rajkiyalive

SANGLI LOKSABHA RESULT : ‘विशाल’ दरवाजा फोडून….

जनप्रवास । सांगली

SANGLI LOKSABHA RESULT : ‘विशाल’ दरवाजा फोडून…. :सांगली ः संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी बंद दरवाजा फोडून दिल्लीत एंट्री केली. दहा वर्षे काबीज केलेला भाजपचा गड हिसकावून घेण्यात विशाल यांना यश आले. महाविकास आघाडीच्या नेत्याचा विरोध झुगारून विजय विजय मिळवून सर्वांनाच धक्का दिला. त्यांनी भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांना पराभूत करीत 1 लाख 259 मतांनी विजय मिळविला.

SANGLI LOKSABHA RESULT : ‘विशाल’ दरवाजा फोडून….

संजयकाकांचा 1 लाख मतांनी पराभव, चंद्रहार पाटीलांसह 18 जणांचे डिपॉझिट जप्त

या पराभवाने संजयकाकांची हॅट्रिक हुकली. महाविकास आघाडीचे चंद्रहार यांना डिपॉझिटही वाचवता आले नाही. त्यांच्यासह 18 जणांचे डिपॉझिट जप्त झाले. काँग्रेसचे अपक्ष ’विशाल’ विजयाने त्यांच्या समर्थकांनी काँग्रेस कार्यालयासह जिल्ह्याच्या विविध भागात आतषबाजी आणि गुलालाची उधळण करीत मोठ्या प्रमाणात जल्लोष व्यक्त केला.

सांगली-मिरज रोड वरील सेंट्रल वेअर हाऊसमध्ये सकाळी साडेआठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली.

जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व निवडणूक निरीक्षक बी. परमेश्वरम यांनी मतमोजणी सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर पोस्टल, मतदान यंत्रासह व्हीव्हीपॅटची कडक बंदोबस्तात मोजणी सुरू झाली. दरम्यान लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान झाले होते भाजपकडून विद्यमान खासदार संजयकाका पाटील, महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील आणि काँग्रेसचे विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यांच्यासह 20 उमेदवार रिंगणात होते.

निवडणुकीत 62.27 टक्के मतदानाची नोंद झाली होती. 18 लाख 68 हजार 174 मतदारांपैकी 11 लाख 63 हजार 353 मतदारांनी मतदान केले. सन 2019 च्या तुलनेत 3 टक्क्यांनी मतदान घटले होते, त्यामुळे कमी मतदानाचा टक्का कुणाला धक्का देणार याबाब प्रचंड उत्सुकता होती.

महाविकास आघाडीत ठाकरे गटाने परस्पर चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्याने निवडणुकीत चांगलाच रंग भरला होता. काँग्रेस हद्दपार होण्याच्या चर्चेने विशाल यांना बंडाचा झेंडा हाती घ्यावा लागला. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याने चंद्रहार एकाकी पडले. दुसरीकडे संजयकाकांना पक्षांतर्गत संघर्ष करावा लागला, त्याचा परिणाम निकालात दिसून आला.

जत विधानसभा मतदारसंघ वगळता सांगली, मिरज, पलूस-कडेगाव, तासगाव-कवठेमहांकाळ, खानापूर-आटपाडी या पाच मतदारसंघात विशाल पाटील यांनाच मताधिक्य मिळाले. वंचित बहुजन आघाडीने विशाल पाटील यांना पाठींबा दिला होता, वंचितचे अध्यक्ष अ‍ॅड प्रकाश आंबेडकर यांनीही सभा घेवून मताधिक्य देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचा फायदा विशाल यांना झाल्याचे दिसून आले.

प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांनी पहिल्या फेरीपासून मतांची आघाडी घेण्यास सुरुवात केली. ती भाजपचे संजयकाका पाटील यांना तोडता आली नाही. विशेष म्हणजे टपाली मतदान विशाल पाटील यांनी अडीच हजार मतांनी आघाडी घेतली. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण झाला. मात्र पहिल्या फेरीमध्ये संजयकाका पिछाडीवर गेल्याने भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. दुसर्‍या फेरीपासून विशाल पाटील यांचे मताधिक्य वाढतच गेले.

त्यामुळे सांगली शहरातील काँग्रेस कमिटीसह जिल्ह्याच्या प्रत्येक गावागावात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. दुपारी एक वाजेपर्यंत विशाल पाटील यांना सुमारे 40 हजार इतके मताधिक्य मिळाले होते. सातव्या फेरीत विशाल पाटील यांचे 2318 मताधिक्य घटले, मात्र 28 हजार 116 मतांची आघाडी कायम राहिली.

दहाव्या फेरीअखेर विशाल पाटील यांना 2 लाख 59 हजार 605 इतकी मते मिळाली. संजयकाकांना 2 लाख 12 हजार 495 मते मिळाली. त्यामुळे विशाल पाटील त्यांनी 47 हजार 110 मतांनी आघाडी घेतली. पुढील अकराव्या फेर्‍यापासूनही विशाल यांचे मताधिक्य वाढतच गेले. पंधराव्या फेरीपर्यंत विशाल पाटील यांना 3 लाख 88 हजार 555 तर भाजपचे संजय काका यांना 3 लाख 24 हजार 251मिळाली. पंधरा फेर्‍याअखेर विशाल यांनी संजयकाकांवर 64 हजार 304 मतांनी आघाडी

सातवी, अठराव्या फेरीत संजयकाकांना मताधिक्य

सातवी आणि अठरावी फेरी वगळता सर्वच सर्व फेर्‍यामध्ये संजयकाकांना सरासरी 3 हजारानेे मते कमी होत गेली, त्यामुळे भाजपचे संजयकाका यांच्या विरोधात निकाल असल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले. मतमोजणीच्या सुरुवातीपासून भाजपचे संजयकाका यांना कुठेही मताधिक्य दिसत नसल्याने भाजपच्या कार्यकर्त्याच्या चेहर्‍यावर आनंद दिसत नव्हता. परंतु त्यानंतरच्या सर्व फेर्‍यांमध्ये संजयकाकांचे मताधिक्य कमीच होत गेलेे. पंधरा फेर्‍यापर्यंत मताधिक्य वाढत गेल्याने आपला विजय होणार नाही, याची खात्री होताच संजयकाकांचे कार्यकर्ते मतमोजणी केंद्रातून निघून गेले.

शेवटच्या फेरीपर्यंत विशाल पाटलांची आघाडी कायम

मतमोजणी तील 25 पैकी दोन फेर्‍या वगळता अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी प्रत्येक फेरीमध्ये मताधिक्य घेतले. एकूण 11 लाख 54 हजार 206 मतांपैकी भाजपचे विशाल यांना 5 लाख 69 हजार 651 मते मिळाली. संजयकाका पाटील यांना 4 लाख 69 हजार 392 तर महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांना अवघी 60 हजार 115 इतकी मते मिळाली. त्यामुळे विशाल पाटील सुमारे 1 लाख 259 हजार मतांनी विजयी झाले. चंद्रहार पाटील यांच्यासह 18 जणांचे डिपॉझिट जप्त झाले.

संजयकाकांची हॅट्रिक हुकली

भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी तिरंगी लढतीत बाजी मारून हॅट्रिक करतील अशी अपेक्षा भाजपला होती. मात्र 2014 मध्ये झालेले निवडणुकीत प्रतीक पाटील यांच्यावर त्यांनी 2 लाख 39 हजार तर 2019 च्या निवडणुकीत विशाल पाटील यांचा 1 लाख 60 हजार मतांनी पराभव केला होता. यावेळी पुन्हा विशाल पाटील यांचा पराभव करण्याचा चंग बांधला होता, मात्र भाजपमधील अंतर्गत नाराजीमुळे संजयकाकांची हॅट्रिक हुकली.

मतमोजणी विशाल पाटील यांची उपस्थिती

लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजामध्ये अपक्ष विशाल पाटील विजय होणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे विशाल पाटील यांना विजयाची खात्री होती. त्यामुळे विशाल पाटील हे पत्नी पूजा यांच्यासह सकाळी सव्वासात वाजता मतमोजणी केंद्रात धाव घेतली होती. मतमोजणी पूर्ण होईपर्यंत, पती-पत्नी मतदान केंद्रावर ठाण मांडून उभे होते.

मतमोजणीला विलंब

सकाळी साडेआठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. परंतु ही मते मोजण्यास उशीर लागला. नऊ वाजेपर्यंत पोस्टाच्या मतांची मोजणी सुरू होती. त्यामुळे प्रत्यक्ष ईव्हीएममधील मतमोजणीला तब्बल एक तास म्हणजे 9 नंतर सुरुवात झाली. राज्यातील विविध ठिकाणच्या निकालाच्या फेर्‍या गतीने जाहीर होत असताना सांगली लोकसभेची मतमोजणी मात्र अतिशय संथ गतीने सुरू होती. त्यामुळे अनेक मतदारसंघातील निकाल जाहीर झाल्यानंतरही सांगलीचा निकाल जाहीर करण्यास विलंब लागला. अंतिम फेरीचा निकाल येण्यास रात्र झाली होती.

सांगलीत उमेदवारनिहाय मिळालेली मत

विशाल पाटील अपक्ष 5,69,651
संजयकाका पाटील भाजप 4,69,392
चंद्रहार पाटील उबाठा 60,155
टिपूसुलतान पटवेगार बसपा 5,502
महेश खराडे स्वाभिमानी 5,491
आनंद नलगे बळीराजा पार्टी 3,531
सतिश कदम हिंदुस्थान पार्टी 2,851
प्रकाश शेंडगे अपक्ष 8,150
अल्लउद्दिन काझी 9,269
नोटा 6,512

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज