rajkiyalive

सांगली, हातकणंगलेत प्रचाराची सांगता

राजकीय पक्षांकडून सभा, रॅलीने शक्तिप्रदर्शन, उद्या मतदान

जनप्रवास । प्रतिनिधी
सांगली ः सांगली, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मागील तेरा दिवसांपासून सुरु असलेल्या प्रचाराचा धुरळा रविवारी सायंकाळी बसला. राजकीय पक्षांकडून सभा, मोटारसायकल रॅली तसेच पदयात्रा काढत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. मतदानासाठी अवघे 24 तास शिल्लक राहिल्याने छुप्या प्रचाराला वेग आला असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. दरम्यान दोन्ही मतदारसंघासाठी मंगळवार (दि. 7) रोजी मतदान होत असून प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले.

सांगली, हातकणंगलेत प्रचाराची सांगता

सांगली लोकसभा मतदार संघातून 20 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सांगली लोकसभेसाठी विद्यमान खासदार संजय पाटील, महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील नशीब आजमावत आहेत. हातकणंगले मतदारसंघातून 27 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, जिल्ह्यातील इस्लामपूर आणि शिराळा हे दोन विधानसभा मतदारसंघांचा हातकणंगले मतदारसंघात समावेश आहे. त्यामध्ये विद्यमान महायुतीकडून खासदार धैर्यशिल माने, महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी या तिघांत चुरशीची लढत आहेे.

प्रचारासाठी शेवटचा दिवस असल्याने सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर लावला होता.

लोकसभेसाठी मंगळवारी (दि. 7) रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होणार आहे. सांगली जिल्ह्यात भाजप महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवारांच्या प्रचारार्थ विविध नेत्यांच्या प्रचार सभांचा धुरळा उडला. उमेदवारांसह प्रमुख कार्यकर्ते आणि कुटुंबातील व्यक्तींनी पायाला भिंगरी बांधून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

प्रमुख शहरांसह ग्रामीण भागात रॅली काढण्यावर भर असल्याचे दिसून आले.

सायंकाळी 6 वाजता प्रचार संपणार असल्याने, जाहीर सभा दुपारीच आटोपण्यात आल्या. विट्यात महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ शिवसेना युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, मिरजेत भाजपच्या प्रचारासाठी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची सभा झाली.

गेल्या तेरा दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप, टोले-कोपरखळ्या मारत नेत्यांचे शाब्दिक युद्ध सुरु होते.

राजकीय टीका ते व्यक्तिगत हेवेदावे असा आगळावेगळा रंग यंदाच्या प्रचारात भरला. रोड शो, कोपरा सभा, मोटारसायकल प्रचार, पदयात्रांची रेलचेलच होती. बाजार, जत्रा, यात्रा ही तर प्रचाराची प्रमुख केंद्रेच बनली. जाहीर प्रचार संपला असला तरी उद्या व परवा दोन दिवसांत गुप्त प्रचार सुरुच राहणार आहे. मतदारापर्यंत संपर्कासाठी घरोघरी जावून भेटावेच लागते. मोबाईल, फेसबूक आणि अन्य माध्यमांतून आपला संदेश पक्ष, उमेदवार देऊ शकतात.

मतदानादिवशीसाठी उमेदवारांची बुथ लावणे, निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत केले जाणार आहे.

जिल्ह्यात भाजपकडून केंद्रिय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रिय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्या सभा घेण्यात आल्या. महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, खा. संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे आ. विश्वजीत कदम यांच्या सभा झाल्या. प्रचारात विकास कामांपेक्षा एकमेकांची उणीदुणी काढण्यात आली. अनेक आश्वासने देवून मते मागितली जात असल्याचे चित्र दिसून आले. रविवारी सायंकाळी सहा वाजता प्रचाराची सांगता झाल्यानंतर सोमवार (दि. 6) रोजी गुप्त प्रचाराला गती येणार आहे. मंगळवारी (दि. 7) रोजी मतदान होणार आहे.

शेवटच्या दिवशी दिग्गजांच्या सभा

विट्यात महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ शिवसेना युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, मिरजेत भाजपच्या प्रचारासाठी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची सभा झाली. याशिवाय मोटारसायकल रॅलीने ठिकठिकाणी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज