rajkiyalive

गेल्यावेळी ‘बुलढाणा’, यावेळी ‘कोल्हापुर’ने केला घात…

जनप्रवास । सांगली
गेल्यावेळी ‘बुलढाणा’, यावेळी ‘कोल्हापुर’ने केला घात… 2019 च्या निवडणुकीत आघाडीच्या जागा वाटपात ‘स्वाभिमानी’ने पूर्वी बुलढाण्याची जागा मागितली होती. मात्र अचानक त्यांनी सांगलीच्या जागेवर दावा केला आणि तत्कालिन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगलीची जागा स्वाभिमानीला दिली. 2024 च्या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाने कोल्हापुरची जागा काँग्रेसला दिली आणि त्या बदल्यात सांगलीची जागा घेतली. विशेष म्हणजे दोन्ही वेळा मित्रपक्षाला जागा देताना आघाडीच्या नेत्यांनी विनिंग मेरिटची तपासणीच केली नाही. याचा फटका आता काँग्रेसला बसला आहे. दहा वर्षे मतदारसंघातून हात चिन्ह गायब झाले आहे.

गेल्यावेळी ‘बुलढाणा’, यावेळी ‘कोल्हापुर’ने केला घात…

आघाडीच्या राजकारणात सांगलीत पुन्हा काँग्रेसचा बळी

सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला आता फक्त कागदावरच राहिला आहे. 2014 च्या लोकसभेच्या निवडणुकीत आघाडीच्या जागा वाटपात ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यात आली. तोच प्रयोग पुन्हा 2024 च्या निवडणुकीत झाला. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेना (उबाठा) गटाला गेली आहे. आघाडीच्या राजकारणात पुन्हा काँग्रेसचा बळी गेला आहे. त्यामुळे कार्यकर्ते आता राज्य व केंद्रीय नेत्यांवर आक्रमक झाले आहेत.

सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला.

लोकसभेचा इतिहास पाहिल्यास या मतदारसंघावर वसंतदादा पाटील घराण्याचाच पगडा राहिला आहे. 1980 दशकामध्ये पहिल्यांदा वसंतदादा पाटील या मतदारसंघातून खासदार झाले होते. यानंतर त्यांचे चिरंजीव स्व. प्रकाशबापू पाटील यांनी 1984, 1989 आणि 1991 मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवताना खासदारकीची हॅट्रिक केली. 1996 आणि 1998 मध्ये स्व. मदन पाटील यांनी खासदारकी लढवली होती. त्यानंतर पुन्हा 1999 ते 2004 या कालावधीमध्ये स्व. प्रकाशबापू खासदार होते. यानंतर 2006 आणि 2009 मध्ये प्रतीक पाटील यांनी या सांगली लोकसभेतून विजय मिळवला होता. त्यांना केंद्रामध्ये राज्यमंत्रीपद सुद्धा मिळाले होते.

मोदी लाटेमध्ये 2014 मध्ये दादा घराण्यातील माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील पराभूत झाले.

त्यांनी राजकारणात संन्यास घेतला. त्यानंतर 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आघाडी केली होती. त्यावेळी ‘स्वाभिमानी’चे माजी खासदार राजू शेट्टी यांनी हातकणंगले व बुलढाणा हे दोन मतदारसंघ मागितले होते. मात्र अंतिम क्षणी शेट्टी यांना हातकणंगले देण्यात आले व बुलढाणा ऐवजी सांगली लोकसभेची जागा देखील देण्यात आली. त्यामुळे सांगलीत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. तरी देखील विशाल पाटील यांना मैदानात उतरविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकत्रित बसले. सांगलीतून विशाल पाटील यांना स्वाभिमानीची उमेदवारी देण्यात आली.

निवडणुकीत हात चिन्ह नव्हते, नव्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली.

या शिवाय वंचितचा प्रयोग झाल्याने विशाल पाटील यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. गेल्यावेळी झालेली चुकी यावेळी दुरूस्त व्हावी म्हणून विशाल पाटील यांनी पाच वर्षे काम सुरू ठेवले. अखेरच्या टप्प्यात धावपळ होऊ नये यासाठी काँग्रेसने विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी एकीकडे प्रयत्न सुरूच ठेवले असताना सामाजिक कार्यातही टीम विशाल राबत होती. करोना काळ असो वा महापूर असो अडचणीच्या काळात टीम विशाल सांगलीकरांच्यासाठी रस्त्यावर होती.

काँग्रेसचे चिन्ह पुन्हा घराघरापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला होता.

ही लोकसभेची पूर्वतयारीच होती. सहा महिन्यांपूर्वी आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली जतपासून पदयात्रा काढून वातावरण निर्मिती करत असताना काँग्रेसचे चिन्ह पुन्हा घराघरापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला होता. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या सत्काराच्या निमित्ताने कडेगाव-पलूस मतदारसंघात मेळावा घेऊन डॉ. कदम यांनी सक्रिय असल्याचे दाखवले होते. याचा निश्चितपणे लाभ लोकसभा निवडणुकीत उठविण्याचे नियोजन होते. मात्र 2024 च्या निवडणुकीत पुन्हा घात झाला. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेना (उबाठा) गटाला सोडण्यात आली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी वीस दिवसांपूर्वीच जाहीर सभेत चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती.

मात्र काँग्रेस केवळ जागा वाटपाची चर्चा करत होती. त्याचवेळी विशाल पाटील यांची उमेदवारी जाहीर करणे आवश्यक होते.

पण प्रदेश व केंद्रीय पातळीवरील नेत्यांनी देखील तोंडातून एक शब्द देखील उच्चारला नाही. यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचे नैराश्य पसरले असून यातूनच आमचे काय चुकले ही टॅगलाईन केली गेली आहे. गेल्यावेळी ज्या पद्धतीने आघाडीच्या राजकारणात काँग्रेसच्या सांगलीच्या जागेचा बळी घेतला तसाच किंबहुना त्यापेक्षा अधिक वेदनादायी बळी गेला आहे. विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेस कार्यकर्ते देखील आक्रमक झाले आहेत. विशाल पाटील अपक्ष लढणार हे जवळपास निश्चित झाले आहे. पण सांगलीत काँग्रेस आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज