rajkiyalive

इचलकरंजीतील लीड ठरवीणार विजयी उमेदवार

जनप्रवास । दिनेशकुमार ऐतवडे

इचलकरंजीतील लीड ठरवीणार विजयी उमेदवार  2019 च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यंदाही हातकणंगले लोकसभा मतदार संघ केंद्रबिंदू ठरला. जो तो उमेदवार इचलकरंजी विधासभा मतदार संघावरच तुटून पडला होता. गेल्या निवडणुकीत धैर्यशील माने यांनी येथून 75 हजाराचे लीड घेतले होते. यंदाही येथील लीड उमेदवाराला विजयापर्यंत घेवून जाणार यात शंका नाही. त्यामुळे इचलकरंजीच ठरविणार विजयी उमेदवार असे समिकरण बनले आहे.

इचलकरंजीतील लीड ठरवीणार विजयी उमेदवार

सुरूवातीच्या टप्प्यात धैर्यशील माने आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यात दुरंगी लढत होईल असे वाटत असतानाच शिवसेना उबाठा गटाचे सत्यजित पाटील सरूडकर यांना उमेदवारी मिळाली आणि निवडणुकीचे चित्रच पालटून गेले. त्यातच वंचित बहुजन आघाडीनेही उमेदवार दिल्याने सगळ्यांचीच पंचाईत झाली.

इचलकरंजी विधानसभा मतदार संघ हा एकमेव असा मतदार संघ आहे की येथे संपूर्ण शहरी मतदार आहे.

हातकणंगले लोकसभा मतदार संघात कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा शाहूवाडी आणि इचलकरंजी या विधानसभा मतदार संघांचा समावेेश आहे तर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आणि शिराळा या दोन विधानसभा मतदार संघ यामध्ये येतात. यापैकी इचलकरंजी विधानसभा मतदार संघ हा एकमेव असा मतदार संघ आहे की येथे संपूर्ण शहरी मतदार आहे. या मतदार संघात इचलकरंजी शहर, लगतचे कबनूर, कोरोची, खोतवाडी आणि चंदूर या गावांचा समावेश आहे. ही गाव सध्या इचलकरंजीचे उपनगरे झाली आहेत. त्यामुळे येथील संपूर्ण मतदार शहरी आहेत. त्यांना शेतकरी आणि उसाचे काहीही देणेघेणे नाही. इचलकरंजीचे मूळ प्रश्न आहे तो पिण्याच्या पाण्याचा आणि वस्त्रोद्योगचा.

गेल्या निवडणुकीत येथे धैर्यशील मानेंना 1 लाख 24 हजार 837 मते पडली होती.

यंदाच्या निवडणुकीत येथे एकूण 3 लाख 1 हजार 120 मतदारांपैकी 2 लाख 5 हजार 190 मतदारांनी हक्क मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण 68.14 टक्के मतदान येथे झाले आहे. गेल्या निवडणुकीत येथे धैर्यशील मानेंना 1 लाख 24 हजार 837 मते पडली होती. तर राजू शेट्टींना केवळ 49 हजार 907 मते पडली होती. सुमारे 75 हजाराचे लीड धैर्यशील मानेंना मिळाले होते. येथेच त्यांचा विजय झाला. गतवेळी त्यांचे पारंपरिक विरोधक आवाडे परिवारानेही त्यांना चांगलाच हात दिला होता. त्याचे फळ त्यांना पुढे विधानसभेला मिळाले. यंदा तर आवाडे भाजेपचे सहयोगी सदस्यच आहेत. असे असले तरी सुरूवातीला आवाडेंनीच धैर्यशी मानेंच्या उमेदवारीला विरोध केला होता. परंतु नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येवून त्यांचे पॅचअप केले. आता आवाडेंनी काय केले आहे ते चार जूनलाच कळणार आहे.

सत्यजित पाटील सरूडकर यांनीही मोठा जोर लावला आहे.

यंदाची परिस्थिती वेगळी आहे. यंदा तिरंगी लढत आहे. सत्यजित पाटील सरूडकर यांनीही मोठा जोर लावला आहे. त्यांच्यासाठी मदन कारंडे, तेलनाडे बंधू तसेच अनेक नगरसेवक रात्रंदिवस राबत होते. माने आणि शेट्टींशिवाय तिसरा पर्याय जनतेसमोर उभा होता. गेली निवडणूक पाणी प्रश्नावरून झाली असली तर अजून इचलकरंजीचा पाणीप्रश्न सुटला नाही आपण तो पाणी प्रश्न सोडवू असे आश्वासन सत्यजित पाटील सरूडकरांनी दिला आहे. त्यांच्या आवाहनाला किती प्रतिसाद मिळाला आहे हेही पहावे लागेल.

संपूर्ण उसन्या मतावर अवलंबून असणार्‍या राजू शेट्टींची येथे मोठी कसोटी असणार आहे.

कारण येथे त्यांच्या सोबत कोणताच केडर बेस नव्हता. त्यांच्या प्रचाराची सांगता जरी येथे झाली असली तरी त्यावेळी बाहेरून भरपूर लोक आल्याचे दिसत होते. गेल्यावेळी त्यांना 49 हजार मते मिळाली होती. दुरंगी लढत असताना मतदारांनी त्यांना नाकारले. आता तर तिरंगी लढत झाली आहे. दोन मोठ्या पक्षांच्या उमेदवारांपुढे त्यांना दोन हात करावे लागले आहे. उस दराचा प्रश्न येथे चालणारा नव्हता. त्यामुळे त्यांनीही पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधले होते. इचलकरंजीचा पाणीप्रश्न सोडविल्याशिवाय मी फेटा बांधणार नाही अशी प्रतिज्ञा त्यांनी केली. आहे. शिरोळ, हातकणंगले आणि इचलकरंजी मतदार संघ लगतचे असल्याने राजू शेट्टींची भिस्त या तीन मतदार संघावर असणार आहे. गेल्या निवडणुकीत याच मतदार संघामुळे त्यांचा पराभव झाला आता यंदा काय फरक पडणार काय अशीच चर्चा सुरू आहे.

येथे जो कोणी लीड घेईल त्याला विजयाचे दरवाजे उघडतील

एकंदरीत इचलकरंजी विधानसभा मतदार संघ धैर्यशील माने आणि सत्यजित पाटील सरूडकर यांच्यासाठी थोडे सोपे तर राजू शेट्टींसाठी थोडे अवघड आहे, अशी चर्चा आहे. त्यामुळे येथे जो कोणी लीड घेईल त्याला विजयाचे दरवाजे उघडतील यात काही शंका नाही.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज