जनप्रवास । सांगली
SANGLI LOKSABHA : विशाल पाटलांचा ‘भाजप’ कनेक्शनशी नकार : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बुधवारच्या बैठकीत सांगली लोकसभेच्या जागेबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याने जागेबाबतचा तिढा वाढत चालला आहे. सांगली मतदारसंघ शिवसेनेला गेला असल्याची चर्चा बुधवारी सकाळी झाल्यानंतर काँग्रेसचे इच्छूक उमेदवार, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी भाजप नेत्यांची भेट घेतली असल्याच्या चर्चेला ऊत आला. पण विशाल पाटील यांनी स्पष्ट शब्दात या वृत्ताचा इन्कार केला. मात्र बुधवारी दिवसभर मतदारसंघ व उमेदवारांबाबत उलट-सुलट चर्चा सुरू होत्या.
SANGLI LOKSABHA : विशाल पाटलांचा ‘भाजप’ कनेक्शनशी नकार
महाविकास आघाडीत दिवसभर अफवांचे पेव
भाजपच्या अंतर्गत सर्वेमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघ धोक्यात दाखविल्याची चर्चा काही महिन्यांपूर्वी सुरू झाली.
त्यामुळे काँग्रेसला चांगले दिवस येणार असल्याच्या चर्चा पुढे आल्या. काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांनी देखील या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले. या मतदारसंघातून लोकसभेसाठी इच्छूक असलेले उमेदवार विशाल पाटील यांच्या बरोबर दोन-तीन बैठका घेतल्या. दोन महिन्यांपूर्वी त्यांना कामाला लागण्याच्या सूचना देखील प्रदेश पातळीवरून दिल्या. विशाल पाटील कामाला लागले. जनसंपर्क कार्यालय सुरू केले. काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप अंतर्गत नाराज असलेल्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यांच्या पत्नी पुजा पाटील यांनी मतदारसंघातील अनेक गावात खेळ पैठणीचा कार्यक्रम करत वातावरण निर्मिती केली.
काँग्रेसला मतदारसंघात चांगले वातावरण सुरू असताना कोल्हापूर व सांगली मतदारसंघाचा वाद महाविकास आघाडीत रंगला.
कोल्हापुरातून काँग्रेस पक्षाकडून शाहू महाराज लढणार राजी झाले. पण शिवसेना हा मतदारसंघ सोडण्यास तयार नाही. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली द्या, अशी मागणी शिवसेना (उबाठा) गटाने केली होती. त्यामुळे सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. मंगळवारी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी काँग्रेसच्या राज्य नेत्यांपुढे आक्रमक भूमीका मांडली. कोणत्याही परिस्थितीत सांगलीची जागा शिवसेनेला नको. नेत्यांनी देखील काँग्रेसच्या पदादिकार्यांना विश्वास दिला. पण बुधवारी सकाळी पुन्हा हा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिवसेनेला दिला असून चंद्रहार पाटील उमेदवार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
महाविकास आघाडीतील राज्यातील नेत्यांची बैठक मुंबईत झाली, या बैठकीत जागा वाटपाचा निर्णय अद्याप झाला नाही.
सांगली व कोल्हापूरच्या जागेबाबत काँग्रेस व शिवसेनेने अंतिम तोडगा देखील काढला नाही. त्यामुळे जागा वाटपाचे घोंगडे भिजतच राहिले. तर संजय राऊत यांनी काही माध्यमांशी बोलताना 2019 ला सांगलीची जागा काँग्रेसने लढली नव्हती, त्यांचा उमेदवार नव्हता. 2014 मध्येही काँग्रेसचा उमेदवार तिथे पडला आहे. दहा वर्षे तिथे काँग्रेस नाही त्यामुळे सांगलीची जागा काँग्रेस आहे असे म्हणताच येणार नाही, अशी प्रतिक्रिया दिल्याने पुन्हा काँग्रेसमध्ये टेंशन वाढवले.
अशातच काँग्रेसचे इच्छूक उमेदवार विशाल पाटील यांनी भाजपच्या नेत्यांची भेट घेतली असून ते सांगली लोकसभा भाजपकडून लढणार असल्याचे वृत्त धडकले. पण विशाल पाटील यांनी याचा इन्कार केला. मात्र बुधवारी दिवसभर हे वृत्त सुरूच होते. त्यामुळे सांगली लोकसभेच्या मतदारसंघात दिवसभर उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.
मी काँग्रेसचाच; भाजपशी संपर्क नाही: विशाल पाटील
सांगली लोकसभा मतदारसंघातून मी काँग्रेस पक्षाकडून इच्छूक आहे. पक्षाकडे उमेदवारीची मागणी देखील केली आहे. वसंतदादा घराण्याचा व सांगली जिल्ह्याचा इतिहास पाहता ही जागा काँग्रेसलाच मिळेल, असा मला विश्वास आहे, तशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले व इतर राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी तसेच आमचे नेते आ. विश्वजीत कदम यांनी दिली आहे. भाजपच्या किंवा अन्य कोणत्याही पक्षाच्या संपर्कात मी नाही अथवा मला भाजपसह कोणत्याही पक्षाने संपर्क साधलेला नाही. विनाकारण निवडणुकीच्या तोंडावर अफवा पसरवण्याचे काम सुरू आहे. मात्र यात काही तथ्य नसल्याचा खुलासा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी केला.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



