rajkiyalive

jayant patil : राजारामबापू आणि वसंतदादा वर बसून चहा घेत असतील

jayant patil : राजारामबापू आणि वसंतदादा वर बसून चहा घेत असतील सांगली : निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्वाधिक चर्चेत आलेल्या सांगली लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पक्षाध्यक्ष जयंत पाटलांनी पहिल्यांदाच मोठं वक्तव्य केलं आहे. राजारामबापू पाटील आणि वसंतदादा पाटील यांचे संबंध चांगले होते, वरती बसून ते आता एकत्र चहा घेत असतील, त्यामुळे जुन्या गोष्टी उकरून काढून वाद तयार करण्याला काहीही अर्थ नाही असं जयंत पाटील म्हणाले. आपण विशाल पाटलांच्या संपर्कात आहोत, त्यांच्याशी बोलणार आहोत असंही ते म्हणाले.

jayant patil : राजारामबापू आणि वसंतदादा वर बसून चहा घेत असतील

जुने वाद उकरून काढण्याला अर्थ नाही;

सांगलीच्या वादावर जयंत पाटलांचे स्पष्टीकरण

सांगलीतील जयंत पाटील यांचे वडील राजारामबापू पाटील आणि विशाल पाटील यांचे आजोबा वसंतदादा पाटील यांच्यामध्ये एकेकाळी राजकीय वैर होतं. त्यामुळे त्याचा फटका आता विशाल पाटलांना बसला असून राष्ट्रवादीचे शरद पवार आणि जयंत पाटील यांनी ही जागा शिवसेनेला दिली असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. विशाल पाटलांच्या कार्यकर्त्यांमध्येही हीच चर्चा असून सोशल मीडियावर यासंबंधित मेसेजही व्हायरल होत आहेत. त्यावर आता जयंत पाटलांनी स्पष्टीकरण दिलं.

सांगलीत योग्य लढत व्हावी म्हणून प्रयत्न केले होते. तरी काही जण सोशल मिडियाच्या माध्यमातून माझ्याबद्दल अपप्रचार करत आहेत. जिल्ह्यात दादा-बापू वादाच्या इतिहासावर बोलून पुढचे भविष्य दिसत नाही. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी उमेदवारीबाबत काय भूमीका घेतली? याचे आत्मचिंतन करावे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी काँग्रेसचे विशाल पाटील यांना पत्रकार बैठकीत लगाविला. तर भाजपच्या पराभवासाठी एकास-एक लढत अपेक्षित आहे. त्यासाठी आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी रहावे, ही निवडणूक म्हणजे शेवटची नव्हे, असे देखील आ. पाटील यांनी विशाल पाटील यांचे नाव न घेता सांगितले.

ते म्हणाले, सांगली लोकसभेच्या जागेवरून शिवसेना (उबाठा) व काँग्रेसमध्ये चढाओढ होती.

या ठिकाणी मी पुढाकार घेऊन काही चांगल्या गोष्टी सांगितल्या होत्या. सांगलीमध्ये राष्ट्रवादीचे एकच आमदार आहेत. त्यामुळे ही जागा आम्ही मागितली नाही. मेरीटवर सांगलीत अशी कोणती चर्चा झाली नाही. सांगलीत योग्य लढत होणे अपेक्षित होते. त्यासाठी मी प्रयत्न करत होतो. कोल्हापुरला शाहू महाराज ज्या पक्षाकडून उभे राहतील त्या पक्षाने उमेदवारी देण्याचा निर्णय झाला होता. सांगलीच्या बदल्यात कोल्हापूर असे काही नव्हते. मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी काही तडजोडी करत सहमती दिली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची घोषणा झाली आहे.

यावेळी विशाल पाटील देखील माझ्या संपर्कात होते.

त्यांना देखील मी बोलले होते. पण आता त्यावर भाष्य करणे अथवा स्पष्टीकरण देणे योग्य नाही. काही जण पेटवणारे असतात, पण आता कोणाविरोधात बोलणार नाही. पण माझ्याविरोधात सोशल मिडियावर अनेक अपप्रचार झाले. दादा-बापू इतिहासातील वाद रंगवला जात आहे. पण या दोघांमध्ये मतभेद नव्हते. ते आता एकत्र बसून चहा पित असतील. इतिहासातील जुन्या गोष्टींना उजाळा दिला जात आहे. आता राजकारणाची पध्दत बदलली आहे. लोकांना जनसेवा, विश्वासहर्ता अपेक्षित आहे. माझ्यावरील वावड्या बंद कराव्यात. इतिहासावर बोलून भविष्य दिसत नसल्याचा टोला आ. जयंत पाटील यांनी विशाल पाटील यांना लगाविला.

जागा वाटप जाहीर झाले आहे. शिवसेनेने देखील आता चर्चा नाही, असे स्पष्ट केले आहे.

त्यामुळे आता कोणी वेगळी भूमीका घेऊ नये. राज्यात झालेला निर्णय मान्य करायला हवा. एकास-एक लढत होणे आवश्यक आहे. इतर मतदारसंघात देखील त्याचे परिणाम दिसतात. भाजपविरोधात असलेली महाविकास आघाडी एकसंघ असायला हवी. एक निवडणूक म्हणजे अंतिम निवडणूक नाही. बंडखोरी झाल्यास मत विभागणीचा फटका महाविकास आघाडीला बसू लागतो. त्यामुळे सांगलीचा तिढा सोडविण्यासाठी शिवसेना व काँग्रेसने एकत्रित बसून मार्ग काढणे आवश्यक आहे. आघाडीचा निर्णय झाला आहे. त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे मत आ. जयंत पाटील यांनी मांडले.
यावेळी आमदार अरुण लाड, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष संजय बजाज, शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार उपस्थित होते.

महाराष्ट्रातील परिस्थिती बदलत आहे, भाजपबद्दल लोकांच्या मनात वेगळा राग आहे.

त्यामुळे महाविकास आघाडीला यावेळी चांगल्या जागा मिळतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. जयंत पाटील म्हणाले की, सांगलीत शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चर्चा सुरु होत्या. राष्ट्रवादीने 10 जागा वर समाधान मानत आघाडी ठेवावी अशी भावना ठेवली. सांगलीची जागा शिवसेनेने मागितली होती. भाजपच्या विरोधात एकच उमेदवार विरोधात असावा आमचा प्रयत्न आहे, सांगलीत देखील तसेच व्हायला हवं होतं, तरच भाजपला हरवणं शक्य आहे.

एक निवडणूक म्हणजे अंतिम नाही, अनेक निवडणुका लढवायच्या असतात.

मोदींच्या, भाजपच्या विरोधात वातावरण असताना त्याचा फायदा घेतला पाहिजे. सर्वांनी समजूतदारपणा दाखवायला हवा. मताची विभागणी झाली तर महाविकास आघाडीला फटका बसणार.
सांगलीबाबत काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ आणि शिवसेना यांच्यात चर्चा होणे आवश्यक होते. मी राष्ट्रवादी पक्षाचा असल्याने त्यावर मी बोलणे उचित नव्हते. कोल्हापूरचे शाहू महाराज ज्या पक्षात जातील त्या पक्षाला ती जागा सोडवायची असे ठरले होते. आमचा सांगली जिल्ह्यात एकच आमदार त्यामुळे आम्ही दावा केला नाही असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

महाविकास आघाडीच्या 32-33 जागा निवडून येतील

भाजपने पक्ष फोडून भ्रष्टाचारी लोक घेतले. महागाईसह अनेक प्रश्नांबद्दल भाजपविरोधात प्रचंड नाराजी आहे. लोक मतदानाची वाटच बघत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत असून 32 ते 33 जागा मिळतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी पत्रकार बैठकीत बोलताना व्यक्त केला.

ते म्हणाले, राज्यातील जनतेमध्ये भाजपाबद्दल प्रचंड संताप आहे. भाजपाने पक्ष फोडले, भ्रष्टाचारी लोक घेतले, महागाई, यामुळे भाजपाबद्दल राज्यातील जनतेमध्ये रोष आहे. निवडणुकीच्या प्रचारार्थ राज्यात फिरताना हे दिसून येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील जनता भाजपाबद्दलचा राग मतदानातून दाखवून देणार आहे. बारामतीमध्ये सुध्दा आघाडीच्या सुप्रिया सुळे विजयी होतील. हातकणंगले मतदारसंघात स्वच्छ आणि नवा चेहरा शिवसेना (उबाठा) गटाने दिला आहे. तेथे वातावरण चांगले असून सत्यजित पाटील नक्कीच निवडून येतील, असा विश्वास आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, राष्ट्रवादीने जागा वाटप करताना अडवणुकीची भूमिका घेतली नाही. आम्ही दहा जागांवर निवडणूक लढवित असून यातील सर्व जागांवर पक्षाचे उमेदवार विजयी होतील. भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट एकत्रित आली आहे. आमचा हा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे मतविभागणी टाळण्यासाठी कोठेही बंडखोरी होऊ नये, यासाठी सर्वच आघाडीतील नेत्यांचा प्रयत्न आहे. भाजपमध्ये अनेक जिल्ह्यात अंतर्गत नाराजी आहे. सध्या ती बाहेर येत आहे. जनतेत भाजपविरोधात संताप आहे. त्यामुळे महविकास आघाडीला चांगले वातारण असल्याचा विश्वास आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

वंचितचे राजकारण शंका घेण्यासारखे: सुकुमार कांबळे

डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया (डीपीआय) ने महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला. संस्थापक प्रा. सुकुमार कांबळे, अध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी सांगलीत पाठिंबा दिला. प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी पाठिंबा स्वीकारला. प्रा. कांबळे म्हणाले, मत विभागणी टाळून भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र आलो आहे. शरद पवार हेच भाजपला हद्दपार करु शकतात. राष्ट्रवादीने मोठ्या मनाने आमचा पाठिंबा घेतला. भाजप सत्तेत आल्यावर घटनेची मोडतोड निश्चित आहे. वंचित आघाडी ही सर्व पक्षांची आघाडी होती, त्याची पक्ष म्हणून नोंदणी केल्याने आमच्यासह अन्य घटक बाहेर पडले. त्यांचे राजकारण शंका घेण्यासारखे असल्याचा आरोप त्यांनी केला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज