जनप्रवास । सांगली
miraj vidhansabha news : शिवसेना (उबाठा) चा पुन्हा ‘लोकसभा पॅटर्न’ खानापूर-आटपाडी हक्काची सोडून काँग्रेसची मिरज घेतली: महाविकास आघाडीच्या जागा वाटपात पुन्हा शिवसेना (उबाठा) गटाने सांगली जिल्ह्यात ‘लोकसभा पॅटर्न’ राबविला आहे. गटाची ताकद नसलेल्या पक्ष काँग्रेसच्या मिरज मतदारसंघावर दावा करत उमेदवारी जाहीर केली आहे. तर आपल्या हक्काचा खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघ जागा वाटपात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा शिवसेना (उबाठा) गटाने काँग्रेसचे नुकसान केले आहे. यामुळे कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना उमटत आहेत.
miraj vidhansabha news : शिवसेना (उबाठा) चा पुन्हा ‘लोकसभा पॅटर्न’ खानापूर-आटपाडी हक्काची सोडून काँग्रेसची मिरज घेतली
सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला. जिल्ह्यात शिवसेना (उबाठा) गटाची ताकद मर्यादीत आहे. पण लोकसभेच्या निवडणुकीवेळी महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेना (उबाठा) गटाने घेतला. या मतदारसंघात फजिती झाली. काँग्रेसचे बंडखोर लाखाच्या मताधिक्याने निवडून आले. तर ठाकरे गटाच्या उमेदवाराची मते लाखाच्या आतच राहिली. यावरून ठाकरे गटाने विधानसभेच्या निवडणुकीत बोध घेणे आवश्यक होते. पण विधानसभेच्या निवडणुकीत देखील त्यांनी लोकसभा पॅटर्नच राबविला असल्याचे चित्र आहे.
खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा. गेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार स्व. अनिल बाबर निवडून आले होते. त्यामुळे हा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ठाकरे गटाला मिळेल आणि जिल्हा प्रमुख संजय विभूते ठाकरे गटाचे उमेदवार असतील, अशी शक्यता होती. पण ठाकरे गटाने या मतदारसंघाबरोबर काँग्रेसच्या मिरज विधानसभा मतदारसंघावर दावा केला. वास्तविक या ठिकाणी काँग्रेसकडे मोहन वनखंडे हे ताकदीने उमेदवार होते. तरी देखील काँग्रेसला ही जागा मिळाली नाही.
ठाकरे गटाने खानापूर-आटपाडी हा आपला हक्काचा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला सोडला. तर मिरजेतून तानाजी सातपुते यांना उमेदवारी जाहीर करून टाकली. त्यामुळे या मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाले आहेत. या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत करावी, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्ते करत आहेत. मोहन वनखंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पण पक्षाकडून अद्याप अधिकृत घोषणा देखील झालेली नाही. जे सांगली लोकसभेला घडले आहे तेच आता मिरज विधानसभेला घडत आहे. ठाकरे गटाकडून काँग्रेसचे खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्ते करू लागले आहेत.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.