rajkiyalive

SANGLI LOKSABHA : आघाडीच्या जागा वाटपात प्रत्येकवेळी ‘सांगली’च का टार्गेटवर?

जनप्रवास । सांगली
SANGLI LOKSABHA : आघाडीच्या जागा वाटपात प्रत्येकवेळी ‘सांगली’च का टार्गेटवर? : सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो, अनेक लाटा आल्या पण या लाटा सांगलीत काँग्रेसने पचवून उमेदवार निवडून दिला. पण आघाडीच्या जागा वाटपात सांगलीलाच टार्गेट करून मित्रपक्षांना जागा का दिली जाते? असा सवाल आता काँग्रेस कार्यकर्ते करू लागले आहेत. गेल्यावेळी आघाडीच्या जागा वाटपात ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली गेली. यावेळी सुधारणा होईल, अशी अपेक्षा असताना महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेना (उबाठा) गटाला दिली गेली आहे. त्यामुळे सांगलीतील काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

SANGLI LOKSABHA : आघाडीच्या जागा वाटपात प्रत्येकवेळी ‘सांगली’च का टार्गेटवर?

गेल्यावेळी स्वाभिमानी अन् आता शिवसेनेला जागा

सांगली लोकसभा मतदारसंघ म्हणजे एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला. सुरुवातीपासूनच या मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व होते. 1980 पासून वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील उमेदवार या मतदारसंघात निवडून येत आहेत. मात्र 2014 च्या निवडणुकीत देशात आलेल्या मोदी लाटेमध्ये खा. संजयकाका पाटील यांनी मोठ्या मताधिक्याने माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांचा पराभव झाला. त्यानंतर प्रतिक पाटील यांनी राजकारणातून सन्यास घेतला. त्यांचे बंधू व वसंतदादांचे नातू विशाल पाटील राजकारणात सक्रीय झाले. 2019 च्या निवडणुकीसाठी त्यांनी लोकसभा मतदारसंघात पेरणी सुरू केली. अनेक नव्या कार्यकर्त्यांची जुळणी लावणी.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीची उमेदवारी विशाल पाटील यांना मिळण्यास यात शंका नव्हती.

मात्र ऐनवेळी ही जागा आघाडीत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना या घटक पक्षाला सोडण्याचा निर्णय झाला. स्वाभिमानीने प्रथम हातकणंगले व बुलढाणा या दोन्ही जागा मागितल्या होत्या. पण ऐनवेळी बुलढाणा ऐवजी त्यांनी सांगलीच्या जागेवर हट्ट सांगितले. विशाल पाटील यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली. दादा गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा देखील झाला. विशाल पाटील यांची समजूत काढण्यासाठी प्रदेश व जिल्हा काँग्रेसच्या नेत्यांनी स्वाभिमानीच्या चिन्हावर त्यांना लढण्याच्या सूचना केल्या.

मागेपुढे न बघता त्यांनी स्वाभिमानीच्या चिन्हावर निवडणूक लढवली.

त्यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीला रंग चढलाच होता, मात्र निवडणूक ऐन रंगात आली ती गोपीचंद पडळकर यांच्या एन्ट्रीने. पडळकर सुरवातीला काँग्रेस- स्वाभिमानीकडून रिंगणात उतरणार होते. मात्र, ऐनवेळी उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी बहुजन वंचित आघाडीकडून उमेदवारी मिळवली आणि जिल्ह्यात प्रचाराचा धुरळा उठवला. या निवडणुकीत विशाल पाटील यांना वंचितचा फटका बसला आणि दीड लाख मतांनी खा. संजयकाका पाटील यांनी पराभव केला.

मात्र विशाल पाटील यांनी न खचता पुन्हा कामाला सुरूवात केली.

2024 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ही जागा इतर कोणत्याही पक्षाला सोडू नये, अशी मागणी केली. प्रदेश काँग्रेसने देखील प्रतिसाद दिला. विशाल पाटील हे काँग्रेसकडून लोकसभेचे उमेदवार असतील, असे जाहीर करून टाकले. मात्र पुन्हा 2019 चा पॅटर्न झाला. महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेना (उबाठा) या घटक पक्षाने सांगलीवर हक्क सांगितले. यावेळी त्यांनी कोल्हापूर लोकसभेच्या जागेचे कारण पुढे केले. कोल्हापूरमध्ये शाहू महाराज निवडणूक रिंगणात आहेत. त्यांनी शिवसेनेच्या चिन्हावर लढणार नसल्याचे स्पष्ट केले होते. काँग्रेस पक्षाकडून त्यांनी उमेदवारीची मागणी केली होती.

चंद्रहार पाटील यांना थेट प्रवेश देऊन आठवड्यातच उमेदवारी जाहीर केली.

शिवसेना जागा सोडण्यास तयार झाली पण त्या बदल्यात त्यांनी पुणे, सातारा, सोलापूर जागेची मागणी न करता थेट काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सांगली लोकसभेची जागा मागितली. चंद्रहार पाटील यांना थेट प्रवेश देऊन आठवड्यातच उमेदवारी जाहीर केली. काँग्रेसचे नेते मात्र मुंबई, दिल्ली वार्‍या करत राहिले. वेळ निघून जात होती. पण काँग्रेसकडून आक्रमक भूमीका घेतली जात नव्हती. खा. संजय राऊत यांनी प्रचार देखील सुरू केला, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटावर थेट आरोप केले. तरी देखील काँग्रेस शांत राहिली आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या अंतिम बैठकीत सांगलीची जागा शिवसेना (उबाठा) गटाने घेतली.

गेल्या लोकसभेत झालेला प्रकार या लोकसभा निवडणुकीत झाला.

तरी देखील काँग्रेस शांतच बसली आहे. सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणला जात होता. पण आता बालेकिल्ला पूर्णपणे संपला आहे. दहा वर्षे लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार नसणार आणि हात चिन्ह देखील नसणार. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आता आक्रमक झाले आहेत. प्रत्येकवेळी सांगलीवरच अन्याय का? अशी भावना व्यक्त केली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज