rajkiyalive

HATKANANGALE LOKSABHA : राजू शेट्टींच्या वाटेतील काटे संपता संपेणात

अजित पवार, जनप्रवास

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन विकास आघाडीने स्वतंत्र उमेदवार जाहीर केले आहेत. दोन्ही गटाकडून जाहीर झालेल्या स्वतंत्र उमेदवारीमुळे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या ’वाटेतील काटे संपता संपेनात’ अशी अवस्था होऊन बसली आहे. मत विभागणी आणि दोन मोठी आव्हाने समोर ठाकल्याने शेट्टींच्या अडचणीत वाढ झाली आहे. जनतेच्या संपर्कात नसलेला शिक्का पडलेले महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने मात्र अनेक लाटांचा सामना करत आपली नौका पार करण्यात कोणती पारंगत कला वापरतात याकडे मात्र आता जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

 

HATKANANGALE LOKSABHA : राजू शेट्टींच्या वाटेतील काटे संपता संपेणात

मत विभागणीचा फायदा कोणाच्या पदरात

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवारांची जुळवाजुळ विविध आघाड्यांकडून सुरू आहे. सध्या या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजप महायुतीकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून शाहूवाडी- पन्हाळाचे माजी आमदार सत्यजित (आबा) पाटील सरूडकर यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यातच वंचित बहुजन विकास आघाडीकडून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दादासाहेब चवगोंडा उर्फ डी.सी. पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला आहे. हे असे असले तरी शेतकर्‍यांचे पंचप्राण असलेले आणि दोन वेळा खासदारकी भोगलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मात्र रणांगणात उतरून मैदानात रंग भरण्यास सुरुवात केली आहे.

2019 च्या निवडणुकीत आयत्यावेळी शिवसेनेत प्रवेश करून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी अगदी पंधरा दिवसात खासदारकी खेचून आणली होती. यावेळी त्यांनी आपले वक्तृत्व संपन्न भाषण युवकांशी जोडलेली नाळ आणि कित्येक वर्षापासून माने घराण्याचा या मतदारसंघात असलेला राबता हा त्यांच्या निवडणुकीत विजयाभिमुख होऊन गेला होता. पण गेल्या पाच वर्षात कोरोना काळ दोन वर्षाचा लोटल्यानंतर मतदारसंघात ते संपर्कात नसल्याची चर्चा मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार होऊ लागली आहे. कोट्यावधी रुपयाची कामे करून देखील त्यांच्या पदरात असे निराशाजनक वातावरण निर्माण झाल्याने उमेदवारी बाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर त्यांना आपल्या नेत्यांची असलेली जवळीक उपयोगी पडली आहे. भाजप- शिवसेना महायुतीकडून नुकतीच त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यामुळे नकारात्मकतेचा ठसा बसलेले माने पुन्हा जोमाने कामाला लागले आहेत. त्यांनी ओढलेल्या ’धनुष्याचा बाण’ कोणाकोणाची स्वप्ने, धुळीस मिळवतो हे मात्र आता पहावयास मिळणार आहे. मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेची असलेल्या ताकती बरोबरच माने गट हा स्वतंत्रपणे कार्यरत आहे. यामुळे त्यांचा प्रवास सुखकर होईल असे बोलले जात आहे. त्यातच शिरोळ, शाहूवाडी, पन्हाळा आणि इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून त्यांना मोठी उभारी मिळण्याची आशा आहे. तर शिराळा, वडगाव, वाळवा या ठिकाणी असलेला त्यांचा स्वतंत्र गट आणि शिवसेना भाजपला मानणारी मते त्यांच्या उपयोगास येतील असा त्यांचा होरा आहे.

महाविकास आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पन्हाळा-शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित (आबा) पाटील सरूडकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. शिराळा, वाळवा, आणि वडगाव त्याचबरोबर पन्हाळा- शाहूवाडी तालुक्यातील त्यांच्या मतदारसंघातून त्यांना लीड मिळेल अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यातच शिरोळमधून माजी आमदार उल्हास पाटील कोणत्या पद्धतीने रणनीती आखतात याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.

शेतकर्‍यांचे कैवारी माजी खासदार राजू शेट्टी हे स्वतंत्रपणे लढत देणार आहेत. मतदार संघातील इचलकरंजी, जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड, इस्लामपूर, आष्टा, शिराळा, वडगाव, पन्हाळा, मलकापूर, हुपरी या शहरी भागातील मतदारांवर कसा ठसा उमटवतात हे मात्र पहावे लागणार आहे. शेतकर्‍यांशी असलेली त्यांची नाळ यावेळेला त्यांना तारुण नेणार काय? असा प्रश्नही उभा ठाकला आहे. एकंदरीतच उबाठा आणि वंचित या दोन स्वतंत्र आघाड्यांमुळे त्यांच्यासमोरील ’वाटेतील काटे संपता संपेणात’ असे चित्र सध्या तर पहावयास मिळत आहे.

मत विभागणी कोणाच्या फायद्याची..

वंचित बहुजन विकास आघाडीचे डी.सी. पाटील हे मात्र नवखे उमेदवार आहेत. त्यांना मिळणार्‍या मतांचे गणित मात्र अद्याप कोणाला सुटले नाही. यातून होणारी मत विभागणी कोणाच्या पथ्यावर पडते आणि कोणाचा घात करते हे मात्र गुलदस्त्यातच राहणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज