जनप्रवास । सांगली
SANGLI LOKSABHA : सांगलीत दोन पाटलांमध्ये शाब्दिक युध्द सुरूच : सांगली लोकसभेची निवडणुकीत चांगलीच गाजली. निवडणुकीची राज्यभर चर्चा झाली. उमेदवार-नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले. सोशल मिडियावरून देखील जोरदार प्रचार झाला. पण निवडणुकीचा आखाडा संपला तरी उमेदवारांमधील संघर्ष काय थांबताना दिसत नाही. भाजपचे उमेदवार खा. संजयकाका पाटील व काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्या शाब्दिक युध्द सुरूच आहे. निवडणुकीनंतर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप कायमच आहेत.
SANGLI LOKSABHA : सांगलीत दोन पाटलांमध्ये शाब्दिक युध्द सुरूच
सांगली लोकसभेची निवडणूक इच्छुकांना उमेदवारी मिळण्यापासून निवडणूक संपेपर्यंत चांगलीच गाजली. राज्यात झालेले फोडाफोडीचे राजकारण आणि त्यानंतर झालेली महायुती व महाविकास आघाडी हे जिल्ह्यासाठी नवीनच होते. पूर्वी जिल्ह्यात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे प्रमुख चार पक्ष होते. मात्र शिवसेना व राष्ट्रवादीत फूट पडल्याने आघाडीमध्ये देखील विभाजन झाले. भाजपने राष्ट्रवादी (अजितदादा गट), शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांची महायुती केली. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व शिवसेना (ठाकरे गट) यांची महाविकास आघाडी झाली. सांगलीत भाजपचे विद्यमान खासदार असल्यान संजयकाका पाटील यांना महायुतीची उमेदवारी कायम ठेवली.
दुसरीकडे महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून जोरदार वाद रंगला.
गेल्या निवडणुकीत सांगलीतील काँग्रेसची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला गेली होती. त्यामुळे यावेळी जागा वाटपात कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा शिवसेना (उबाठा) गटाने घेतली. या जागेवरून काय राजकारण रंगले हे सर्वांना ज्ञात होते. काँग्रेसचे नेते आ. विश्वजीत कदम यांनी ही जागा काँग्रेसला कायम रहावी, यासाठी संघर्ष केला. मात्र हा संघर्ष फळाला आला नाही. त्यामुळे काँग्रेसच्या मेळाव्यातून आ. विश्वजीत कदम यांनी पडद्यामागे कोण आहे. असा आरोप करत थेट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचे नाव न घेता निशाणा साधला. विशाल पाटील यांनी देखील नुरा कुस्ती करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला होता.
शिवसेना (उबाठा) गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी आ. विश्वजीत कदम यांच्यावर देखील आरोप केला.
विशाल पाटील यांचे विमान गुजरातच्या दिशेने जात असून विश्वजीत कदम या विमानाचे पायलट असल्याचा आरोप देखील झाला होता. या आरोपाला आ. विश्वजीत कदम यांनी देखील जोरदार उत्तर दिले होते. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी देखील विशाल पाटील यांना टार्गेट ठेवून निवडणूक लढवली. शेतकर्याचा मुलगा खासदार झाल्याचे चालणार नाही का? असा सवाल केला. त्यानंतर निवडणुकीत खा. संजयकाका पाटील व विशाल पाटील यांनी एकमेकांची उणीधुणी काढली. चंद्रहार पाटील यांनी देखील विशाल पाटील यांना टार्गेट केले.
पुन्हा संजयकाका पाटील व विशाल पाटील यांच्यात वाद रंगला.
निवडणूक संपल्यानंतर हा वाद शमेल असे सर्वांना वाटत असताना पुन्हा संजयकाका पाटील व विशाल पाटील यांच्यात वाद रंगला. आ. विश्वजीत कदम यांनी पुणे येथील कार्यक्रमात मी कोणत्या पाटलाला मदत केली आहे. ते चार जूनला कळेल, असे विधान केले होते. मात्र हा धागा पकडून खा. संजयकाका पाटील यांनी आ. विश्वजीत कदम यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, असे विधान केले. तर महाविकास आघाडी विश्वास करून पाकिटाचा प्रचार केला गेला असल्याची टीका देखील खा. पाटील यांनी आ. विश्वजीत कदम यांच्यावर केली होती. शिवाय विशाल पाटील यांचे आणखी काही फोटो व्हायरल करण्याचा इशारा दिला होता.
विश्वजीत कदम आणि आमची दोस्ती आहे ती तुटायची नाही.
त्यावर विशाल पाटील यांनी खा. संजयकाका पाटील यांनी जोरदार उत्तर दिले. विश्वजीत कदम आणि आमची दोस्ती आहे ती तुटायची नाही. महाविकास आघाडीत काय चालले हे पाहण्यापेक्षा तुमच्या पक्षाचे बघा, चंद्रहार पाटील यांचा बळी खासदार व त्यांच्या दिलदार शत्रूनेच दिला असल्याचा आरोप केला. शिवाय नुरा कस्तीचे षड्यंत्र फसल्याने खासदार वैफल्यग्रस्त झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावरून दोन्ही पाटील यांनी त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांवर शाब्दिक युध्द सुरू झाले आहे.
निकाल 4 जूनला लागणार आहे. तोपर्यंत हा वाद असाच रंगणार आहे.
निवडणुकीचा आखाडा होऊन 11 दिवस झाले तरी निवडणुकीतील उमेदवारांमधील वाद काही कमी होताना दिसत नाही. विजयाचे दावे उमेदवार करत आहेत. पण खा. संजयकाका पाटील व विशाल पाटील यांच्यात शाब्दिक युध्द थांबताना दिसत नाही. निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे. तोपर्यंत हा वाद असाच रंगणार आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.