rajkiyalive

SANGLI LOKSABHA RESULT : खानापूर मतदारसंघात विशाल पाटलांना 17 हजार 700 मतांचे लीड

जनप्रवास / प्रताप मेटकरी
विटा :

SANGLI LOKSABHA RESULT : खानापूर मतदारसंघात विशाल पाटलांना 17 हजार 700 मतांचे लीड : सांगली लोकसभेच्या निवडणूकीत निर्णायक भूमिकेत असलेल्या खानापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील विरूध्द अपक्ष उमेदवार विशाल पाटील विरूध्द महाविकास आघाडीचे उमेदवार पै. चंद्रहार पाटील यांच्यात तिरंगी आणि काटा लढत झाली. गत निवडणूकीत खासदार संजयकाकांना मताधिक्य देणारे विटा शहर आणि खानापूर मतदारसंघातील मतदार यावेळी मात्र पुन्हा संजयकाकांना साथ देणार की अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या पाठीशी राहतात ? किंवा स्थानिक उमेदवार म्हणून पै. चंद्रहार पाटील यांना कौल देतात ? याकडेच सर्वांचे लक्ष वेधले होते. मात्र संजयकाका पाटील विरूध्द विशाल पाटील यांच्यातच झालेल्या लक्षवेधी दुरंगी लढतीत खानापूर मतदारसंघातील जनतेने मात्र कौल विशाल पाटलांच्या बाजूने दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.

SANGLI LOKSABHA RESULT : खानापूर मतदारसंघात विशाल पाटलांना 17 हजार 700 मतांचे लीड

अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या पाठीशी कोणताही बडा नेता नसताना खानापूर-आटपाडीतून तब्बल 17 हजार 700 मतांचे तर मतदारसंघाचा केंद्रबिंदू असणार्‍या विटा शहरातून 1 हजार 725 एवढे मताधिक्य मिळाले, ही बाब विशाल पाटील यांच्या विजयात नोंद घेण्यासारखी ठरली आहे.

खानापूर विधानसभा मतदारसंघात खानापूर तालुका, आटपाडी तालुका आणि विसापूर सर्कलमधील 21 गावांचा समावेश आहे. खानापूर विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणूकीसाठी एकूण 347 मतदान केंद्रावर 1 लाख 96 हजार 165 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. झालेल्या मतदानाची टक्केवारी 58. 15 टक्के इतकी होती. खानापूर मतदारसंघात जो उमेदवार मताधिक्य अधिक घेईल तोच निवडणुकीत बाहुबली ठरणार ? असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज होता.

खानापूर मतदारसंघातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे नेते खासदार संजयकाका पाटील यांच्यासोबत होते.

त्यामुळे या मतदारसंघात महायुतीची ताकद मोती होती. मात्र भाळवणी गावचे सुपुत्र पै. चंद्रहार पाटील हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच उत्तरल्याने चुरस निर्माण झाली होती. त्यामुळे लोकसभा निवडणूकीत खानापूर मतदारसंघातून कोण मताधिक्य घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

लोकसभा निवडणुकीची एकूण राजकीय परिस्थिती लक्षात घेता विजयाचे गणित खानापूर मतदारसंघावर अवलंबून होते. या मतदारसंघातून मताधिक्य घेणारा उमेदवारच विजयाकडे पोहचेल, असा अंदाज व्यक्त होत होता. मतदारसंघातील बाबर, पाटील, देशमुख आणि पडळकर या गटाची मतदारसंघात मजबूत राजकीय पकड आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार संजयकाकांच्या मताधिक्यासाठी नेत्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र दुसर्‍या आणि तिसर्‍या फळीतील कार्यकर्ते उघडपणे विशाल पाटील यांच्या प्रचारात दिसत होते. त्यामुळे लोकसभा निवडणूकीत प्रथमच नेते महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या व्यासपीठावर आणि कार्यकर्ते अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारात दिसले. त्यामुळे दुसर्‍या आणि तिसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांनी यंत्रणा लावून खानापूर विधानसभा मतदारसंघातून विशाल पाटील यांच्यासाठी जीवाची बाजी लावून विजयाचा मार्ग सुकर केला.

खानापूर मतदारसंघातील प्रमुख नेत्यांचे महायुती म्हणून एकत्र येणे, स्थानिक उमेदवार, नेत्यांचे सोयीचे राजकारण आणि बदललेली राजकीय परिस्थिती यामुळे खानापूर मतदारसंघात कोणाला मताधिक्य मिळेल ? याची उत्सुकता लागून राहिली होती. त्यामुळे खानापूर मतदारसंघाला 2024 च्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड महत्त्व आल्याचे दिसत होते. खानापूर-आटपाडीत महायुतीचे मोठे प्राबल्य आहे. जोरदार प्रचार यंत्रणा राबविली गेली आहे. लोकसभा निवडणूकीत महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या बाजूने माजी आमदार सदाशिवराव पाटील, माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख, माजी जि.प.उपाध्यक्ष सुहास बाबर, राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे अशी दिग्गज मतदारसंघातील नेतेमंडळी संजयकाकांच्या पाठीशी असल्याने या निवडणुकीत खानापूर-आटपाडीतून 70 ते 80 हजारांचे मताधिक्य मिळेल, अशी आशा संजयकाकांच्या समर्थकांना होती.

त्यामुळेच महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ विट्यात केंद्रीय मंत्री अमित शहा यांची महाविजय संकल्प सभा झाली. या सभेस केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्यासारखे दिग्गज नेते उपस्थित होते. या सभेच्या माध्यमातून खासदार समर्थकांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले. मात्र या सभेचा कोणताही परिणाम झालेला नाही. संजयकाकाना मताधिक्य देताना

नेतेमंडळीची कसोटी पणाला लागली होती. मात्र या कसोटीत संजयकाकाना लीड देताना सर्व नेतेमंडळी सपशेल फेल ठरले. उलट अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या पाठीशी कोणताही बडा नेता नसताना केवळ दुसर्‍या तिसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांनी आणि जनतेने खानापूर-आटपाडीतून तब्बल 17 हजार 700 मतांचे तर मतदारसंघाचा केंद्रबिंदू असणार्‍या विटा शहरातून 1 हजार 725 एवढे मताधिक्य दिले, ही बाब निवडणूकीत नोंद घेण्यासारखी आहे.

विट्यातील किंगमेकर

माजी नगरसेवक महेश कदम, युवा नेते भालचंद्र कांबळे, नगरसेवक पदमसिंह पाटील, पाटील गटाचे खंदे समर्थक माजी उपनगराध्यक्ष ड. सचिन जाधव, प्रताप सुतार, ड. धर्मेश पाटील, ड. विजय जाधव, संजय तारळेकर यांनी किंगमेकरची भूमिका घेत विट्यात जोरदार गनिमी काव्याने यंत्रणा लावून विशाल पाटील यांना विटा शहरातून 1 हजार 727 मतांचे मताधिक्य मिळवून दिले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज