rajkiyalive

पुन्हा मिरज पॅटर्न ‘विशाल’बरोबरच

शरद पवळ जनप्रवास
पुन्हा मिरज पॅटर्न ‘विशाल’बरोबरच : लोकसभा, विधानसभा असो की महापालिका, प्रत्येक निवडणुकीत चर्चा होते ती मिरज पॅटर्नची. या लोकसभा निवडणुकीत मिरजेचे नेते, माजी नगरसेवक, पदाधिकारी कोणाबरोबर राहणार याची चर्चा सुरू असताना मिरजेच्या मंडळींनी मंगळवारी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्या व्यासपीठावर गर्दी केली. यामध्ये काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, राष्ट्रवादी (अजितदादा पवार) गटाच्या नगरसेवकांचा समावेश होता. त्यामुळे महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांना विशाल पाटील यांनी धक्का दिला आहे.

पुन्हा मिरज पॅटर्न ‘विशाल’बरोबरच

राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांना देखील मिरज कळली नाही, असे बोलले जाते. मिरजेतील अनेक स्थानिक नेते स्वयंभू आहेत. स्वत:च्या ताकदीवर ते निवडून येतात. त्यासाठी ते एकमेकांशी तडजोड देखील करतात. त्यामुळे मिरज पॅटर्न जिल्हाभर चर्चेत आहे. स्व. मदनभाऊ पाटील यांनी मिरजेच्या नेत्यांवर कमांड मिळवली होती. मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी स्थापन केलेल्या महाविकास आघाडीमुळे मिरजेत पुन्हा जुनाच पॅटर्न सुरू झाला. महापालिकेत 2013 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधात आ. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनेल उभे केले होते. मिरजेतून जादा जागा येतील, अशी अपेक्षा त्यांना होती.

आ. जयंत पाटील यांचा अपेक्षा भंग झाला. मिरजेतील ठराविक नेतेच विजयी झाली.

त्यावेळी आ. पाटील यांनी मिरज पॅटर्नचा अनुभव फार वाईट असतो, असे जाहीर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. तोच पॅटर्न आजही कायम आहे. मिरजेतील स्थानिक नेते माजी महापौर किशोर जामदार, माजी महापौर इद्रिस नायकवडी, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश आवटी या नेत्यांचे परस्परांशी अंडरस्टँडिंग असते. हे नेते कोणत्याही पक्षात उभारू देत ते निवडून येण्यासाठी प्रयत्न करतात. एकमेकांच्या विरोधात कधीही प्रचार करत नाहीत. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिरजेतील नेत्यांनी एकत्रित येऊन एकाच उमेदवाराला पाठिंबा दिला होता.

आता सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत देखील याच मिरज पॅटर्नची चर्चा सुरू झाली आहे.

या निवडणुकीत महायुतीकडून खासदार संजयकाका पाटील, महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील निवडणूक रिंगणात आहेत. तर काँग्रेसने उमेदवारी डावलल्याने अपक्ष म्हणून विशाल पाटील निवडणूक रिंगणात आहेत. मिरजेतील माजी नगरसेवकांनी एकत्रित येऊन सोमवारी रात्री बैठक घेतली. या बैठकीत विशाल पाटील यांच्या प्रचारात सक्रीय सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी नगरसेवक देखील सहभागी झाले.

यामध्ये काँग्रेसचे माजी महापौर किशोर जामदार, माजी विरोधी पक्षनेते संजय मेंढे, माजी नगरसेवक करण जामदार, विजय धुळूबुळू, अजित दोरकर, भाजपचे स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश आवटी, निरंजन आवटी, आनंदा देवमाने, राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शिवाजी दुर्वे, चंद्रकांत हुलवान, जुबेर चौधरी यांच्यासह मिरजेतील माजी सर्वपक्षीय नगरसेवक, कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित होते.

स्थायी समितीचे माजी सभापती निरंजन आवटी यांनी भाषणात विशाल पाटील यांना शब्द दिला.

मिरजेतील सर्व माजी नगरसेवक तुमच्या प्रचारात सहभागी असतील. शहरातून तुम्हाला मताधिक्य मिळेल, अशी ग्वाही दिली. मिरजेतील सर्वपक्षीय माजी नगरसेवक व कार्यकर्ते एकत्र आल्याने महाविकास व महायुतीच्या उमेदवारांनी ‘मिरज पॅटर्न’चा धसका बसला आहे.

800 मोटारसायकलची काढली रॅली..

मिरजेतील आजी-माजी नगरसेवकांनी विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या रॅली व सभेसाठी मिरज शहरातून सुमारे आठशे मोटारसायकल रॅली काढली. मिरजेतून सांगलीच्या प्रचार सभेपर्यंत ही रॅली काढली. या रॅलीमध्ये आजी-माजी नगरसेवक व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज