rajkiyalive

सांगली, मिरज, जत आमदारांना धोका तर पलूस-कडेगाव, तासगाव, खानापूर सेफझोनमध्ये

जनप्रवास । सांगली

सांगली, मिरज, जत आमदारांना धोका तर पलूस-कडेगाव, तासगाव, खानापूर सेफझोनमध्ये : सांगली लोकसभेचा निकाल लागला, दहा वर्षे भाजपच्या ताब्यात गेलेला सांगली काँग्रेसचा गड विशाल पाटील यांनी परत मिळवला. मात्र या लोकसभेच्या निकालाचे पडसाद विधानसभा निवडणुकीवर होणार आहेत. सांगली व मिरजेतील भाजप आमदारांबरोबर जतमधील काँग्रेस आमदाराला देखील धोका आहे. तर पलूस-कडेगावमधील काँग्रेस व तासगाव-कवठेमहांकाळमधील राष्ट्रवादीचे आमदार सेफ झोनमध्ये आहेत. खानापूर-आटपाडीत अनिल बाबर गटाने विशाल पाटलांची साथ दिल्याने सुहास बाबर यांना आमदारकीची संधी चालून आली आहे. विधानसभेच्या निवडणुका आता चार महिन्यावर आल्या आहेत. त्यामुळे विद्यमान आमदार व इच्छुकांचा चांगलाच कस लागणार आहे.

 

सांगली, मिरज, जत आमदारांना धोका तर पलूस-कडेगाव, तासगाव, खानापूर सेफझोनमध्ये

सांगली विधानसभा भाजपसाठी धोक्याची घंटा

2014 व 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत सांगली विधानसभा मतदारसंघातून भाजपाला मोठे मताधिक्य मिळाले होते. तर 2014 व 2019 च्या विधानसभा निवडणुकीत देखील भाजपने विजयाचा झेंडा फडकवला होता. मात्र या लोकसभेच्या निवडणुकीत सांगलीची स्थिती बदलली असल्याचे चित्र आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील यांना तब्बल 19 हजाराचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे आमदार सुधीर गाडगीळ यांना धोक्याची घंटा असणार आहे. तसेच आमदार गाडगीळ हे गेल्या दहा वर्षांपासून सांगलीचे प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यामुळे त्यांना हॅट्ट्रिकची संधी असणार आहे. पण भाजपविरोधी मताची लाट कायम राहिल्यास काँग्रेसला फायदा शक्य आहे. पण सध्या काँग्रेसकडून शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील इच्छूक आहेत. काँग्रेसने या दोघांमधील वाद मिटवणे आवश्यक आहे.

पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात काँग्रेस जोमात

मिरज विधानसभा मतदारसंघात यावेळी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत तब्बल 25 हजाराचे मताधिक्य घेतले. पालकमंत्री सुरेश खाडे यांनी मतदारसंघातून गेल्यावर्षी हॅट्ट्रिक केली होती. मात्र भाजपमध्ये सध्या संघर्ष निर्माण झाला आहे. पालकमंत्री खाडे यांचे एकेकाळचे विश्वास सहकारी भाजप अ. ज. मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे यांनी त्यांच्यापुढे आव्हान निर्माण केले आहे. ते देखील विधानसभेची तयारी करत आहेत. ज्या विधानसभा मतदारसंघात भाजपच्या लोकसभा उमेदवाराला कमी मते मिळतील, त्यांना उमेदवारी देताना विचार करावा लागेल, असा इशारा प्रदेश, केंद्रीयस्तरावरून दिला होता. त्यामुळे यावेळी उमेदवारी कोणाला असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. ना. खाडे यांच्या उमेदवारीला आव्हान भाजपमधून मिळणार आहे. दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची एकी कायम असणे आवश्यक असून तगडा उमेदवार उभा करणे हे आव्हान महायुतीला असणार आहे.

जत काँग्रेसचा गड; पण भाजप वरचढ..

सांगली लोकसभा मतदारसंघात एकमेव असा जत मतदारसंघ आहे. या मतदारसंघात लोकसभेला भाजपला सव्वा सहा हजाराचे मताधिक्य मिळाले आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. विक्रम सावंत प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी माजी आमदार विलासराव जगताप देखील त्यांच्या विरोधात होते. आ. सावंत यांनी विशाल पाटील यांचा छुपा प्रचार केला तर जगताप यांनी उघड प्रचार केला. तरी देखील भाजपला मताधिक्य मिळाल्याने ही बाब काँग्रेससाठी चिंताजनक असणार आहे. भाजपला या मतदारसंघात तगडा उमेदवार नाही, पण ऐनवेळी आ. गोपीचंद पडळकर यांचे नाव पुढे येऊ शकते. जतमधून भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. त्यामुळे काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रम सावंत यांना आपला गड शाबूत ठेवण्यासाठी भाजपच्या मताधिक्याची कारणे शोधून पॅचअप करावा लागणार आहे.

पलूस-कडेगावमध्ये काँग्रेस सेफझोनमध्ये

सांगली लोकसभा मतदारसंघात सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाची. या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व काँग्रेसचे युवा नेते आ. विश्वजीत कदम करत आहेत. आ. कदम यांनी विशाल पाटील यांना काँग्रेसच्या उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न केले होते. मात्र उमेदवारी मिळाली नाही. विशाल पाटील अपक्ष लढले. पण लक्ष आ. विश्वजीत कदम यांच्या भूमीकेवर होते. पण त्यांनी काँग्रेस पक्षासाठी विशाल पाटील यांना मदत केली. तब्बल 36 हजाराचे सर्वाधिक मताधिक्य या मतदारसंघातून विशाल पाटील यांना मिळाले. आ. कदम यांचे विरोधक भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी संजयकाका पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या काही समर्थकांनी विशाल पाटलांना साथ दिली. पण जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रमासिंह देशमुख यांनी भाजपचा प्रचार केला होता. पण त्यांना अपेक्षित मते मिळवला आली नाहीत. मतदारसंघात आ. विश्वजीत कदम यांची हवा झाली आहे. त्यांना विधानसभा सोपी जाईल.

तासगाव-कवठेमहांकाळ भाजप बॅकफूटवर

तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ हा संजयकाका पाटील यांचा बालेकिल्ला. 2019 च्या निवडणुकीत या मतदारसंघातून काकांना तब्बल 43 हजाराचेे मताधिक्य मिळाले होते. पण या निवडणुकीत काकांना मताधिक्य मिळाले नाही तर सुमारे 9 हजार मतांनी पिछाडीवर गेले. या मतदारसंघाच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या आमदार सुमनताई पाटील, युवा नेते रोहित पाटील यांची टीम विशाल पाटील यांच्या प्रचारात होती. शिवाय शिवसेना (उबाठा) गटाचे नेते, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी देखील विशाल पाटील यांना साथ दिली. त्यामुळे कवठेमहांकाळमध्ये देखील विशाल पाटील यांना चांगले मतदान झाले. विधानसभेला या मतदारसंघात काकांचे पुत्र लढणार असल्याची चर्चा आहे. मात्र लोकसभेचा पाटील-घोरपडे पॅटर्न विधानसभेत झाला तर भाजपला विजयाची आशा कमी आहे.

खानापूर-आटपाडीमध्ये सुहास बाबरांना चांगली संधी..

खानापूर-आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यामुळे ही जागा सध्या रिक्त आहेत. ते शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार होते. त्यामुळे त्यांचे राजकीय वारसदार सुहाब बाबर हे या मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. काका व स्व. बाबर यांचा वाद विकोपाला गेला होता. त्याचे पडसाद लोकसभेच्या निवडणुकीत उमटले. बाबर गटाचे तानाजी पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विशाल पाटील यांना साथ दिली. त्यामुळे या मतदारसंघातून विशाल पाटलांना तब्बल साडेसोळा हजाराचे मताधिक्य मिळाले. तर दुसरीकडे माजी आमदार सदाशिव पाटील यांचे पूत्र वैभव पाटील विधानसभेला इच्छूक आहेत. ते राष्ट्रवादी (अजितदादा पवार) गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी अजितदादा गटात प्रवेश करणे काहींना रूचले नाही. त्यामुळे त्यांचे समर्थक माजी नगरसेवक देखील विशाल पाटील यांच्या प्रचारात दिसले. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत सुहास बाबर यांना चांगली संधी असणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज