rajkiyalive

अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळात कोट्यवधीचा घोटाळा

crores-scam-in-annasaheb-patil-financial-corporation

जनप्रवास । अनिल कदम

अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळात कोट्यवधीचा घोटाळा : सांगली ः मराठा समाजातील तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. लाभार्थींच्या रकमेवरच अधिकारी, कर्मचार्‍यांनी डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले. शासनाने महामंडळाला लाभार्थींच्या व्याज परताव्याच्या रकमेवर बोगस बैठका, विमान वारी आणि जेवणावळीवर खर्च करण्यात आल्याबाबतचा आक्षेप लेखापरीक्षणात नोंदविण्यात आला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सुमारे 10 कोटी रुपयांचा व्याज परतावा थकला आहे, त्यामुळे लाभार्थी अडचणीत सापडल्याचे स्पष्ट झाले. याकडे महामंडळाच्या अध्यक्षांचेही दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.

अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळात कोट्यवधीचा घोटाळा

राज्यातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाने 27 नोंव्हेबर 1998 रोजी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली. या महामंडळाद्वारे विविध योजना बेरोजगारापर्यंत पोहोचून त्यांना सक्षम बनवणे, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, आर्थिकदृष्ट्या मागास घटकांचा सामाजिक विकास घडवून आणण्याचे काम करण्यात येत आहे. मराठा समाजाला उद्योजक बनविण्याकरिता ज्या विविध योजना आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे फार मोठे योगदान आहे.

राज्यामध्ये जवळपास 92 हजार 495 लाभार्थी संख्या असून, त्यांना सात हजार 201 कोटीपर्यंत बँकेकडून कर्जपुरवठा करण्यात आला आहे. कर्जापोटी व्याज स्वरूपात जवळपास 780 कोटींचा व्याज परतावा महामंडळाकडून केला आहे. हे महामंडळ पूर्णत: ऑनलाईन पध्दतीने काम करीत असून, प्रत्यक्षात लाभार्थ्यांना कर्ज न देता व्यवसाय करणार्‍या लाभार्थ्यांना बँकेकडून कागदपत्राची संपूर्ण पाहणी व तपासणी करूनच बँकांमार्फत कर्ज दिले जाते. त्या कर्जावरील 12 टक्केपर्यंत व्याज हे महामंडळमार्फत दिले जाते. महामंडळामध्ये ही संपूर्ण प्रक्रिया करण्याकरिता विभाग, जिल्हा व मुख्य कार्यालय स्तरावर कंत्राटी स्वरूपात कर्मचार्‍यांची नेमणूक केली आहे. त्यांच्याकडून वेळोवेळी योग्य पध्दतीने काम करून घेणे हे प्रशासकीय प्रमुख म्हणून व्यवस्थापकीय संचालक यांची जबाबदारी आहे; परंतु त्यांच्याकडून या सर्व बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याची बाब उघडकीस आली आहे.

व्याज परताव्याच्या रकमेवर बोगस बैठका, जेवणावळी, विमानवारी, लेखापरीक्षणात आक्षेप, सहा महिन्यांपासून परतावा थकला

महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी जिल्ह्यातील बैठका घेणे बंधनकारक आहे, परंतु कागदोपत्री बैठका घेवून बोगस खर्च दाखविण्यात आला आहे. बैठकासाठी जेवणावळी मोठा खर्च करण्यात आला. अनेक कामांनिमित्त विमान प्रवास दाखवून लाखो रुपयांची लूट करण्यात आली आहे. हॉटेलमधील जेवणावळीत मटण, मासे आणि चिकन ताटाचा खर्चही दाखविण्यात आल्याची गंभीर बाब लेखापरीक्षणात उघडकीस आली आहे. अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा कंत्राटी कर्मचार्‍यांकडून करण्यात आला आहे.

शासनाकडून व्याज परताव्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. या निधीतून व्याज परताव्यासह कंत्राटी कर्मचार्‍यांचे मानधन देणे आवश्यक आहे. परंतु अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी शासनाने दिलेला निधी बैठका, जेवणावळी आणि विमान वारीसाठी खर्च केला आहे. महामंडळाचा लाभार्थी प्रत्येक महिन्याला हप्ता भरतो, तो भरल्यानंतर सेतू केंद्रामध्ये जावून महामंडळाच्या संकेतस्थळावर बँकेचे स्टेटमेंट अपलोड करीत आहे. राज्यातील काही जिल्ह्यात सहा महिने तर पश्चिम महाराष्ट्रातील लाभार्थींना चार महिन्यांपासून व्याज परतावाच मिळालेला नसल्याची बाब उघडकीस आली आहे. सुमारे 10 कोटी रुपयांचा व्याज परतावा थकला आहे.

महामंडळाकडून व्याज परतावा जमा होत नसल्याबाबत जिल्हास्तरावर समन्वयकांशी संपर्क साधला जात आहे. त्यांच्याकडून ठोस माहिती मिळत नाही. कर्जाचा हप्ता आणि व्याज भरुनही महामंडळाकडून वेळेत मिळत नसल्याने लाभार्थी आर्थिक अडचणीत सापडल्याचे स्पष्ट झाले. व्याज परतावा आणि घोटाळ्याबाबत महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यासह राज्य सरकार कोणती भूमिका घेणार याकडे मराठा समाजातील लाभार्थींचे लक्ष लागले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात चार महिन्यांपासून परतावाच नाही

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून राज्यातील काही जिल्ह्यात सहा महिने तर पश्चिम महाराष्ट्रातील लाभार्थींना चार महिन्यांपासून व्याज परतावाच मिळालेला नाही. कर्जाचा हप्ता आणि व्याज वेळेत भरुनही महामंडळाकडून व्याज परतावा मिळत नसल्याने लाभार्थी आर्थिक अडचणीत सापडल्याचे स्पष्ट झाले.

अनुदानाचा कुठे केला खर्च

व्याज परतावा अनुदानाचा जादा खर्चाचा आक्षेप,
कागदोपत्री बैठका घेवून बोगस व अतिरिक्त खर्च,
विमान प्रवास दाखवून लाखो रुपयांची लूट,
हॉटेलच्या जेवणावळीत मटण, मासे आणि चिकन ताटाची बिले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज