rajkiyalive

SANGLI LOKSABHA : सांगलीत आमची कोंडी कराल तर महाराष्ट्रात तुमची कोंडी करू

जनप्रवास/विटा
SANGLI LOKSABHA : सांगलीत आमची कोंडी कराल तर महाराष्ट्रात तुमची कोंडी करू : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर असो अगर कडेगाव पलूस असो येथील प्रत्येक नेत्याने त्या – त्या ठिकाणी आपले संस्थान उभा केले आहे. साखर कारखाने, सहकारी संस्था, शिक्षणसंस्था वाचवण्यासाठी व स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी काही मंडळी भारतीय जनता पार्टीशी हातमिळवणी करत आहेत. त्यातूनच चंद्रहार पाटील यांना उमेदवारी मिळू नये म्हणून काही नेत्यांनी जी सांगलीत कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यांची राज्यभर कोंडी होईल, असा इशारा शिवसेना उबाठा गटाचे फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत यांनी दिला.

SANGLI LOKSABHA : सांगलीत आमची कोंडी कराल तर महाराष्ट्रात तुमची कोंडी करू

खासदार संजय राऊत यांचा इशारा ; विट्यात चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेना पदाधिकार्‍यांचा मेळावा संपन्न

सांगली लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेना पदाधिकार्‍यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त आयोजित मेळाव्यात व पत्रकारांशी गप्पा मारताना त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्यासह मित्र पक्षावर तसेच भारतीय जनता पार्टीवर अत्यंत परखड भाषेत आपली मते मांडली.
पुढे बोलताना ते म्हणाले, राजकीयदृष्ट्या उपेक्षित असणार्‍या खानापूर तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबातील चंद्रहार पाटील यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सांगली महाराष्ट्रात चर्चेत आली.

सांगली ही कुणाची मक्तेदारी नाही.

सामान्य माणसाला राजकारणात संधी मिळाली नाही. पण उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. मक्तेदारी संपेल या भीतीने वेगळी भूमिका घेत आहेत. मात्र 99 टक्के लोकांना शिवसेनेची भूमिका पटलेली आहे. त्यामुळे लोकसभेला धनशक्ती विरुद्ध लोकशक्ती अशी लढाई होणार आहे. जनतेच्या मनात कोणताही संभ्रम नाही. पण संभ्रम निर्माण करण्यामागे भाजपच कारस्थान आहे. भाजपचे लोक हे एक नंबरचे खोटारडे आहेत. नरेंद्र मोदी हे त्यांचे सरदार आहेत.

ते पुढे म्हणाले, 2019 च्या निवडणुकीत विशाल पाटील जेव्हा वेगळ्या पक्षाच्या चिन्हावर लढले त्यावेळेस त्यांच्याशी सांगली जिल्ह्यातील त्यांच्याच पक्षातील व मित्र पक्षातील किती लोक प्रामाणिक राहिले हे सर्वांना माहीत होते. काँग्रेस पक्षातील काही मंडळी आज तिकिटासाठी जी इर्षा दाखवत आहेत. ती इर्षा त्यांनी 2019 ला दाखवली असती तर ही जागा आजही काँग्रेसकडेच राहिली असती. गेल्या दहा वर्षात वसंतदादांच्या नातवाचा पराभव झाला. त्यावेळी ही मंडळी कुठे गेली होती ? असा खणखणीत सवाल उपस्थित करत विशाल पाटील ज्या पायलटच्या विमानात बसले आहेत ते विमानच चुकीचे आहे. ते विमान मागच्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानीच्या धावपट्टीवर अडखळले होते. जिल्ह्यातील काही मंडळी भारतीय जनता पार्टीबरोबर फिक्सिंगचे राजकारण करत आहेत. हे वेळीच समजल्याने आम्ही चंद्रहार पाटलांसारख्या एका शेतकर्‍याच्या मुलाला उमेदवारी दिली आहे.

लोकशाहीत सामान्य माणसाने राजकारण करायचे नाही का ? सांगलीतली जनता आज चंद्रहार पाटलांच्यासोबत आहे आणि मित्र पक्षाला आमच्या सोबतच राहावे लागेल. रामटेक, कोल्हापूर, अमरावती अशा अनेक जागांच्यावर आम्ही त्याग केला आहे.

खोटारड्या लोकांचे नरेंद्र मोदी सरदार

चंद्रहार पाटलांची उमेदवारी उद्धव ठाकरेंनी जाहीर केल्यावर अनेकांच्या पायाखालच्या सतरंज्या सरकल्या. चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीबाबत जनतेच्या मनात संभ्रम नाही,पण भारतीय जनता पक्ष आणि संघाचे कारस्थान आहे. भाजपाचे लोक एक नंबरचे खोटारडे, भारतीय जनता पार्टीच्या खोटारड्या लोकांचे नरेंद्र मोदी सरदार. भाजपा खोटं बोलत आहे, त्यानंतर आता आमच्या मित्र पक्षाचे लोक आता खोटे बोलत आहेत, व्हायरस आणि व्हायरल झाले आहे, अशी टीकाही खासदार संजय राऊत यांनी केली.

 

खासदार संजय राऊत यांचे स्फोटक भाषण

शिवसेना उबाठा गटाचे फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत यांच्या विटा येथील पत्रकार परिषदेत व मेळाव्यातील स्फोटक भाषणाने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत तणाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

काय म्हणाले खासदार संजय राऊत :
*सांगलीत कोंडी कराल,तर त्यांची
महाराष्ट्रात कोंडी केल्याशिवाय राहणार नाही.
* जर 2019 मध्ये लढली नाही,केडर होते,तर आजच्याप्रमाणे त्यावेळी का लढला नाही ?
* शिवसेना कधी लढली नाही,म्हणून आता लढत आहे.
* विशाल पाटील तुम्ही 5 वर्ष कोठे होता,लोकांनी प्रश्न विचारला तर उत्तर काय ?
* महाराष्ट्र तोडण्याच काम भाजपाचे आहे. देशात दंगली घडवण्याचे भाजपाचे कारस्थान आहे.
* कारखानादार जिल्ह्याचे राजकारण ठरवू शकत नाही
* दुकाने बंद होतील,म्हणून सांगलीच्या उमेदवारीला विरोध होत आहे.
* हिम्मत असेल तर नरेंद्र मोदी यांनी सांगलीत प्रचाराला यावे.
* सांगलीमध्ये ज्या कोणाला विरोध घ्यायचा आहे, त्यांनी आताच घ्यावा.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज