rajkiyalive

मदनभाऊनंतर ‘दादा’ गटाला मिळाले विशाल पाटलांचे डॅशिंग नेतृत्व

शरद पवळ, जनप्रवास
मदनभाऊनंतर ‘दादा’ गटाला मिळाले विशाल पाटलांचे डॅशिंग नेतृत्व : स्व. वसंतदादा पाटील यांनी राज्याच्या राजकारणाचे सत्ताकेंद्र सांगलीत निर्माण केले होते. मात्र त्यांच्या पश्चात कुटुंबियात अनेक नेते झाले, त्यांचे खच्चीकरण करण्याचे काम केले जात होते. स्व. मदनभाऊ पाटील यांनी अनेक वर्षे विरोधकांना अंगावर घेऊन ‘दादा’ गटाचे नेतृत्व केले, पण त्यांच्या निधनाने दादा गट संपतो की काय? अशी परिस्थिती झाली. पण आता आक्रमक चेहरा असलेले दादांचे नातू विशाल पाटील हे दादा गटाचे नेतृत्व करत आहेत. भाऊंच्या निधनानंतर म्हणजे आठ वर्षानंतर दादा गटाला डॅशिंग नेतृत्व मिळाले आहे.

मदनभाऊनंतर ‘दादा’ गटाला मिळाले विशाल पाटलांचे डॅशिंग नेतृत्व

राज्यात लोकसभा असो किंवा विधानसभा. काँग्रेस पक्षाच्या उमेदवार्‍या कृष्णा काठावरून निश्चित केल्या जात होत्या. वसंतदादा पाटील यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याशिवाय उमेदवार तयारी लागत होते. राज्यात 1985 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस पक्षाने वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या आणि 187 जागा जिंकल्या. वसंतदादांचा झंझावात फक्त सांगली जिल्ह्याने नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला होता. राज्याचे चार वेळा मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या दादांचे वजन राज्याने अनुभवले. मात्र त्यांच्या निधनानंतर सांगलीतील काँग्रेस आणि वसंतदादा कुटुंबाचा राजकीय र्‍हास होत चालल्याचे चित्र आहे. स्व. वसंतदादांचे पुत्र माजी खासदार स्व. प्रकाशबापू पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाचे पाच वेळा नेतृत्व केले.

राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी 1998 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर दादा कुटुंबियात दोन गट पडले.

स्व. विष्णूअण्णा पाटील, माजी मंत्री स्व. मदनभाऊ पाटील यांनी राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय फार काळ टिकला नाही. विष्णूअण्णांचे निधन झाले, स्व. मदनभाऊ पाटील यांना राष्ट्रवादीकडून डावलण्यात येऊ लागले. 2004 साली राष्ट्रवादीची साथ सोडली आणि प्रकाशबापू पाटील व मदनभाऊ पाटील एकत्र आले. भाऊंनी अपक्ष निवडणूक लढवली. ‘मै हू ना’ चा नारा दिला आणि ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. दादा घराणे एक झाले तर काय होऊ शकते हे दाखवून दिले. त्यानंतर भाऊंच्या डॅशिंग नेतृत्वाला सुरूवात झाली. स्व. प्रकाशबापू पाटील यांचे निधन झाले. त्यानंतर 2006 ला मदनभाऊंवर दादा घराण्याची जबाबदारी आली.

माजी मंत्री प्रतिक पाटील यांना लोकसभेच्या निवडणुकीत उभे केले.

या विरोधात विरोध वाढत गेला. दादा घराण्याचे प्रतिस्पर्धी असलेले सर्व जण एकत्र आले. एकास एक उमेदवार देखील दिला. पण मोठ्या धाडसाने भाऊंनी ही निवडणूक सांभाळली आणि प्रतिक पाटील विजयी केले. त्यानंतर भाऊंना विजयी रथ रोखण्यासाठी महापालिका निवडणुकीत बाहेरील एका नेत्याने महाआघाडीचा प्रयोग केला. तो यशस्वी झाला. त्यानंतर भाऊंच्या राजकारणाला अधोगती लागत केली. विरोधक वाढले, 2009 च्या विधानसभेला पराभव झाला. त्यांनी 2013 च्या महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आणली.

2014 मध्ये लोकसभा व विधानसभा देखील दादा घराण्याच्या हातून गेली.

पण भाऊ खचले नाहीत. काम करत राहिले, त्यानंतर 2016 साली भाऊंचे निधन झाले. यानंतर वसंतदादा गटाची मोठ्या प्रमाणावर वाताहत झाली. जयश्रीताई पाटील राजकारणात सक्रीय झाल्या, पण महिला असल्याने अनेक बंधने आले. विशाल पाटील देखील राजकारणात अगे्रसर झाले. 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत लक्ष केंद्रीत केले. पण जे होणार ते अगोदरच ठरले होते. सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यात आली. विशाल पाटील अडचणीत सापडले, नवे नेतृत्व उदयास येणार असल्याने दादा घराण्याविरोधात रचलेला हा कट होता. तरी देखील विशाल पाटील धाडसाने लढले पण वंचित बहुजन आघाडीच्या प्रयोगाने पराभव झाला. न खचता पुन्हा 2024 चे टार्गेट ठेवले.

वातावरण निर्मिती केली, पण पुन्हा 2019 चा पॅटर्न झाला आघाडीच्या जागा वाटपात शिवसेना (उबाठा) गटाला जागा देण्यात आली.

पण आता विशाल पाटील मैदानातून बाहेर पडणारे पैलवान नाहीत, मैदानात लढणारच ते अपक्ष का असेना, असा मनात चंग बांधला आणि कामाला लागले. मंगळवारी झालेल्या रॅली व सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यांनी केलेल्या भाषणाने अनेकांचे डोळे पानावले. दादा गट पुन्हा एकवटला. स्व. मदनभाऊनंतर विशाल पाटलांमध्ये ती धमक दिसून आली. भविष्यात हेच विशाल पाटील दादा गट वाढवतील, असे सिध्द झाले. त्यामुळे त्यांच्याकडून आता अपेक्षा वाढल्या आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज