rajkiyalive

rajarambapu patil : सांगली,सातारा जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाचा पाया रचणारे अव्दितीय व्यक्तिमत्व लोकनेते राजारामबापू पाटील !!

अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक,

कार्याध्यक्ष, सांगली जिल्हा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष, विटा.

rajarambapu patil : सांगली,सातारा जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाचा पाया रचणारे अव्दितीय व्यक्तिमत्व लोकनेते राजारामबापू पाटील !! : लोकनेते राजारामबापू पाटील यांची आज जयंती विद्यापीठाच्या योगदानासाठी शिवाजी विद्यापीठाने बापूंना मरणोत्तर डि.लिट (डॉक्टरेट) पदवी प्रदान करावी. तसेच ग्रामविकास व सहकार क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाचा गौरव म्हणून शिवाजी विद्यापीठात अध्यासन सुरु करावे, हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल!

rajarambapu patil : सांगली,सातारा जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाचा पाया रचणारे अव्दितीय व्यक्तिमत्व लोकनेते राजारामबापू पाटील !!

स्वातंत्र्यपूर्व ब्रिटीश राजवटीच्या काळात भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाची सुरवात झाली. 1854 मध्ये सर चार्ल्स वुड यांच्या शिक्षण विषयक खालित्यानुसार डॉ.जॉन विल्सन यांनी 18 जुलै 1857 रोजी मुंबई विद्यापीठा ची स्थापना केली. याचकाळात देशात मद्रास व कलकत्ता विद्यापीठांची स्थापना झालेली होती. मुंबई विद्यापीठ त्यावेळच्या मुंबई राज्याच्या इलाख्यात कार्यरत होते. यामध्ये मुंबई, दक्षिण महाराष्ट्र, गुजरात, सिंध प्रांत कर्नाटकातील बेळगाव वगैरे भाग यांचा समावेश होता.

स्वातंत्र्यपूर्व काळात 1832 विल्सन कॉलेज मुंबई, 1868 सेंट झेवियर्स कॉलेज मुंबई, 1880 राजाराम कॉलेज कोल्हापूर, 1885 फर्ग्युसन कॉलेज पुणे,1919 विलिंग्डन कॉलेज सांगली यांच्या माध्यमातून उच्च शिक्षण सुरु होते. स्वातंत्र्यानंतर मुंबई विद्यापीठातून 10 फेब्रुवारी 1949 रोजी पुणे विद्यापीठ स्वतंत्र झाले. पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर हे जिल्हे होते.
डॉ. बाळकृष्ण हे 1922 ते 1940 पर्यंत राजाराम कॉलेजचे प्राचार्य होते. ते विद्वान व ख्यातनाम इतिहासकार होते.

कोल्हापूरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन व्हावे, हे त्यांचे स्वप्न होते.

छत्रपती राजाराम महाराजांनी विद्यापीठाच्या कल्पनेस हार्दिक पाठिंबा दिला. नरेंद्र मंडळातील मराठी महाराजांपुढे ही विद्यापीठ स्थापनेची कल्पना राजाराम महाराज व डॉ.बाळकृष्ण यांनी मांडली. 18 संस्थानच्या राजे महाराजांनी विद्यापीठ स्थापनेस आर्थिक सहाय्य करणेचे कबूल केले. 1960 साली महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, तर शिक्षणमंत्री बाळासाहेब देसाई झाले.

बाळासाहेब देसाई यांनी शिक्षण खात्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर कोल्हापूर विद्यापीठ स्थापनेच्या दृष्टीने निश्चितपणे एक-एक पाऊल पुढे टाकण्यास सुरुवात केली. श्री.छत्रपती शिवाजी विद्यापीठ कमिटीच्या स्थापनेची घोषणा जून 1961 मध्ये मुंबई आकाशवाणीवरून केली. त्यानंतर 10 जुलै 1961 रोजी मुंबई येथील पत्रकार परिषदेत त्यांनी कमिटीतील सदस्यांची नावे जाहीर केली.

या कमिटीमध्ये प्राचार्य सी.रा.तावडे अध्यक्ष,तर सदस्य-तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी,जेष्ठ साहित्यिक प्रा.ना.सी.फडके,  .बी.एस.पाटील,छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा प्राचार्य डॉ.आर.एस. मुंगळी, विलिंग्डन महाविद्यालय सांगली प्राचार्य बाळासाहेब खर्डेकर, वेंगुर्ला-रत्नागिरी कॉलेज प्राचार्य डॉ. बी. आर. ढेकणे, राजाराम कॉलेज कोल्हापूर प्राचार्य डॉ.भगवान दास, दयानंद कॉलेज सोलापूर प्राचार्य डॉ. बी. एस. नाईक, राणी पार्वतीदेवी हायस्कूल सावंतवाडी व्ही.ए. आपटे, सदस्य सचिव-शिक्षण उपसंचालक, पुणे यांच्यासह या कमिटीत राजारामबापू पाटील यांची निवड करण्यात आली होती.

बापूंच्या शिक्षण क्षेत्रातील तळमळीने कार्य करण्याच्या वृत्तीमुळेच वयाच्या केवळ 41 व्या वर्षी शिवाजी विद्यापीठ स्थापनेच्या कमिटीत त्यांच्यापेक्षा वयाने,अनुभवाने व मानाने जेष्ठ असणार्‍या शिक्षण क्षेत्रात काम करणार्‍या अन्य सदस्यांसोबत त्यांचा समावेश करण्यात आला.
शिवाजी विद्यापीठ स्थापनेसाठी नेमण्यात आलेल्या या कमिटीने अनेक विद्यापीठांना भेटी दिल्या,माहिती मिळविली. दक्षिण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना तसेच पुणे- मुंबईसारख्या मोठ्या शहरांना भेटी देऊन शिक्षणतज्ञांकडून माहिती घेतली. या कमिटीने एकूण 126 मान्यवरांकडून तोंडी माहिती घेतली तर 646 मान्यवरांकडून प्रश्नावलीद्वारे माहिती मिळविली. या माहितीच्या आधारे अहवाल तयार केला. जानेवारी 1962 मध्ये हा अहवाल शिक्षणमंत्री बाळासाहेब देसाई यांना सादर केला.

या अहवालाच्या आधारे शिवाजी विद्यापीठ हे विधेयक 8 जून 1962 रोजी विधान परिषदेत,तर 17 जुलै 1962 रोजी विधानसभेत मांडले गेले व त्याच दिवशी मंजूर झाले. दि.1 सप्टेंबर 1962 रोजी कोल्हापूर ला शिवाजी विद्यापीठ स्थापन झाले. 8 ऑक्टोबर 1962 रोजी विद्यापीठाच्या कार्यालयीन कामकाजाचा शुभारंभ झाला तर 18 नोव्हेंबर 1962 रोजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे औपचारिक उदघाटन झाले. शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेत लोकनेते राजारामबापू पाटील यांचा मोलाचा सहभाग होता.

बापूंचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला. त्यांचे शिक्षण पुणे, बडोदा येथे झाले

त्यानंतर त्यांनी कोल्हापूर येथे कायद्याचे शिक्षण घेऊन पदवी घेतली ते वयाच्या पंच विसाव्या वर्षी वकील झाले. त्यांनी कासेगाव एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.1945 च्या जून महिन्यात ‘आझाद विद्यालय, कासेगाव’ची स्थापना केली. या विद्यालयात बापू स्वतः शिक्षक म्हणून काम करीत होते.

दरम्यान सातारा जिल्हा लोकल बोर्डाची निवडणूक लागली. तेंव्हाचा सातारा जिल्हा म्हणजे आजचा सांगली व सातारा मिळून एक लांबलचक जिल्हा होता. सातारा जिल्हा लोकल बोर्डाचे राजकारण अध्यक्ष धनजी कूपर यांच्या सत्ताकेंद्रामुळे एक वादग्रस्त विषय होऊन बसले होते. यामुळे लोकल बोर्डाच्या निवडणुकीसाठी यशवंतराव चव्हाण यांनी त्यावेळचे पाटणचे तरूण कार्यकर्ते बाळासाहेब देसाई व राजारामबापू पाटील यांना कूपरशाही विरुध्द दंड थोपटून उठण्यासाठी प्रवृत्त केले.

1946 साली बापू सातारा लोकल बोर्डात बिनविरोध निवडून आले.

बाळासाहेब देसाई हे लोकल बोर्डाचे अध्यक्ष,तर संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या स्कूल बोर्डाचे चेअरमन पदाची जबाबदारी बापूंना देण्यात आली. दक्षिण सातारा जिल्ह्यात 529 गावे होती. त्यापैकी 180 गावांमध्ये केवळ 3 वर्षाच्या काळात बापूंनी 472 शाळा बांधल्या. जत तालुक्यात कानडी – मराठी शाळांची संख्या वाढविली. खाजगी मराठी शाळांचे अनुदान वाढविले.

स्व. बापूंच्या मार्गदर्शनाखाली कासेगाव एज्युकेशन सोसायटीची घोडदौड सुरूच होती.

1 ऑगस्ट 1983 रोजी बापूंच्या 63 व्या वाढदिवशी साखराळे येथे अभियांत्रिकी महाविद्यालय आणि तंत्रनिकेतनची स्थापना करण्यात आली. दुर्दैवाने 1984 साली बापू आपल्यातून निघून गेले. त्यांचे पश्चात भगतसिंग पाटील, जयंतराव पाटील यांनी या संस्थेची धुरा अत्यंत यशस्वीपणे सांभाळली आहे. राजारामबापू इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी (आरआयटी) या संस्थेने देशातील अनेक मानाचे पुरस्कार पटकाविले आहेत. नुकतेच संस्थेला 41 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आरआयटीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा पुणे येथे पार पडला. या मेळाव्यासाठी संस्थेचे 2500 माजी विद्यार्थी 42 वेगवेगळ्या देशातून उपस्थित होते. आरआयटी आज जागतिक स्थरावर यशस्वी वाटचाल करीत आहे.

स्व.बापूंनी शिवाजी विद्यापीठ स्थापना, कासेगाव एज्युकेशन सोसायटी व लोकल बोर्ड यांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणांना उच्च शिक्षण मिळाले व शैक्षणिक क्रांती झाली. त्यामुळे आपला सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्या तील परिसर शिक्षण क्षेत्रात आघाडीवर आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज