील तोडला. त्यामुळे गेल्या चार-पाच वर्षात काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपची ताकद वाढल्याचे चित्र आहे.

हेही वाचा

वारसा असूनही… न झालेले आमदार…

1952 : पहिल्याच निवडणुकीत वसंतदादांची विधानसभेत एन्ट्री

काँग्रेसच्या नेत्यांना उशीरा शहानपण सूचले आहे.

मात्र आता काँग्रेसच्या नेत्यांना उशीरा शहानपण सूचले आहे. जून महिन्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचा जाहीर सत्कार काँग्रेसच्यावतीने करण्यात आला. या वेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा देखील पार पडला. या मेळाव्यात काँग्रेस नेत्यांनी एकी करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसचे जिल्हा नेतृत्व आ.विश्वजीत कदमांना देण्यात आला. तर काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी यापुढे विश्वजीत कदमांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे जाहीर केले.

यापुढे होणार्‍या सर्व निवडणुकीत आ.विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या जातील

लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते एकत्र आल्याने कार्यकर्त्यांना देखील बळ मिळाले. दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगली जिल्हा दौरा केला होता. यावेळी त्यांनी सांगली, संजयनगर, कर्नाळ, कडेगाव, जत येथे विविध मेळावे देखील घेतले. या मेळाव्यात देखील काँग्रेसच्या नेत्यांनी एकी दाखविली. यापुढे होणार्‍या सर्व निवडणुकीत आ.विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या जातील, अशी घोषणा देखील नेत्यांनी केली होती. तर सर्वात वादात असलेला मुद्दा म्हणजे सांगली लोकसभा व विधानसभा कोण लढणार? हे देखील नेत्यांसमोर फिक्स झाले.

आ.विश्वजीत कदम यांनी लोकसभेसाठी विशाल पाटील उमेदवार असल्याचे जाहीर केल्याने वाद मिटला

सांगली लोकसभेसाठी विशाल पाटील गेल्या दोन वर्षांपासून फिल्डिंग लावत आहेत. मात्र अचानक डॉ.जितेश कदमांचे नाव पुढे आले होते. यामुळे पाटील यांच्या सुसाट गाडीला कदमांचे स्पीडब्रेकर आले होते. मात्र आ.विश्वजीत कदम यांनी लोकसभेसाठी विशाल पाटील उमेदवार असल्याचे जाहीर केल्याने वाद मिटला आहे. तर सांगली विधानसभेसाठी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्यात वाद होईल, अशी शक्यता होती. मात्र माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासमोरच पृथ्वीराज पाटील यांनी सांगली विधानसभेची उमेदवारी मागितली तर जयश्रीताई पाटील यांना विधानपरिषदेवर घेण्याची विनंती देखील केली आहे. अशोक चव्हाण यांनी देखील जिल्हा नेत्यांचे कौतुक केले. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसची गाडी रूळावर आल्याचे चित्र दिसत आहे. कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह आला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज