rajkiyalive

इस्लामपूरमध्ये शासन आपल्या दारी’चा बोजवारा’

जनप्रवास । सांंगली
इस्लामपूरमध्ये शासन आपल्या दारी’चा बोजवारा’ : दिल्ली बैठकीचे बोलावणे आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इस्लामपूरमध्ये शुक्रवारी झालेला ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम अवघ्या 34 मिनिटांत गुंडाळण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी आलेल्यांना ताटकळत बसावे लागल्यामुळे उपस्थितांमधून मुख्यमंत्री शिंदे यांच्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. येत्या लोकसभा निवडणुकीत याचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता जाणकारांतून व्यक्त केली जात आहे. लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व मदतीचे धनादेश स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर बोलावून अवघ्या तीन मिनिटांत औपचारिकता पूर्ण करण्यात आली, आणि या कार्यक्रमासाठी गेल्या आठ दिवसांपासून राबणार्‍या सरकारी यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला.

 

इस्लामपूरमध्ये शासन आपल्या दारी’चा बोजवारा’

अवघ्या 34 मिनिटात कार्यक्रम गुंडाळला : लोक आठ तास वेठीस : महायुतीबद्दल प्रचंड नाराजी

 

महायुतीच्या जागा वाटपात हातकणंगले मतदारसंघावर शिवसेनेने हक्क सांगत विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना रिंगणात उतरविण्याची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवार) मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत इस्लामपुरला ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी लाभार्थ्यांची गर्दी जमविण्यासाठी शासन यंत्रणा गेल्या आठ दिवसांपासून प्रयत्नशील होती. प्रशासकीय पातळीवरून लाभार्थ्यांना संपर्क साधून तुमच्यासाठी जाण्या-येण्यासाठी बसची सुविधा व जेवण यांची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगत जास्तीत जास्त गर्दी कशी होईल याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात आले होते. वाळवा, शिराळा या तालुक्यातील गावांमधून लाभार्थ्यांना नेण्यासाठी 269 बसेसची व्यवस्था करण्यात आली होती.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री सुरेश खाडे होते.

अध्यक्ष शेवटी बोलतात हा सभेचा प्रघात मोडून त्यांना पहिल्यांदा बोलण्यास सांगण्यात आले, तसे त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच सांगून हा प्रघात मोडल्याची कबुलीही दिली, तर खासदार माने यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करत असताना प्रचारकीचे भाषण करत काही अवधी घेतला. यानंतर एकूण 34 मिनिटांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी 22 मिनिटे भाषण करत आटोपते घेतले आणि तातडीने बैठकीसाठी दिल्लीला प्रस्थान केले.

शेतकर्‍याचा मुलगा मुख्यमंत्री असल्याचा अभिमान वाटतो,

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, बाळासाहेबांचे आचार-विचार अंगिकारून राज्यात सरकार स्थापन केले, शेतकर्‍याचा मुलगा मुख्यमंत्री असल्याचा अभिमान वाटतो, परंतू शेतकर्‍याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्याने अनेकांना पोटदुखी झाली आहे. मुख्यमंत्री असताना घरी बसून काम होत नाही. फेस टू फेस, फील्डवर उतरून लोकांमध्ये जावून काम केलं पाहिजे. विरोधकांकडे शिव्या, आरोप-प्रत्यारोप करण्याशिवाय काही उद्योग राहिलेला नाही. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांच्या आरोपाला आम्ही कामातून उत्तर देणार आहे. आणि त्यांना त्यांची जागा तुम्ही त्यांना दाखविणार आहात. सर्वसामान्य, गोरगरिब, शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, माता-भगिनी, तरुण, ज्येष्ठांना राज्यसरकारच्या योजना देण्यासाठी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सुरु केला आहे. गेल्या 10 महिन्यांमध्ये सुमारे साडेचार कोटी लाभार्थ्यांना शासन आपल्या दारीचा लाभ मिळाला. जिल्ह्यातील 35 लाख 65 हजार लाभार्थ्यांची नोंदणी झाल्याचे त्यांनी सांगितले.

माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमात व्यासपीठावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. यापुर्वीही कोल्हापूर येथील कार्यक्रमात महायुतीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आण्णासाहेब डांगे यांनी व्यासपीठावर उपस्थिती लावली होती. तर अजितदादांच्या सांगली दौर्‍यात त्यांनी भेट घेतली होती.

गर्दी दिसण्यासाठी वाळवा तालुक्यातून बसेस पाठवून लाभार्थ्यांना आणले
कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्र्यांनी अगोदर बोलून प्रघात मोडल्याचा दिला निर्वाळा
कार्यक्रमाचे निमित्त साधून धैर्यशील मानेंनी केले प्रचाराचे भाषण
वाट पाहून वैतागलेल्या ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज