rajkiyalive

दिग्गजांच्या नेतृत्वाला बंडातूनच वाटचाल

दिनेशकुमार ऐतवडे 9850652056
दिग्गजांच्या नेतृत्वाला बंडातूनच वाटचाल : मंगळवार 16 रोजी वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी काँग्रेस भवनसमोर जोरदार शक्तीप्रदर्शन करीत काँग्रेसमध्ये बंडखोरी केली. यावेळी झालेल्या सभेत त्यांनी सांगली जिल्ह्याला बंडाचा इतिहास आहे, असे सांगितले आणि ते खरेही आहे. कारण सांगली जिल्ह्यात जे काही मोठमोठे नेते होवून गेले त्यापैकी काही जणांची सुरूवात बंडखोरीतून झाली आहे. माजी मंत्री स्व. डॉ. पतंगराव कदम, स्व. संपतरावजी देशमुख, पृथ्वीराज देशुख, राजेंद्रअण्णा देशमुख, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, आ.मानसिंगराव नाईक, माजी मंत्री मदन पाटील, जतमध्ये उमाजीराव सनमडीकर, सदाशिवराव पाटील या नेत्यांची सुरूवात बंडखोरीतूनच झाली आहे.

दिग्गजांच्या नेतृत्वाला बंडातूनच वाटचाल

जिल्ह्याला बंडखोरीचा इतिहास तसा जुनाज आहे. 1952 मध्ये झालेल्या पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीत जतमधून राजे विजयसिंह डफळे सरकारांनी अपक्ष अर्ज भरून ते निवडूनही आले. त्याच्या रूपाने केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही पहिला अपक्ष निवडून येण्याचा मान विजयसिंह डफळे यांना मिळाला आहे. 1985 मध्ये भिलवडी वांगीमध्ये मोठा इतिहास घडला. तत्कालिन आमदार संपतराव चव्हाण यांच्या समोर डॉ. पतंगराव कदम यांनी बंडखोरी केली आणि निवडूनही आले. पतंगराव कदमांचा प्रवास बंडखोरीतूनच सुरूवात झाली. डॉ. पतंगराव कदम यांना 63865 मते मिळाली तर संपतराव चव्हाण यांना केवळ 33700 मते मिळाली. याच निवडणुकीत जतमधून माजी सैनिक असलेल्या उमाजीराव सनमडीकड हेही अपक्ष राहून निवडून आले होते.

1990 मध्ये भिलवडी वांगीत डॉ. पतंगराव कदम यांना पराभवास सामोरे जावे लागले.

येथे अपक्ष उपमेदवार संपतराव देशमुख यांनी त्यांचा पराभव केला. येथे डॉ. कदमांना 64031 मते मिळाली तर संपतराव देशमुख यांना 71296 मते मिळाली. या टर्ममध्ये संपतराव देशमुख यांचे निधन झाले. त्यामुळे येथे पोटनिवडणूक लागली. त्यामध्येही अपक्ष उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांनी डॉ. पतंगराव कदम यांचा पराभव करून राजकारणाची सुरूवात केली.

1995 हे साल बंडखोरीसाठी मोठे कारण ठरले.

95 च्या निवडणुकीत सांगली जिल्ह्यात 5 अपक्ष आमदार निवडून आले होते. या पाचही जणांनी त्यावेळी भाजप शिवसेना सरकारला पाठिंबा दिला होता. त्यापैकी शिवाजीराव नाईक यांना मंत्रीपदाची संधी मिळाली.
शिराळ्याचे आमदार शिवाजीराव देशुमख हे प्रदेशाध्यक्ष होते. सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव नाईक होते. ते सलग 11 वर्षे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. शिवाजीराव देशमुख यांनी शंकरराव चरापले यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले शिवाजीराव नाईक यांनी बंडखोरी केली आणि निवडून आले. शंकरराव चरापले यांना 55099 मते तर शिवाजीराव नाईक यांना 72856 मते मिळाली. शिवाजीराव नाईकांचा पहिला विजय बंडखोरीतूनच झाला. खानापूर आटपाडीमध्ये विद्यमान आमदार अनिल बाबरना मोठा धक्का बसला. काँग्रेसचे तिकीट बाबरना मिळाले. त्यामुळे सर्वपक्षीय एकत्र आले आणि आटपाडीच्या राजेंद्रअण्णांना साथ दिली. येथे बंडखोर राजेंद्रअण्णा निवडून आले. राजेेंद्रअण्णांना 73998 तर अनिल बाबरना 53708 मते मिळाली.

कवठेमहांकामध्ये तिसर्‍या प्रयत्नात अजितराव घोरपडे विजयी झाले.

त्यांची सुरूवातही बंडखोरीतूनच झाली. 95 मध्ये त्यांनी शिवाजीराव शेंडगेंडचा पराभव केला. घोरपडेंना 72619 मते मिळाली तर शिवाजीराव शेंडगेंना 60229 मते मिळाली. जतमध्ये पुन्हा एकदा उमाजीराव सनमडीकरांनाच काँग्रेसचे तिकीट मिळाले. त्यामुळे विलासराव जगताप नाराज झाले. त्यांनी मधुकर कांबळेेंना अपक्ष मैदानात उतरवून निवडून आणले. कांबळे यांना 54294 तर सनमडीकरांना केवळ 38135 मते मिळाली. सांगली जिल्ह्यात यावर्षी पाच आमदार अपक्ष निवडून आले होते.पुढे 1999 च्या निवडणुकीतही कवठेमहांकाळमधून अजितराव घोरपडे यांनी पुन्हा एकदा अपक्ष म्हणूनच निवडून आले होते.

2004 मध्ये सांगलीची जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली.

त्यामुळे राष्ट्रवादीत नाराज असलेले मदन पाटील यांना बंड केले. मै हू ना चा नारा देत त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. येथे त्यांनी दिनकर पाटील यांचा पराभव केला. खानापूर आटपाडीमधून सदाशिव पाटील यांनीही आपल्या आमदारकीची सुरूवात अपक्ष राहूनच केले. 2004 मध्ये ते पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हण्ाून निवडून आले. पुढे 2009 मध्ये ते काँग्रेसमधून निवडून आले.

2009 मतदार संघांची पुनर्रचना झाली. शिराळामध्ये राष्ट्रवादीचे तिकीट शिवाजीराव नाईक यांना मिळाले.

येथे मानसिंगराव नाईक यांनी बंडखोरी केली आणि निवडून आले. मानसिंगराव नाईक यांना 103661 मते मिळाली तर शिवाजीराव नाईक यांना 77849 मते मिळाली. अशा प्रकारे जिल्ह्याचे नेतृत्व केलेले अनेकांना राजकीय प्रवास बंडखोरीतून म्हणजेत अपक्ष राहून झाला आहे. सध्या लोकसभेचे रणांगण सुरू आहे. सांगलीतून विशाल पाटील यांना उमदेवारी मिळाली नाही त्यामुळे त्यांनी बंडाचे निशान हाती घेतले आहे. लोकसभेला आजपयंंर्ंंत जिल्ह्यातून कोणीही अपक्ष निवडून आला नाही. आता या निवडणुकीत विशाल पाटील तो इतिहास बदलतात का हेच पहावे लागेल.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज