rajkiyalive

SANGLI LOKSABHA : पाटलांची तिहेरी लढत रंगण्याची चिन्हे..!

बाळासाहेब मलमे, जनप्रवास
SANGLI LOKSABHA : पाटलांची तिहेरी लढत रंगण्याची चिन्हे..! सांगली लोकसभा मतदार संघाची चर्चा संपूर्ण राज्यात होत आहे, महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गटासह अन्य मित्र पक्षांना बरोबर घेऊन मविआ निवडणूक रिंगणात उतरणार आहे. परंतु सांगलीच्या जागेचा तिढा अद्याप सुटला नाही. सांगलीच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने आपला उमेदवार जाहीर करून काँग्रेसला चांगलेच अडचणीत आणले आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनीही सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळावी यासाठी दिल्लीपर्यंत फिल्डींग लावलेली आहे. मात्र अद्याप तरी चित्र स्पष्ट झाले नसले तरीही यावेळी भाजपला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. परंतु भाजपचे संजयकाका पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे पै. चंद्रहार पाटील आणि काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशालदादा पाटील यांच्यातच तिरंगी लढत रंगण्याची दाट शक्यता आहे. विशालदादा पाटील यांना जरी उमेदवारी मिळाली नसली तरी स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर विशाल पाटील अपक्ष रिंगणात उतरण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

SANGLI LOKSABHA : पाटलांची तिहेरी लढत रंगण्याची चिन्हे..!

वास्तविक पाहता सांगली हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिवंगत वसंतदादा पाटील आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी प्रदीर्घ काळ या मतदारसंघतून प्रतिनिधित्व केले. मात्र, सध्या या मतदारसंघातील समीकरणे पूर्ण बदलली आहेत. लोकसभा निवडणूक 2024 ची दिवसेंदिवस अधिकाधिक रंगत चालली आहे. त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांकडून मतदारसंघनिहाय मोर्चेबांधणी केली जात आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकासआघाडी असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. अशा वेळी सांगली लोकसभा मतदारसंघ कोण लढविणार याबाबत जोरदार रस्सीखेच पहायला मिळते आहे.

 

संजयकाका हॅट्ट्रीक करणार का?

सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असला तरी, लोकसभा निवडणूक 2014 मध्ये असलेली काँग्रेस विरोधी लाट आणि त्यानंतर लोकसभा निवडणूक 2019 मध्येही काँग्रेस आणि विरोधकांनी खाल्लेली कच याची परिणीती भारतीय जनता पक्षाचे संजयकाका पाटील निवडून येण्यात झाली. पाठीमागील दोन टर्म संजयकाका पाटील या मतदारसंघात खासदार म्हणून लोकसभेवर प्रतिनिधीत्व करत आहेत. दरम्यान, यावेळी त्यांच्या विरोधात केवळ विरोधकच नव्हे तर स्वपक्षातूनही जोरदार विरोध आहे. त्यामुळे यावेळी संजयकाका पाटील लोकसभा निवडणूक 2024 च्या रिंगणात हॅटट्रीक करणार की विरोधक त्यांचा पत्ता कट करणार याकडे सार्‍यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

सांगली जिल्ह्यातील लोकसभेच्या दृष्टीने राजकीय स्थिती पाहिली तर, वातावरण संमिश्र आहे.

लोकसभा मतदारसंघात जत, तासगाव-कवठेमहांकाळ, खानापूर-आटपाडी, पलूस-कडेगाव, मिरज आणि सांगली हे विधानसभा मतदारसंघ येतात. यापैकी काही ठिकाणी भाजप आणि काही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे. त्यातच खानापूर आटपाडी मतदारसंघातून अनिल बाबर यांचे अचानक निधन झाले. त्यामुळे या ठिकाणी महायुतीला मोठा धक्का बसला आहे. बाबर हे एकनाथ शिंदे गटाचे आमदार होते. मुख्यमंत्री शिंदे यांचे ते खंदे समर्थक मानले जात. त्यांना मानणारा वर्ग खानापूर आणि आटपाडी अशा दोन्ही तालुक्यांमध्ये आहे.

मात्र, त्यांच्या निधनामुळे हा मतदार कोणती भूमिका घेतो याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.

मागच्या वेळी वंचितकडून लढणारे गोपिचंद पडळकर सध्या भाजपचे विधानपरिषदेतील आमदार आहेत. अशा वेळी उमेदवार कोणताही असला तरी त्याला युती आणि आघाडीची गरज भासणार आहे. जो कोणी हा मतदारसंघ ताकदीने लढवेल, लोकांचे प्रश्न घेऊन लोकांसमोर जाईल तोच जिंकेल जनतेचे मन, अशी सद्याची तरी राजकीय स्थिती आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज