rajkiyalive

SANGLI LOKSABHA : प्रकाश शेंडगे सांगलीतून लढणार

जनप्रवास । सांगली
राज्यात वंचित बहुजन आघाडी व ओबीसी बहुजन पार्टी यांची तिसरी आघाडी होण्याची शक्यता आहे. त्यानुसार ओबीसी बहुजन पार्टीचे नेते प्रकाश शेंडगे सांगली, हातकणंगलेसह राज्यातील 22 जागा लढणार आहेत. ते स्वत: सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवार असण्याची शक्यता आहे.

SANGLI LOKSABHA : प्रकाश शेंडगे सांगलीतून लढणार

वंचित व ओबीसी बहुजन पार्टीची होणार युती

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी असलेल्या विकास महाआघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सहभागी होणार होती. मात्र जागेची तडजोड फिसकटल्याने ‘वंचित’ महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रकाश शेंडगे व प्रकाश आंबेडकर यांच्या तीन बैठका झाल्या आहेत. राज्यात तिसरी आघाडी करण्याची शक्यता दोघांनी व्यक्त केली आहे. प्रकाश शेंडगे यांनी राज्यातील 22 जागांवर उमेदवार देण्याची तयारी केली आहे.

यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, बारामती, माढा, हातकणंगले, मावळ आणि सातारा तसेच मराठवाड्यातील बीड, नांदेड, हिंगोली, जालना, परभणी, धाराशिव उत्तर महाराष्ट्रातील शिर्डी, अहमदनगर विदर्भातील वर्धा, यवतमाळ-वाशिम कोकणातील ठाणे, रत्नागिरी मुंबईतील ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई या जागांचा समावेश आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातून स्वत: प्रकाश शेंडगे उमेदवार असणार आहे.

याबाबत बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले, महाविकास आघाडी व महायुती यांच्याविरोधात तिसरी आघाडी तयार केली जात आहे. महाराष्ट्राने ओबीसी मेळाव्यांच्या माध्यमातून ओबीसींची ताकद पाहिलेली आहे. राज्यातील ओबीसी, भटका विमुक्त समाज जागा झाला आहे. हा समाज फक्त निवडणुकीची वाट पाहतोय. त्यामुळे आम्हाला कोणीही कमी लेखू नये.

‘सांगली’चा आज अंतिम निर्णय

काँग्रेसची दिल्लीत तर सेनेची मुंबईत बैठक

सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून महाविकास आघाडीत सुरू असलेला वाद अद्याप मिटलेला नाही. काँग्रेस ही जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. या संदर्भात तोडगा काढण्यासाठी मंगळवारी दिल्लीत बैठक होणार आहे. दरम्यान, शिवसेना (उबाठा) गटाने सांगलीच्या जागेवरील दावा सोमवारी देखील कायम ठेवला. राज्यातील 19 उमेदवारांची यादी मंगळवारी जाहीर करणार आहेत. त्यामध्ये सांगलीचे नाव असेल काय? याकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे सांगलीसाठी मंगळवारचा दिवस महत्वाचा असणार आहे.

सांगली लोकसभेसाठी भाजपने विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना महायुतीची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये अद्याप उमेदवारीचा निर्णय झालेला नाही. कोल्हापूर शिवसेनेची जागा काँग्रेसला मिळाली असल्याने सांगलीची जागा शिवसेनेला दिली असल्याची चर्चा सुरू होती. त्यानुसार मिरजेत झालेल्या उध्दव ठाकरे व संजय राऊत यांच्या जनसंवाद सभेत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. यावर काँग्रेस नेते आक्रमक झाले होते. त्यांनी सांगलीची जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे.

विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी आ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष आ. विक्रमसिंह सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी प्रदेश व केंद्रीय पातळीवर नेत्यांची भेट घेतली आहे. तिढा अधिकच वाढत गेल्याने अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे व सोनिया गांधी यांनी सांगलीच्या जागेसंदर्भात मंगळवारी दिल्लीत बैठक घेतली आहे. या बैठकीत सांगलीच्या जागेचा निर्णय घेण्यात येणार आहे.

दरम्यान, शिवसेना (उबाठा) व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये राज्यातील जागा वाटपाची चर्चा झाली. यामध्ये शिवसेनेने 19 उमेदवारांची यादी निश्चित केली आहे. ही यादी मंगळवारी जाहीर करण्यात येणार आहे. या यादीमध्ये सांगलीतून चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा झाल्यास ते महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. त्यामुळे मंगळवारचा दिवस सांगलीसाठी महत्वाचा असणार आहे.

 

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज