जिल्हाध्यक्षांचा तालुका नवी ओळख : राजकीयदृष्ट्या वाळवा तालुक्याचा दबदबा पहायला मिळत आहे.
सिध्दार्थ कांबळे
कृष्णा व वारणा नद्यांनी समृद्ध झालेल्या क्रांतिकारी वाळवा तालुका सांगली जिल्ह्यात नेहमीच वरचढ ठरला आहे. कृषी, सहकार, उद्योग, शिक्षण, सामाजिकसह राजकीय क्षेत्रातही वाळवा तालुका मोठ्या प्रमाणात नावारुपाला आला आहे. सद्यस्थितीत विविध पक्ष व संघटनांच्या जिल्हाध्यक्षांचा वाळवा तालुका अशी नवी ओळख तालुक्याला मिळाली आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उबाठा गट) यासह महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी वाळवा तालुक्यातील पदाधिकारी विराजमान आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्या सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्याचा दबदबा पहायला मिळत आहे.
निशिकांत पाटील भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी वर्णी
भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी इस्लामपूरचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष, भाजपाचे इस्लामपूर विधानसभा प्रमुख निशिकांत भोसले-पाटील यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा दोन महिन्यापासून सुरु होती. अखेरीस आठ दिवसापूर्वी निशिकांत पाटील भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागली. निशिकांत पाटील यांच्या जिल्हास्तरिय निवडीने प्रमुख राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यपदाचे वर्तुळ पुर्ण झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना जिल्हाप्रमुखपदाची धुरा आनंदराव पवार यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. शिवसेनेत राजकीय भूकंप झाला अन मोठी फूट पडली. त्यानंतर शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख म्हणून आनंदराव पवार यांचीच पुन्हा निवड करण्यात आली. शिवसेनेच्या फुटीनंतर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुखपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यासाठी तर्कवितर्क लढवले जात होते. अखेरीस वाळवा तालुक्यातील चिकुर्डे येथील माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत पाटील यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ पडली. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या जिल्हाप्रमुखपद मिळविण्याचा मान वाळवा तालुक्याला मिळाला आहे.
सुष्मिता जाधव यांनी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी महिलांमध्ये रुजवली
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या सुष्मिता जाधव यांनी वाळवा तालुकाध्यक्ष सांभाळताना राष्ट्रवादी ग्रामीण भागातील महिलांमध्ये रुजवली. पक्ष वाढविण्याची कामगिरी केली. त्याचेच फलित म्हणून जाधव यांना जिल्हाध्यक्षपदी बढती दिली आहे. रघुनाथदादा प्रणित शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी हणमंतराव पाटील अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. शेतकर्यांना विविध आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. विविध संघटनांचे जिल्हाध्यक्षही वाळवा तालुक्यातील
प्रमुख राजकीय पक्षांबरोबर विविध संघटनांच्या जिल्हाध्यक्षपदी वाळवा तालुक्यातील पदाधिकारी
सांगली जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांबरोबर विविध संघटनांच्या जिल्हाध्यक्षपदी वाळवा तालुक्यातील पदाधिकारी कार्यरत आहेत. यामध्ये दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष विकास बल्लाळ, डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष कबीर चव्हाण, संभाजी ब्रिगेड सामाजिकचे जिल्हाध्यक्ष उमेश शेवाळे, वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष सुमेध माने यांचा प्रामुख्याने समावेश होतो.
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.