वसंतदादा कारखान्यात कार्यकर्ते घुसले, गेट तोडण्याचा प्रयत्न, पोलीस-कार्यकर्त्यांत झटापट
जनप्रवास । सांगली :
जिल्ह्यात ऊस दराचा तिढा सुटलेला नसल्याने रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक झाली. यंदा ऊसाला पहिली उचल एफआरपी अधिक 100 रूपये तसेच गतवर्षीचे 50 रुपये देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीने वसंतदादा कारखान्यावर (दत्त इंडिया) आंदोलन करण्यात आले. सकाळी आक्रमक कार्यकर्ते कारखान्यात घुसले. आंदोलनकर्त्यांनी कारखान्याच्या गेटही तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांना रोखले. त्यामुळे पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाल्याने तणाव निर्माण झाला होता. माजी खा. राजू शेट्टी यांनीही आंदोलकांसोबत ठिय्या मारत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्यावर सडकून टीका केली.
सांगली जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात ऊस दराचे आंदोलन सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग रोखल्यानंतर मागील वर्षाचे 100 रुपये आणि चालू वर्षाचे एफआरपी अधिक 100 रुपये असा फॉर्म्युला ठरला. तोच फॉर्म्युला जिल्ह्यातील कारखानदार स्वीकारण्याची मागणी करण्यात आली. परंतु कारखानदारांनी यंदाची पहिली उचल सरसकट 3 हजार 100 रुपये देणार असल्याचे जाहीर केले होते. स्वाभिमानीने कारखानदारांची मागणी धुडकावत 8 डिसेंबरची मुदत दिली होती, जिल्ह्यातील कारखानदार आणि प्रशासनाने स्वाभिमानीची मागणी बेदखल ठरविल्याने रविवारी सांगलीतील वसंतदादा चालवायला घेतलेल्या दत्त इंडिया कारखान्यावर धडक मारली. या पार्श्वभूमीवर कारखाना स्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
जिल्ह्यातील कारखानदारांनी कोल्हापूर जिल्ह्याचा फॉर्म्युला स्वीकारावा, अन्यथा माघार घेणार नसल्याची घोषणाबाजी करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रविवारी दुपारी चांगलेच आक्रमक झाले. ऊसाचे दाम मिळालेच पाहिजे, अशी मागणी करीत आंदोलनकर्ते कारखाना परिसरात घुसले. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र संतप्त झालेले संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, जिल्हा कार्याध्यक्ष संदिप राजोबा, बाबा सांद्रे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी गेटमधून आत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना रोखले.
स्वाभिमानी दत्त इंडियाचा काटा बंद पाडणार
संतप्त कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, त्यांनी पुन्हा गेटच्या दिशेने आगेकूच केली. गेटवर चढून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काही कार्यकर्त्यांनी गेट तोडण्याचाही यावेळी प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांना गेटपासून बाजुला करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु आक्रमक कार्यकर्त्यांनी पोलिसांचे ऐकून घेतले नाही. या कारणावरुन पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली. यावेळी कारखानदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही. तोपर्यंत कारखान्याच्या दारात ठिय्या आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा देण्यात आला. त्यामुळे कारखाना परिसरात वातावरण चांगलेच तणावाचे बनले होते.
जयंत पाटील, विश्वजीत कदम यांच्यावर हल्लाबोल
कारखाना व्यवस्थापनाने गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाचे 100 रुपये आणि चालू हंगामातील ऊसाला एफआरपी अधिे 100 रुपये अशी करुन पहिली उचल जाहीर केल्याशिवाय आम्ही उठणार नाही. काटीही सुरु होवू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानीचे माजी खा. राजू शेट्टी यांनी दिला. जिल्ह्यातील साखर कारखानदारांची टोळी तयार झाली असून त्याचे नेतृत्व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम करीत असल्याचा हल्लाबोलही शेट्टी यांनी केला.
या आंदोलनात संजय बेले, मनोहर पाटील, सागर पाटील, धन्यकुमार पाटील, विजय पाटील, अमोल कोले, संदीप पाटील यांच्यासह कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.