rajkiyalive

वारसा असूनही… न झालेले आमदार…

 

दिनेशकुमार ऐतवडे,  सांगली

येणार्‍या वर्षात विधानसभा आणि लोकसभा दोन्ही निवडणुका होणार आहेत. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांना फार मोठा इतिहास आहे. जिल्ह्यातील अनेक घराणी आजतागायत राजकारणात टिकून आहेत, तर काही घराणी पात्रता असूनही आज राजकारणापासून दूर गेले आहेत. जिल्ह्यात वसंतदादा, राजारामबापू, शिवाजीराव देशमुख, गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्याबरोबरच राज्यातही आपल्या नावाची छाप सोडली. वारसा नसतानाही अनेकजण एका रात्रीत आमदार, खासदार झाले परंतु वारसा असूनही अनेकांना अजूनही विधानसभेची पायरी चढता आली आही.

राज्याच्या राजकारणाचा इतिहास सांगलीच्या दादा घराण्याशिवाय लिहिता येत नाही

राज्याच्या राजकारणाचा इतिहास सांगलीच्या दादा घराण्याशिवाय लिहिता येत नाही. राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री, राजस्थानचे राज्यपाल आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणिसपद सांभाळलेल्या वसंतदादांच्या पश्चात त्यांचे पूत्र प्रकाशबापू पाटील खासदार झाले पण विधानसभेच्या एका निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. प्रकाशबापूंचे चिरंजिव प्रतिक पाटील खासदार झाले, केंद्रीय राज्यमंत्री झाले. परंतु प्रकाशबापूंचे कनिष्ठ चिरंजिव आणि दादांचे नातू विशाल पाटील यांना मात्र अजूनही व्यासपिठ मिळाले नाही. लोकसभेला त्यांचा पराभव झाला. आजोबा मुख्यमंत्री, वडील खासदार, बंधू खासदार आणि केंद्रीय मंत्री असून अजूनही विशाल पाटील यांना राजकीय संघर्ष करावा लागत आहे.

डोंगरी विकासाचे शिल्पकार म्हण्ाून ओळखले जाणारे शिराळ्याचे नेते शिवाजीराव देशमुख

वसंतदादांचे सहकारी आणि डोंगरी विकासाचे शिल्पकार म्हण्ाून ओळखले जाणारे शिराळ्याचे नेते शिवाजीराव देशमुख यांनी चार वेळा विधानपरिषदेची आमदारकी भोगली, विधानपरिषदेचे सभापतीपद भोगले, कॅबीनेट मंत्रीपदही भोगले. परंतु त्यांचे चिरंजिव सत्यजित देशमुख यांना मात्र आमदारकीसाठी झगडावे लागत आहे. दोन, तीन वेळा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवलीही परंतु मानसिंगराव नाईक आणि शिवाजीराव नाईक यांच्यासमोर त्यांचा टिकाव लागला नाही. काँग्रेसमध्ये आपले भवितव्य नाही हे ओळखून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर सत्यजित देशमुख यांना विधानपरिषदेची संधी मिळाली होती. परंतु त्यांना तात्काळ निर्णय घेता आला नाही. नाहीतर आज सत्यजित देशमुख आज आमदार दिसले असते. जिल्ह्याचे नेते जयंत पाटील हे सत्यजित देशमुख यांचे साडू आहेत. परंतु विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकती ते सोबत कधीचे आले नाहीत. प्रत्येक वेळी एकमेकांच्या विरोधातच त्यांना रहावे लागले. याचा फटकाही सत्यजित देशमुख यांना बसला आहे.

संभाजी पवार स्वत: राज्यातील तिकीट फायनल करीत होते.

सांगलीच्या दादा घराण्याला टक्कर देवून चार वेळा विधानसभा गाजविणार्‍या संभाजीआप्पांना पाहण्यासाठी एकवेळा विधानसभेतील सर्व आमदार उठून उभे राहिले होते. संभाजी पवारांनी विष्णुअण्णांना दोन वेळा, मदन पाटील आणि प्रकाशबापू पाटील यांना एकवेळा पराभूत केले. परंतु त्यांच्या पश्चात त्यांचे पूत्र पृथ्वीराज पवारांना आमदारकी राखता आली नाही. पृथ्वीराज पवारांनी जनता दल सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला, तेथे तिकिट मिळवले. परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला. सध्या पृथ्वीराज पवार भाजपमध्ये आहेत. परंतु सांगलीत सुधीर गाडगीळ ठाण मांडून बसल्यामुळे पृथ्वीराज पवारांना तिकीट मागणेही अवघड होवून बसले आहे. विरोधात असताना संभाजी पवार स्वत: राज्यातील तिकीट फायनल करीत होते. आयुष्यभर संभाजी पवारांनी सत्ताधार्‍यांच्या विरोधात राजकारण केले. परंतु सध्या पृथ्वीराज पवार सत्ताधार्‍यांच्या बाजुने असल्याने त्यांना तोंड दाबून बुक्याचा मार सहन करावा लागत आहे.

हेही वाचा

जयंत पाटील यांच्यापुढे प्रत्येकवेळी नवा उमेदवार

संपूर्ण महाराष्ट्रात सहकाराचे गाढे अभ्यासक म्हणून ओळख असणार्‍या सांगलीचे गुलाबराव पाटील यांनी राज्यात आणि केंद्रात काँग्रेस पक्षात आपला जम बसविला होता. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून घेतले होते. गुलाबराव पाटील यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत अनेकवर्षे चेअरमन म्हणून काम केले. काही काळ ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. गुलाबराव पाटील यांना आयुष्यभर राजकीय संघर्ष करावा लागला. त्यांचे चिरंजिव पृथ्वीराज पाटील यांना अजूनही विधानभवनचे दरवाजे उघडले नाही. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांचा थोडक्या मताने पराभव स्वीकारावा लागला. पृथ्वीराज पवार यांनाही राजकीय संघर्ष करावा लागत आहे. यावेळी काँग्रेस नेत्या जयश्र्री पाटील यांनही सांगली विधानसभेवर दावा सांगितला आहे. त्यामुळे पृथ्वीराज पाटील यांना सुरूवातीला काँग्रेसच्या उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागणार आहे.
आटपाटी दुष्काळी तालुक्याचे नेते स्व. बाबासाहेब देशमुख यांचे चिरंजिव राजेंद्रअण्णा यांना आमदारकीचे एकदा लॉटरी लागली. परंतु त्यांचे बंधू अमरसिंह देशमुख यांना मात्र पराभव स्वीकारावा लागला. तसेच मिरजेचे नेते स्व. मोहनराव शिंदे यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी आणि त्यांचे पूत्र मनोज शिंदे दोघांनाही विधानसभेला पराभव पत्करावा लागला. त्यांनाही आमदारकीचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. जिल्ह्याचे नेते त्यांचे दाजी जयंत पाटील असूनही त्यांना अजूनही राजकारणात संघर्ष करावा लागत आहे.
वाळव्याचे नेते स्वा. सै. नागनाथअण्णा नायकवडी यांनीही स्वातंत्र्यपूर्व काळात आपली वेगळी छाप पाडली होती. स्वातंत्र्यानंतर त्यांनीही एकदा आमदारकी भोगली होती. वाळवा तालुक्यात जयंत पाटील यांच्या विरोधात त्यांनी सहकाराचे मोठे जाळे विणले. परंतु त्यांच्या पश्चात त्यांच्या पश्चात वैभव नायकवडी आणि गौरव नायकवडी दोघांनीही विधानसभा लढवली परंतु त्यांना त्यात यश आले नाही.
एकंदरीत मोठा राजकीय वारसा असूनही जिल्ह्यातील काही मातब्बर घराण्यांना अजूनही विधानसभेचे स्वप्न सत्यात उतरवता आले काही हे वास्तव आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज