rajkiyalive

SANGLI LOKSABHA : कवच बाजुला ठेवून मैदानात या मी पण लंगोटा बांधून तयार

जनप्रवास । सांगली
SANGLI LOKSABHA : कवच बाजुला ठेवून मैदानात या मी पण लंगोटा बांधून तयार : भाजप व खासदारांनी सांगलीची जागा काँग्रेस पक्षाला मिळू नये म्हणून देव पाण्यात ठेवले आहेत. कोणाच्या आड बसून राजकारण करण्यापेक्षा तुम्ही पक्षाचे कवच बाजुला ठेवून मैदानात या मी पण लंगोटा बांधून तयार आहे, तुम्हाला पुरून उरू, असा इशारा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व इच्छूक उमेदवार विशाल पाटील यांनी खासदार संजयकाका पाटील यांना पत्रकार बैठकीत दिला.

 

SANGLI LOKSABHA : कवच बाजुला ठेवून मैदानात या मी पण लंगोटा बांधून तयार

ते म्हणाले, काँग्रेस पक्षाने लोकसभेसाठी एकमेव माझे नाव पक्षाकडे दिले होते. मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटप प्रक्रियेत जी चर्चा अपेक्षित नव्हती, ती चर्चा पुढे आली. तरी देखील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संयम राखला. मित्र पक्षावर वादग्रस्त वक्तव्य केली नाही. मात्र शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत सांगलीत आल्यावर त्यांनी आमचे नेते आ. विश्वजीत कदम यांच्यावर चुकीच्या पध्दतीने आरोप केले. राऊतांना ही भाषा शोभणारी नाही. ते महाविकास आघाडीतील एक नेते आहेत. पुरोगामी मराठी नेतृत्वाचा चेहरा म्हणून त्यांना पाहिले जाते. भाजप विरोधी बोलणारे ते वक्ते आहेत. पण त्यांनी आ. विश्वजीत कदम यांच्यावर वैयक्तिक पातळीवर केलेले आरोप दुर्दैवी आहेत.

मुंबई मराठी माणसाची ताकद असावी म्हणून वसंतदादांचे स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर स्नेह होते.

पण दादा-ठाकरे कुटुंबियांची सहानभूती कमी होईल असे वक्तव्य यापुढे होता कामा नये. सांगलीत सुसंस्कृत आहे. त्यामुळे मुंबईची भाषा स्वीकारत नाहीत. आम्ही संयम पाळतो. भाजपनंतर वंचित आघाडी व आता शिवसेना असा पक्ष प्रवेश करत असलेल्या उमेदवारासाठी इतके लढणे बरोबर नाही. सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपविरोधी वातावरण काँग्रेस पक्षाने तयार केले आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपविरोधी लाट आहे. शिवसेना व इतर मित्र पक्षाने ही जागा मागणे स्वाभाविक आहे. पण सांगलीच्या जागेवरच का हट्ट केला जातो? यापाठीमागे कोणते षडयंत्र सुरू आहे. याच्या खोलात मी जात नसल्याचे विशाल पाटील यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत बोलताना विशाल पाटील, बाजूस, आ. विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील, जयश्र्री पाटील

ते म्हणाले, मला कधीही शिवसेनेने लढायची किंवा राज्यसभेची ऑफर दिली नाही.

सर्वांना सोबत घेऊन निवडणुकीत उतरावे लागणार आहे. भाजपच्या पराभवासाठी हेवेदावेे विसरावे लागणार आहेत. आ. विश्वजीत कदम सांगलीची जागा मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना अपयश येणार नाही. सर्व काँग्रेस एकसंघ आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ही जागा काँग्रेसलाच मिळेल याबाबत आम्ही सकारात्मक असल्याचे विशाल पाटील यांनी सांगितले. तर खासदारांचा ज्योतीषी व महाराजांवर जास्त विश्वास आहे. काँग्रेसला उमेदवारी मिळू नये म्हणून त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. कोणाच्या तरी आड बसून राजकारण सुरू आहे. पण मला स्वत:च्या कर्तृत्वावर व जनतेवर विश्वास आहे. जनता साथ देतील असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केला.यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. विक्रमसिंह सावंत, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी महापौर किशोर शहा, सिकंदर जमादार, सुभाष खोत आदी उपस्थित होते.

सांगलीच्या जागेचे षड्यंत्र….

सांगली लोकसभेची जागा 16 वेळा काँग्रेसने जिंकली आहे. तरी देखील शिवसेनेने कोल्हापुरच्या जागेच्या बदल्यात सांगलीचाच हट्ट का केला? सातारा व सोलापूरची जागा का मागितली नाही. हातणकंगलेत ‘मशाल’ चिन्ह असताना देखील सांगली सोडणार नसल्याची भाषा वापरली जात आहे? यामध्ये संशयकल्लोळ निर्माण होत आहेत. शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी दोन दिवस वाया घालवून सांगलीचा चांगलाच अंदाज लावला आहे. त्यांचे मत परिवर्तन होणे अपेक्षित आहे आणि सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व इच्छूक उमेदवार विशाल पाटील यांनी व्यक्त केला.

सांगली मिळणारच; न मिळाल्यास विचार करू: आ. विक्रम सावंत

शिवसेनेने सर्व घटकांना सोबत घेऊन जाणे अपेक्षित होते. पण आ. विश्वजीत कदम यांच्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. सांगली लोकसभेची जागा काँग्रेसच्या हक्काची आहे. ही जागा आम्हाला मिळणारच आहे. नाही मिळाली तर विचार करू, असे आ. विक्रम सावंत यांनी स्पष्ट केले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज