जनप्रवास । सांगली
सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीत काँग्रेस व शिवसेना (उबाठा) मध्ये प्रचंड ताणाताणी सुरू आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र काँग्रेसमध्ये अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यालयासमोर शांतता पसरली आहे. तर दुसरीकडे मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी शिवसेनेला मिळणार की काँग्रेसला? याकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे कार्यालयात अजून तरी सन्नाटाच आहे.
SANGLI LOKSABHA जिल्हा कार्यालय नसलेल्या सेनेला उमेदवारी काँग्रेस, राष्ट्रवादी कार्यालयात सन्नाटा
सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजपने खा. संजयकाका पाटील यांना उमेदवारी देऊन कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. ते कामाला देखील लागले आहेत. मात्र महाविकास आघाडीत उमेदवारीवरून अद्याप घोळच सुरू आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट हे तीन पक्ष आहेत. तिन्ही पक्षांनी राज्यात एकत्रित येत आघाडी करून 48 जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सांगली, भिवंडी व मुंबईतील जागेवरून तिन्ही पक्षात मतभेद सुरू आहेत. तरी देखील सांगली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे काँग्रेसने प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांना सांगलीतून उमेदवारी देखील जाहीर केली. हे जाहीर करताना काँग्रेस अथवा राष्ट्रवादीला शिवसेनेने विश्वासात घेतले नाही. शिवाय जिल्ह्यात देखील काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हा कार्यालय देखील नाही. तरी देखील शिवसेनेने जागा घेतली आहे. शिवसेनेचा जिल्ह्यात एकही आमदार नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य देखील नाही. जिल्ह्यातील सहाशे ग्रामपंचायतीपैकी दहा टक्के ग्रामपंचायती देखील शिवसेनेकडे नाहीत, असा आरोप देखील काँग्रेसचे नेते आ. विश्वजीत कदम यांनी केला होता. त्यामुळे शिवसेनेला सांगली लोकसभा मतदारसंघातून कोणत्या मेरिटनुसार उमेदवारी दिली असे सवाल उपस्थित केले जात आहेत.
तर दुसरीकडे सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखतात, या दहा वर्षात या ठिकाणी मोदी लाटेत भाजपचा विजय झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसला जागा मिळावी, अशी अपेक्षा आहे. विशाल पाटील हे सक्षम उमेदवार देखील आहेत. पण त्यांच्या उमेदवारीचा निर्णय अद्याप काँग्रेसकडून झालेला दिसत नाही. त्यामुळे काँग्रेस कार्यालयासमोर कार्यकर्त्यांची गर्दी देखील होताना दिसत नाही. काँग्रेस शेजारी असलेल्या विशाल पाटील यांच्या संपर्क कार्यालयात थोडेसे कार्यकर्ते ये-जा करतात, पण त्यांचा एकच विषय असतो तो म्हणजे विशालदादांना काँग्रेसची उमेदवारी मिळणार की अपक्ष लढणार? मात्र प्रदेश व केंद्रीयस्तरावरून अद्याप कोणताच निर्णय झाला नसल्याने काँग्रेस कार्यालय ओस पडले आहे. कार्यकर्त्यांची गर्दी देखील होत नाही.
तर महाविकास आघाडीत घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी पक्षाचे लक्ष्य महाविकास आघाडीच्या उमेदवारीकडे लागले आहे. सांगलीच्या जागेवरून शिवसेना व काँंग्रेसमध्ये अद्याप वादच सुरू आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची ज्या दिवशी भूमीका जाहीर होईल, त्या दिवशी कार्यकर्ते बाहेर पडतील अशी चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यालयामध्ये सध्या तरी सन्नाटाच दिसून येत आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



