rajkiyalive

sangli news : सांगली-कोल्हापूर रस्त्याच्या कामाला नवीन वर्षात सुरूवात…

1200 कोटींच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू

sangli news : सांगली-कोल्हापूर रस्त्याच्या कामाला नवीन वर्षात सुरूवात… : सांगली-कोल्हापूर महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला नवीन वर्षात सुरूवात होणार आहे. या कामासाठी केंद्रीय वाहतूक मंत्र्यांनी 1192 कोटी 84 लाखांचा निधी मंजूर केला असून ‘हायब्रीड अ‍ॅन्युईटी मॉडेल’च्या धर्तीवर या रस्ता करण्यात येणार आहे. याच्या निविदा प्रक्रियेच्या कामाला सुरूवात झाली आहे. त्यानंतर भूसंपादन करून प्रत्यक्षात कामाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे सांगलीकरांचा कोल्हापूरचा प्रवास सुखकर होईल.

sangli news : सांगली-कोल्हापूर रस्त्याच्या कामाला नवीन वर्षात सुरूवात…

गेल्या बारा वर्षांपासून सांगली-कोल्हापूर रस्ता वादात अडकला आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा रस्ता पूर्वी सुप्रिम कंपनीकडे बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा, या तत्वावर दिला होता. मात्र ठेकेदाराने केवळ 65 ते 70 टक्के काम करून टोल लावण्याची भूमीका घेतल्याने वाद सुरू झाला होता. टोल वसुलीवरून निर्माण झालेला वाद 2015 पासून न्यायालयात आहे. दरम्यान, अनेक ठिकाण असलेल्या अपूर्ण कामांमुळे महामार्ग धोकादायक बनला आहे. या मार्गावर होणार्‍या अपघातात अनेकांचे बळी गेले आहेत. त्यामुळे हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करावा, अशी मागणी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार, आमदारांनी केली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतर केला होता.

त्यानुसार कोल्हापूर-सांगली हा महामार्ग रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गात विलीन केला. कोल्हापूर-सांगली महामार्गाचे काम करणार्‍या कंपनीला भरपाई देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ना. नितीन गडकणी यांनी ऑक्टोबरमध्ये सांगली-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग-166 वरील अंकली (सांगली) ते शिरोली (कोल्हापूर) पर्यंतचा रस्ता चौपदरीकरणासाठी 1192 कोटी 84 लाखांच्या निधीला मंजुरी दिली होती. सध्या रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे काम गतीने सुरू असून अंकली ते सोलापूर या मार्गाचे काम पूर्ण झाले असून वाहतूक देखील सुरू झाली आहे. तर चोकाक ते आंबा आणि पुढे रत्नागिरीपर्यंत काम सुरू झाले आहे. आता अंकली (सांगली) ते कोल्हापूरपर्यंतच्या कामाला सुरूवात होणार आहे.

याची निविदा प्रक्रिया आता सुरू झाली आहे. दरम्यान, या महामार्गावरील चोकाक ते अंकलीपर्यंतच्या कामासााठी संपादीत होणार्‍या जमिनीला चौपट भरपाई द्यावी, अशी मागणी बाधीत शेतकर्‍यांनी केली आहे. या मार्गासाठी मोजणीला विरोध करून शेतकर्‍यांना राष्ट्रीय प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना परत पाठवले होते. या सर्व पार्श्वभूमीवर चौपट भरपाईबाबतचा निर्णय होणार का? याकडे लक्ष लागले आहे. मात्र नवीन वर्षात या कामाला सुरूवात होणार असल्याने सांगलीकरांचा कोल्हापूर प्रवास सुखकर होण्याची अपेक्षा आहे.

‘हायब्रीड अ‍ॅन्युईटी मॉडेल’ म्हणजे काय?

रस्ते विकासाच्या ‘हायब्रीड अ‍ॅन्युईटी मॉडेल’नुसार प्रकल्पाच्या खर्चाची 60 टक्के रक्कम सरकार आणि 40 टक्के रक्कम खासगी उद्योजकांकडून समभाग आणि कर्जाव्दारे उभारली जाईल. सरकारच्या सहभागाची 60 टक्के रक्कम, बांधकाम कालावधीत प्रगतीप्रमाणे पाच समान हफ्त्यात प्राप्त होईल. उद्योजकांची 40 टक्के रक्कम प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर दर सहा महिन्यांनी हप्त्याने सरकारकडून दहा वर्षांच्या कलावधीत अदा केली जाईल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दहा वर्षांच्या देखभाल, दुरूस्तीची जबाबदारी उद्योजकाची असून, देखभालीचा खर्च सरकारमार्फत करण्यात येणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज