वारणा उद्भव योजनेचा प्रस्ताव आठ दिवसात पाठवण्यात येईल असे आयुक्त सांगत असताना या योजनेचा अद्याप सर्व्हेच झाला नाही, अशी माहिती महापालिकेचेच कार्यकारी अभियंता सुनील पाटील देतात. यातली विसंगती पाहता आयुक्तांनीच याबाबत वस्तुनिष्ठ माहिती द्यावी, असे आवाहन नागरिक जागृती मंचच्यावतीने करण्यात आले आहे.
निमंत्रक सतीश साखळकर यांनी आज पत्रक प्रसिध्दीस देऊन लवकरच मंचच्यावतीने प्रस्तावित वारणा उद्भव योजनेविषयी नेमकी वस्तुस्थिती मांडणारा तज्ज्ञांचा अहवाल महापालिकेला सादर केला जाईल, असेही त्यांनी आज जाहीर केले.
महापलिका क्षेत्रासाठी पाणी चांदोलीतून की वारणा नदीतून याबाबत गेले आठवडाभर चर्चा सुरु आहे. नागरिक जागृती मंचच्यावतीने चांदोलीतून पाणी घ्यावे यासाठी तज्ज्ञांचे सादरीकरण केले. त्यानंतर दोन्ही ठिकाणांचे प्रस्ताव शासनाला पाठवावेत या महापालिकेच्या ठरावाची अंमलबजावणी करावी असा निर्णय झाला. त्याबाबत आयुक्तांना सर्वपक्षीय निवेदन देण्यात येणार आहे.
साखळकर म्हणाले,‘‘ निवेदन देण्यासाठी आम्ही महापालिकेकडे सध्याच्या वारणा उद्भव प्रस्तावाची माहिती मागितली असता अभियंता पाटील यांनी अद्याप सर्व्हेच झालेला नाही असे सांगितले. तसे असेल तर गंभीर आहे. कारण खुद्द आयुक्तांनी पंधरवड्यात शासनाला प्रस्ताव सादर केला जाईल असे आंदोलकांना सांगितले आहे. आम्ही काल सांगलीवाडी हद्दीत जिथे इंटकवेल बांधली जाणार आहे त्या कोळकी मळा वारणा नदीकाठावरील भागात भेट दिली. हे ठिकाण एरवीच्या सर्वसाधारण पूरातही पाण्याखाली जाते. हरिपूर संगमापासून हे अंतर साधारण एक किलोमीटरच्या आतच आहे.
संगमापासून आतमध्ये सध्याही कृष्णा नदीचे पाणी वारणा नदीपात्रात मिसळते. आम्ही वारणा व कृष्णा नदीचे टोपोग्राफी नकाशे मिळवले आहेत. दोन्ही नद्यांची पाणी पातळी अभ्यासण्याची गरज लक्षात येते. म्हैसाळला नवीन बॅरेज झाले तर सांगली आणि दानोळी बंधार्यापर्यंत पाणी जाईल असे जलसंपदाचे अधिकारी सांगतात. या सार्याची दखल आयुक्त पवार यांनी घ्यावी. नेमकी वस्तुस्थिती नागरिकांसमोर मांडावी. आम्हीही तज्ज्ञांमार्फत याचा अहवाल तयार करीत असून तोही जनतेसमोर मांडला जाईल.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.