rajkiyalive

sangli vidhansabha news : सांगली विधानसभा काँग्रेस अंतर्गत संघर्ष भाजपच्या पथ्यावर

जातनिहाय मतांचे धुव्रीकरण, लाडक्या बहिणींनी गाडगीळांना तारले

sangli vidhansabha news : सांगली विधानसभा काँग्रेस अंतर्गत संघर्ष भाजपच्या पथ्यावर: सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवारीवरून निर्माण झालेला वाद आणि दादा घराण्याची बंडखोरी भाजपच्या पथ्यावर पडली. या शिवाय आ. सुधीर गाडगीळ यांनी केलेली विकासकामे, राज्य शासनाची लाडकी बहीण योजना व जातनिहाय झालेल्या मतांचे धुव्रीकरण यामुळे भाजपने पुन्हा सांगलीचा गड राखला. या निकालामुळे सांगली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

sangli vidhansabha news : सांगली विधानसभा काँग्रेस अंतर्गत संघर्ष भाजपच्या पथ्यावर

सांगली विधानसभा मतदारसंघ हा जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे. या मतदारसंघात गेल्या 38 वर्षात काँग्रेसचा फक्त एकवेळच विजय झाला आहे. इतरवेळाला मात्र भाजप, जनता दल व अपक्षाने बाजी मारली आहे. 2019 च्या निवडणुकीत आ. सुधीर गाडगीळ यांना भाजपने दुसर्‍यांदा उमेदवारी दिली होती. तर काँग्रेसकडून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली होती. यावेळी आ. सुधीर गाडगीळ यांनी पृथ्वीराज पाटील यांचा 6 हजार 939 मतांनी पराभव केला. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसला विजयाची आशा होती. पण काँग्रेस अंतर्गत असलेला संघर्ष हा पुन्हा उफाळून आला. 2019 च्या निवडणुकीत पृथ्वीराज पाटील 2024 च्या निवडणुकीत जयश्री पाटील यांना साथ देऊ, असा शब्द दिला असल्याचा दावा जयश्री पाटील गटाकडून करण्यात आला होता. त्यामुळे या निवडणुकीत जयश्री पाटील यांनी उमेदवारी मागितली होती. पण त्यांना पक्षाकडून उमेदवारी दिली गेली नाही.

काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे जयश्री पाटील समर्थक नाराज झाले. त्यांच्या समर्थकांनी बैठक घेत जयश्री पाटील यांनी अपक्ष अर्ज भरला आणि पक्षात बंडखोरी झाली. अनेक माजी नगरसेवक, काँग्रेसचे पदाधिकारी जयश्री पाटील यांच्यासोबत गेले. तर दुसरीकडे पृथ्वीराज पाटील यांच्याकडे आ. विश्वजीत कदम गटाबरोबर काँग्रेसच्या दुसर्‍या फळीतील कार्यकर्ते होते. तर राष्ट्रवादी काँगे्रेस शरद पवार पक्ष आघाडी धर्म म्हणून त्यांच्याबरोबर होता. 14 दिवसांच्या प्रचारात दोघांनी एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले. दोघांचा प्रचार देखील भरकटत चालला होता. दोघांनी एकत्रित येऊन निवडणूक लढवली असती तर चित्र देखील वेगळे असते. तर दुसरीकडे आ. सुधीर गाडगीळ यांनी मतदारसंघात केलेली कोट्यावधी रूपयांची कामे, राज्य शासनाची लाडकी बहिण योजना तळागाळात पोहचवली.

सांगली विधानसभा मतदारसंघात पुरूषांपेक्षा महिलांची संख्या अधिक आहे. झालेल्या मतदारसंघातील सुमारे 10 ते 15 टक्के महिलांनी लाडकी बहिण योजनेमुळे महायुतीला साथ दिली असल्याचे चित्र आहे. तसे बोलले देखील जात आहे. याबरोबर सांगली विधानसभा मतदारसंघातील नांद्रे, बिसूर, कर्नाळ, बामणोली, अंकलीसह अनेक ग्रामीण व शहरी भागात कोट्यावधी रूपयांची कामे आ. गाडगीळ यांनी केली आहे. त्यामुळे जनतेत त्यांच्याबद्दल सहानभूती होती. हाच प्रचार आ. गाडगीळ यांनी निवडणुकीत केला. तर दुसरीकडे पृथ्वीराज पाटील व जयश्री पाटील यांच्यामध्ये जाती-धर्माचे राजकारण रंगू लागले होते. हे दोन्ही पण उमेदवार मराठा समाजाचे होते. मराठा समाजाचा पाठिंबा कोणाला? यावरून शेवटचे दोन दिवस दोघांमधील वाद विकोपाला गेला होता.

सोशल मिडियावर एकमेकांविरोधात पोस्ट देखील शेअर केल्या होत्या. त्यामुळे ओबीसी समाजात चुकीचा संदेश गेला. समाजनिहाय मतांचे धुव्रीकरण झाले. त्याचा फटका काँग्रेसला देखील बसला आहे. आ. सुधीर गाडगीळ यांना ओबीसी समाजाची साथ मिळाली. 2019 मध्ये आ. सुधीर गाडगीळ यांना 93 हजार 636 मते मिळाली होती. तर पृथ्वीराज पाटील यांना 86 हजार 697 मते मिळाली होती. लोकसभेला काँग्रेस सहयोगी खा. विशाल पाटील यांना 1 लाख 5 हजार तर माजी खा. संजयकाका पाटील यांना 85 हजार मते मिळाली होती. आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे आ. सुधीर गाडगीळ यांनी 18 हजार 862 अधिकची मते घेत 1 लाख 12 लाख 498 मतांचे रेकॉर्डब्रेक केले आहे. तर पृथ्वीराज पाटील यांच्या मतात दहा हजाराची घट झाली आहे. या शिवाय आ. सुधीर गाडगीळ यांचा स्वच्छ चेहरा देखील त्यांच्या विजयाला कारणीभूत आहे.

हॅट्ट्रिक करणारे आ. सुधीर गाडगीळ तिसरे

सांगली विधानसभा मतदारसंघात हॅट्ट्रिक करणारे आ. सुधीर गाडगीळ हे तिसरे आमदार आहेत. यापूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांनी सन 1952, 1957 व 1962 साली हॅट्ट्रिक केली होती. त्यानंतर माजी आ. स्व. संभाजी पवार सन 1986, 1990 व 1995 साली सलग तीनवेळा विजय मिळवून हॅट्ट्रिक केली होती. तर आता आमदार सुधीर गाडगीळ यांनी 2014, 2019 व 2024 यांनी सलग तीन वेळा निवडणूक जिंकून हॅट्ट्रिक केली. यामुळे सांगली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. भविष्यात होणार्‍या महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला ही धोक्याची घंटा आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज