rajkiyalive

SANGLI : खासदारांच्या पाडावासाठी तिसर्‍यांदा अपक्ष प्रयोग यशस्वी होणार का?

दिनकर पाटील, महाविकास आघाडीचे अजितराव घोरपडे यांच्यानंतर सर्वपक्षीय ताकदीची ‘विशाल’ खेळी

जनप्रवास : अमृत चौगुले

SANGLI : खासदारांच्या पाडावासाठी तिसर्‍यांदा अपक्ष प्रयोग यशस्वी होणार का? : विद्यमान खासदारांना पायउतार करण्यासाठी आतापर्यंत तीनवेळा अपक्षांचे ताकदीचे प्रयोग झाले. यामध्ये 2006 मध्ये दिनकर पाटील तर 2009 मध्ये अजितराव घोरपडे (सरकार) यांच्यारूपाने काँग्रेसचे माजी मंत्री प्रतिक पाटील यांच्याविरोधात महाविकास आघाडीचा ताकदीचा प्रयोग पार पडला. परंतु तुल्यबळ लढत होऊन तो थोडक्यात अपयशी ठरला होता. आता भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्याविरोधात काँग्रेसची उमेदवारी डावलल्याने विशाल पाटील यांच्यारूपाने अपक्ष तुल्यबळ उमेदवाराचा प्रयोग झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील वगळता पूर्वी दोनवेळा असलेलीच सर्वपक्षीय ताकद विशाल पाटील यांच्या पाठीशी राहिली. निकालाचे उलट-सुलट अंदाजही व्यक्त होत आहेत. परंतु तो यावेळी तरी यशस्वी होणार का, याचा 4 जूनरोजी मतमोजणीद्वारे फैसला होईल.

SANGLI : खासदारांच्या पाडावासाठी तिसर्‍यांदा अपक्ष प्रयोग यशस्वी होणार का?

SANGLI : खासदारांच्या पाडावासाठी तिसर्‍यांदा अपक्ष प्रयोग यशस्वी होणार का? : सांगली लोकसभा मतदारसंघ 1957 मध्ये अस्तित्वात आला. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील मिरज, सांगली, पलूस-कडेगाव, खानापूर, तासगाव-कवठेमहांकाळ आणि जत या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. येथे भारतीय किसान आणि मजूर पक्षाचे बळवंत पाटील हे पहिले खासदार म्हणून निवडून आले. होते. त्यानंतर 1962 मध्ये विजयसिंहराजे डफळे हे दुसर्‍यांदा काँग्रेसचे नेते असले तरी त्यांनी अपक्ष म्हणूनच निवडणूक लढविले आणि निवडून आले. त्यानंतर सलग काँग्रेस पक्षाने विजयाचा झेंडा रोवला जो 52 वर्षे फडकत राहिला. यात 1967 मध्ये एस.डी.पाटील, 1971 आणि 1977 मध्ये गणपती टी. गोटखिंडे, सन 1980 मध्ये वसंतदादा पाटील, सन 1983 च्या पोटनिवडणुकीत शालिनीताई पाटील, सन 1984, 1989 आणि 1991 मध्ये प्रकाशबापू पाटील, त्यानंतर 1996 आणि 1998 मध्ये मदन पाटील निवडून आले. पुन्हा सन 1999 आणि 2004 मध्ये प्रकाशबापू पाटील निवडून आले. प्रकाशबापू पाटील यांच्या निधनानंतर 2006 च्या पोटनिवडणुकीत व 2009 मध्ये प्रतीक पाटील हे काँग्रेस पक्षाचे खासदार म्हणून निवडून आले.

SANGLI : खासदारांच्या पाडावासाठी तिसर्‍यांदा अपक्ष प्रयोग यशस्वी होणार का? : एखाद् दुसरा अपवाद वगळता नेहमीच काँग्रेस एकतर्फीच बाजी मारत आली.

अर्थात यात काँग्रेसचा पाडाव करण्यासाठी क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी, जी. डी. बापू लाड हे पुरोगामी, तर भाजपकडून माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, प्रकाश बिरजे, दीपकबाबा शिंदे आदी लढत राहिले. पण कधी म्हणावे तसे यश आले नव्हते. एखाद् दुसरा अपवाद वगळता नेहमीच काँग्रेस एकतर्फीच बाजी मारत आली. पण राष्ट्रवादीचे नेते (सध्याचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष) जयंत पाटील यांनी वसंतदादा-राजारामबापू परंपरागत वादातून लोकसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी प्रयत्नांना बळ दिले. यात सन 2006 मध्ये प्रकाशबापू यांच्या निधनानंतर सहानुभूतीची लाट असतानाही पोटनिवडणुकीत माजी आमदार दिनकर पाटील यांच्या माध्यमातून अपक्ष आव्हान उभे केले. त्यासाठी माजी आमदार स्व. संभाजीराव पवार, दुष्काळी फोरमचे माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशमुख, स्व. आ. अनिलराव बाबर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनीही बळ दिले होते. त्यातच काँग्रेसअंतर्गत वसंतदादा-पतंगराव कदम गटाच्या गटबाजीतूनही दिनकर पाटील यांना बळ मिळाले होते.

SANGLI : खासदारांच्या पाडावासाठी तिसर्‍यांदा अपक्ष प्रयोग यशस्वी होणार का? : भाजप वगळता पहिल्यांदाच विरोधकांचा एकदिलाच्या ताकदीने प्रचाराचा धुरळा उडून मोठे आव्हानही उभारले गेले.

काँग्रेसचा आणि विशेषत: दादा घराण्याचा पराभव होईल अशी परिस्थितीही निर्माण झाली. यावेळी प्रतिक पाटील-दिनकर पाटील व भाजपचे दीपकबाबा शिंदे यांच्यात तिरंगी लढत झाली. पण अशा परिस्थितीतही जनतेने प्रतिक पाटील (2 लाख 52 हजार 727 मते) यांना 80 हजार मताधिक्क्याचा कौल देत खासदार केले. दिनकर पाटील यांना 1 लाख 72 हजार तर दीपकबाबा शिंदे यांना 1 लाख 19 हजार मते मिळाली.

यानंतर पुन्हा 2009 मध्ये प्रतिक पाटील यांच्या पराभवासाठी तीच ताकद एकवटली.

अर्थात दिनकर पाटील यांच्याऐवजी माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचा प्रयोग राबविण्यात आला. त्यावेळी अर्थमंत्री असलेल्या जयंत पाटील यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली. त्यातच महापालिकेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वपक्षीय मोट बांधून जयंत पाटील यांनी सत्तांतर घडविले होते. काँग्रेसनेते मदन पाटील यांच्या ताब्यातून पहिल्यांदाच महापालिका हिसकावून घेण्यात मंत्री जयंत पाटील यांना यश आले होते. त्यात माजी आमदार संभाजी पवार यांचा मोठा रोल होता. त्यामुळे महापालिकेच्या सत्तेची ताकदही घोरपडेंच्या पाठीशी होती.

अर्थात या लढतीवेळी काँग्रेसची आणि प्रतिक पाटील यांच्याबाबत सहानुभूतीची लाटही कमी झाली होती.

अर्थात महापालिकेतील महाविकास आघाडीचाच प्रयोग लोकसभा निवडणुकीत राबविण्यात आला आणि याच नावाने घोरपडे यांनी लढत दिली, अर्थात ही अपक्ष म्हणूनच होती. यावेळी भाजपनेही स्वतंत्र उमेदवार न देता मदत केली. टेबल चिन्हावर घोरपडे प्रतिक पाटील यांच्याविरोधात लढले. यात काँग्रेसने जिल्ह्याचे वाटोळे केल्यापासून घराणेशाहीपर्यंतचा आरोपही झाला.

परंतु पुन्हा सत्ताधारी काँग्रेसच्या पाडावाचे प्रयत्न फोल ठरले

आणि प्रतिक पाटील (3,78,630 मते) यांनी अजितराव घोरपडे यांचा ( 3,38,837) सुमारे 40 हजार मतांनी पराभव केला. त्यानंतर मोदी लाटेत 2014 मध्ये संजयकाका पाटील (6 लाख 11 हजार) यांनी राज्यमंत्री असलेल्या प्रतिक पाटील (3 लाख 72 हजार) याचा रेकॉर्डब्रेक 2 लाख 39 हजार मतांनी पराभव केला. सन 2019 मध्येही खा. संजयकाका पाटील (5 लाख 8 हजार) यांनी 1 लाख 64 हजार मतांनी विशाल पाटील (3 लाख 44 हजार) यांचा पराभव केला. अर्थात त्यावेळी संजयकाका पाटील विरोधातील भाजपअंतर्गत नाराजीवर उपाय म्हणून गोपीचंद पडळकर यांचा वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग राबविण्यात आाला. तो यशस्वी होऊन 3 लाख मतांचे विभाजन झाल्याने संजयकाकांना फायदा झाला होता.

सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान देशात, राज्यात बरेच राजकीय पाणी पुलाखालून वाहून गेले आहे.

परंपरागत राष्ट्रवादी, शिवसेनेत फुटीनंतर एक गट भाजपसोबत तर दुसरा महाविकास आघाडीसोबत आहे. यातून सांगलीत महायुतीकडून खा. संजयकाका पाटील हॅटट्रिक करण्याच्या इराद्याने उतरले आहेत. मोदींच्या हॅटट्रिकला संजयकांची साथ मिळावी यासाठीही महायुतीने संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. मात्र यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवारीतील घोळातून पुन्हा काँग्रेसचे विशाल पाटील एकमेव दावेदार असूनही उमेदवारी गमवावी लागली.

ऐनवेळी आलेल्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली.

कोल्हापूरला शाहू महाराजांना काँग्रेसच्या उमेदवारीच्या बदल्यात सांगलीची जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला देण्यात आली आणि ऐनवेळी आलेल्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे दादा घराण्यावर अन्याय आणि काँग्रेस वाचविण्यासाठी अपक्ष विशाल पाटील यांच्या पाठीशी सर्व ताकद एकवटली आहे. स्व. मदनभाऊ पाटील यांनी सन 2004 मध्ये विधानसभा निवडणुकीला अपक्ष म्हणून दरवाजा फोडत विधानसभेत प्रवेश केला होता. त्याच टॅगलाईनखाली विशाल पाटीलही संसदेचा दरवाजा फोडून म्हणत मैदानात उतरले आहेत. यात काँग्रेसनेते आ. डॉ. विश्वजित कदम यांचे पाठबळ मोठे ठरल्याची उघड चर्चा आहे. जोडीला भाजपअंतर्गत रोष रोखण्यात वरिष्ठ आणि स्थानिक पातळीवर अपयश आले.

मिरज पॅटर्नचे दिग्गज विशाल पाटील यांच्यासाठी मैदानात उतरले.

त्यातून पूर्वीचेच दुष्काळी फोरमचे साथ देणारे नेते विलासराव जगताप, अजितराव घोरपडे हे महायुती-महाविकास आघाडीचे त्यांचे पक्ष सोडून विशालसाठी खुलेआम मैदानात उतरले आहेत. मिरजेतून मिरज पॅटर्नचे प्रमुख नेते सुरेश आवटी यांनी पुत्र संदीप व निरंजन यांच्यासह चार माजी नगरसेवकांना भाजपचा राजीनामा देत संजय पाटील यांच्याविरोधात शड्डू ठोकत विशाल पाटीलना पाठबळ दिले. त्यांच्यासोबत काँग्रेसचे माजी महापौर किशोर जामदार, मैनुद्दीन बागवान यांच्यासह मिरज पॅटर्नचे दिग्गज विशाल पाटील यांच्यासाठी मैदानात उतरले.

राजकीय द्वेषातून कार्यकर्ते ऐकत नसल्याने त्यांचा नाईलाज झाल्याचे दिसून आले

भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, आमदार अरुणअण्णा लाड, सुमनताई पाटील, रोहीत पाटील, स्व. आ. अनिलभाऊ बाबर पुत्र सुहास बाबर, राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, सांगलीतून माजी आमदार संभाजी पवार पुत्र किसानमोर्चाचे प्रदेशाध्यक्ष पृथ्वीराज पवार, गौतम पवार यांच्यासह अनेकांनीआतून आघाडी, युतीधर्म आणि बाहेरून विशाल पाटील यांना मदत केल्याची उघड चर्चा आहे. अर्थात त्यांनी आपली भूमिका पार पाडली तरी राजकीय द्वेषातून कार्यकर्ते ऐकत नसल्याने त्यांचा नाईलाज झाल्याचे दिसून आले आहे.

तरीही संजयकाका पाटील यांच्यासाठी महायुतीकडून केंद्र, राज्याची ताकद आणि मंत्री सुरेशभाऊ खाडे, आमदार सुधीर गाडगीळ आदींसह जिल्ह्याचे कार्यकर्ते एकवटले. यातून तिरंगी लढतही रंगली. अर्थात यात महाविकास आघाडीच्या चंद्रहार पाटील यांच्या माध्यमातून मतविभागणीचा प्रयोग तसा खास यशस्वी होईल असे एकूणच परिस्थितीतून चर्चेत आहे. घासून नाही तर ठासून विशाल पाटील यांचे ‘पाकीट’ संसदेत दरवाजा फोडून पोहोचले, असे कार्यकर्त्यांचे दावे होत आहेत. संजयकाकांच्या समर्थकांकडूनही लाख नाही तर 25 हजार का होईना, संजयकाकांची हॅटट्रिक पक्कीच, ते मंत्री होणारच, असाही दावा केला जात आहे. ते काहीही असो, पण आता दोनवेळा प्रस्थापित खासदारांच्या पाडावासाठी झालेला अपक्ष ‘विशाल’ पाटील प्रयोग यशस्वी होणार का? की विद्यमान संजयकाकांची हॅटट्रिक होऊन पुन्हा ही खेळी अपयशी ठरणार हे 4 जूनला निकालातून स्पष्ट होईल.

केंद्रस्थानी जयंतराव ‘पूर्वीॅही आणि आताही विरोधकच…!’

वसंतदादा-राजारामबापू संघर्षाच्या इतिहासातूनच सांगली विधानसभा असो की लोकसभा राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नेहमीच ‘करेक्ट कार्यक्रमा’ची भूमिका ठेवल्याची चर्चा आहे. यातूनच विष्णुअण्णा असोत, प्रकाशबापू असोत किंवा मदनभाऊंच्या विधानसभा निवडणुकीत नेहमीच विरोधकांना पाठबळ देऊन त्याचा पराभव करण्यात जयंत पाटील यांना यश आले होते. लोकसभा निवडणुकीतही दादा घराण्याचा प्रयोग त्यांच्या पुढाकाराने सन 2006 व 2009 मध्ये त्यांनी राबविला. त्यासाठी सर्व रसद त्यांनीच पुरविली होती हे उघड आहे. अर्थात त्यावेळी त्यांचा प्रयोग यशस्वी झाला नव्हता.

पण सन 2014 मध्ये त्यांना त्यात यश आले. भले सन 2014 मध्ये मोदी लाटेचा परिणाम असला तरी दादा घराण्याचे वारसदार प्रतिक पाटील यांचा पराभव करण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीतून त्यावेळचे आमदार संजयकाका पाटील यांना भाजपमध्ये त्यांच्याच पुढाकाराने व्यूहरचना झाली हे उघड आहे. त्यातून संजयकाका पाटील खासदार झाले आणि जयंत पाटील यांचीही दादा घराण्याच्या पाडावाची इच्छापूर्ती झाली. सन 2019 मध्येही संजय पाटील यांना त्यांचे छुपे पाठबळ लाभलेच. आताही विशाल पाटील यांची काँग्रेसमधून उमेदवारी कापण्यात माझा रोल नाही हे सांगत आहेत. दुसरीकडे विशाल पाटील हे जयंतरावांच्या महाविकास आघाडीचे विरोधक संजयकाका पाटील यांचा पराभव करू शकतात हे उघड आहे. तरीही एकमेव त्यांनीच आघाडीधर्म पाळत विशाल पाटील यांना बळ न देता संजयकाकांना अप्रत्यक्ष मदत केली आहे.
दादा घराण्याच्या पाडाचा अन् आता पुन्हा दादा घराण्याकडून बदल्याचा प्रयत्न…!

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सांगलीत उमेदवारी पाडावाचे प्रयत्न झाले तरी सन 2014 पर्यंत तब्बल 52 वर्षे नेहमीच अपयशी ठरत आले होते. त्यातल्या त्यात प्रकाशबापू पाटील यांच्या निधनानंतर सन 2006 मध्ये पोटनिवडणुकीत पुत्र प्रतिक पाटील यांच्या पराभवासाठी काँग्रेसचेच माजी आमदार दिनकर पाटील यांना पण अपक्ष उभे करून महाविकास आघाडीचा प्रयोग राबविण्यात आला. पण प्रतिक पाटील 80 हजार मतांनी विजयी झाले. पुन्हा 2009 मध्ये प्रतिक पाटील यांच्याविरोधात माजी मंत्री अजितराव घोरपडे यांना उभे करण्यात आले. त्यांनीही ताकदीने लढत दिली. पण या लढतीतही मताधिक्क्य कमी होऊन प्रतिक पाटील 40 हजार मतांनी विजयी झाले.

दादा घराण्याच्या पाडावाचे ते दोन प्रयोग अपयशी ठरले होते. त्यानंतर मोदी लाटेत महायुतीचे संजयकाका पाटील यांनी 2014 मध्ये प्रतिक पाटील यांचा आणि 2019 मध्ये स्वाभिमानी आघाडीचे विशाल पाटील यांचा पराभव केला. आता 2024 मध्ये मात्र काँग्रेस आणि वसंतदादा घराण्याच्या पराभवाचा बदलाच घेण्यासाठी वारसदार विशाल पाटील हे महायुतीचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्या विरोधात अपक्ष लढले आहेत. मात्र एकेकाळी संजय पाटील यांना खासदार करण्यासाठी मदत करणारे दुष्काळी फोरमचे विलासराव जगताप, अजितराव घोरपडे, पृथ्वीराज देशमुख यांच्यासह सर्व नेते मात्र त्यांचे बिनसल्याने आता त्यांच्याविरोधात आहेत. शत्रूचा शत्रू तो मित्र म्हणत त्यांनी विशाल पाटील यांना पाठबळ मिळाले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज