जनप्रवास । प्रतिनिधी
SANGLI FLOOD NEWS : पुराचे पाणी शहरातील सूर्यवंशी प्लॉटमध्ये घुसले : कोयना व वारणा धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू असल्याने कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. 24 तासात येथील आयर्विन पुलाच्या पाण्याच्या पातळीत साडेतीन फुटाने वाढ होऊन पाणी पातळी 30.8 फुटावर पोहचली आहे. त्यामुळे शहरातील सूर्यवंशी प्लॉटमध्ये पाणी शिरले. मनपा प्रशासनाने ताडीने या भागातील 10 कुटुंबियांतील 56 व्यक्तिंचे स्थलांतर मदत केंद्रात केले आहे. तर सांगलीवाडीच्या स्मशानभूमीत देखील पुराचे पाणी शिरले आहे.
SANGLI FLOOD NEWS : पुराचे पाणी शहरातील सूर्यवंशी प्लॉटमध्ये घुसले
गेल्या काही दिवसांपासून सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कृष्णा व वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत चालली आहे. येथील आयर्विन पुलाच्या पाण्याची पातळी शनिवारी रात्री 18 फूट होती ती रविवारी रात्री नऊ फुटाने वाढून 27 फूट झाली होती. बुधवारी त्यामध्ये आणखी साडेतीन फुटाने पाणी पातळी वाढली. सध्या आयर्विन पुलाची पाणी पातळी 30.7 फुटांवर पोहचली आहे. त्यामुळे नदी काठावरील सूर्यवंशी प्लॉटमधील घरांमध्ये पुराचे पाणी घुसले. महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी पूरपट्ट्यात भेट देऊन पाहणी केली.
महापालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सूर्यवंशी प्लॉटमधील कुटुंबियांचे बुधवारी सकाळी स्थलांतर केले.
पूरपट्ट्यातील 10 कुटुंबियातील 56 लोकांचे स्थलांतर केले आहे. यापैकी 7 कुटुंबातील 23 लोकांचे स्थलांतर महापालिकेच्या शाळा नंबर तीन व सतरामधील निवारा केंद्रात केले आहे. या ठिकाणी 19 मोठे लोक तर 7 मुले आहेत. तर आरवाडे प्लॉटमधील 3 कुटुंबाचे अन्य ठिकणी स्थलांतर केले आहे. यासह 6 कुटुंबातील 30 जणांचे स्थलांतर केले आहे. निवारा केंद्रात महापालिकेने केलेली शौचालयाची, स्नानगृहाची, पिण्याच्या पाण्याची, औषधांची आणि जेवणाची व राहण्याची सोय केली आहे.
सांगलीवाडी येथील स्मशानभूमीत देखील पुराचे पाणी शिरले आहे.
कोयना धरणात सध्या 72 टीएमसी पाणीसाठा आहे. 75 टीएमसीवर पाणीसाठा गेल्यानंतर धरणातून विसर्ग होण्याची शक्यता आहे. धरणातून विसर्ग सुरू केल्यास कृष्णा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने नदी काठच्या नागरिकांना सतर्क केले जात आहे. प्रशासनाने नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी निवारा केंद्राची सोय केली आहे.
दरम्यान, सांगलीतील पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेल्या भागात आमदार सुधीर गाडगीळ यांनी भेट देत पाहणी केली. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक संजय मोरे, माजी स्थायी सभापती धीरज सूर्यवंशी, इमरान शेख आदी महानगरपालिकेचे अधिकारी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते. तर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, अॅड. स्वाती शिंदे यांनी देखील पूरग्रस्त भाग व निवारा केंद्राची पाहणी केली.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.