sangli crime news : विट्यात फटाके गोडाऊनमध्ये भीषण स्फोट वृध्देचा होरपळून मृत्यू ; अन्य सहाजण जखमी : विटा येथील यशवंतनगरमधील मध्यवर्ती ठिकाणी असणार्या साई कापड दुकानासमोरील दत्तात्रय तारळकर यांच्या कार्तिक होलसेल फटाके विक्रीच्या गोडाऊनला अचानक लागलेल्या भीषण आगीत 72 वर्षीय वृध्द महिलेचा होरपळून मृत्यु झाला. तर अन्य सहाजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर विटा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.
sangli crime news : विट्यात फटाके गोडाऊनमध्ये भीषण स्फोट वृध्देचा होरपळून मृत्यू ; अन्य सहाजण जखमी
मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला. अन्यथा मोठ्या प्रमाणावर जीवित्तहानी झाली असती. आगीत गंभीर जखमी झालेल्या कलावती शिवदास तारळकर (वय 72) या वृध्देचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दत्तात्रय शिवदास तारळकर (वय 56), त्यांची पत्नी वर्षा दत्तात्रय तारळकर (वय 52), मुलगी दिपाली दत्तात्रय तारळकर (वय 28), योगिता शंकर पवार, मानसी शंकर पवार व कल्पना विजय जाधव असे एकूण अन्य सहाजण जखमी झाले असून त्यांच्यावर विटा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची विटा पोलीस ठाण्यात नोंद झालेली आहे. यशवंतनगरसारख्या मध्यवर्ती ठिकाणी फटाक्यांच्या गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीमुळे विटा शहरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, दत्तात्रय तारळकर यांचे यशवंतनगरमध्ये साई कापड दुकानासमोर स्वत:च्या राहत्या बंगल्यात कार्तिक होलसेल फटाके विक्रीचे दुकान आहे. गेल्या 15 – 20 वर्षापासून ते फटाके विक्रीचा व्यवसाय करतात. दरम्यान आज बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. त्यामुळे घरातील गोडाऊनमध्ये असलेल्या फटाक्यांच्या स्टॉकने पेट घेतला. फटाके हे ज्वलंनशील असल्याने बघता – बघता गोडाऊनमधील सर्व फटाक्यांनी पेट घेतला. त्यामुळे फटाक्यांचा स्फोट होऊन भीषण आग लागली. क्षणार्धात लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले.
गोडाऊनमधील सर्व फटाक्यांचा माल जळून खाक झाला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच विटा नगरपालिकेचा अग्नीशमन बंब व पाण्याचा टँकर घटनास्थळी दाखल झाला. मात्र बंगल्याच्या पाठीमागे असलेेल्या गोडाऊनकडे जाण्यासाठी दोन्ही बाजूस अरूंद बोळ असल्याने आग विझवण्यात अडथळा निर्माण झाला होता. प्रसंगावधान राखत काही जागरूक व धाडसी युवकांच्या मदतीने नगरपालिकेचा अग्नीशमन पथकाने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु फटाके पेटतच होते. काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले.
परंतु गोडाऊनमधील फटाके जळून भस्मसात झाले होते. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे हे पोलीस कर्मचार्यासह घटनास्थळी दाखल झाले. तातडीने पंचनामा सुरू केला. या भीषण आगीत कलावती शिवदास तारळकर (वय 72) या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांचा विटा ग्रामीण रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दत्तात्रय शिवदास तारळकर (वय 56), त्यांची पत्नी वर्षा दत्तात्रय तारळकर (वय 52), मुलगी दिपाली दत्तात्रय तारळकर (वय 28), योगिता शंकर पवार, मानसी शंकर पवार व कल्पना विजय जाधव असे एकूण अन्य सहाजण जखमी झाले असून त्यांच्यावर विटा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत विटा ग्रामीण रूग्णालयाचे डॉ. रजपूत यांनी विटा पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे.
फटाके विक्री की फटाके निर्मिती कारखाना ?
गेल्या 4 – 5 वर्षापुर्वी विटा – सांगली रस्त्यालगत असणार्या एका नामांकित फटाके विक्री व निर्मिती करणार्या कारखान्याला भीषण आग लागून स्फोट झाला होता. ही घटना अलिकडची ताजी असतानाच प्रशासनाच्या गांधारीच्या भूमिकेमुळे विटा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी राजरोसपणे फटाके विक्री अथवा फॅन्सी फटाके निर्मिती कारखाना सुरू असल्याचे आजच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. या उद्योगाला कुणाचा राजकीय वरदहस्त होता. एरव्ही चौकात फटाके वाजवल्यानंतर कारवाईचा बडगा उगारणारे पोलीसांना रहिवासी भागातील मध्यवर्ती ठिकाणी सुरू असणारा फॅन्सी फटाके निर्मिती कारखाना का दिसला नाही ? असे एक ना अनेक प्रश्न या घटनेच्या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.
विटा नगरपालिका व पोलीस प्रशासनाची गांधारीची भूमिका
केवळ दिवाळीत फटाके विक्रीचा परवाना जिल्हाधिकारी कार्यालयातून दिला जातो. परवाना आमच्या विभागाकडून दिला जात नाही, असे उडवाउडवीचे सोयीस्कर उत्तर विटा नगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून दिले जात आहे. विटा शहरात राजरोसपणे खुलेआम मध्यवर्ती ठिकाणी 8 ते 10 फटाके विक्रेत्यांची दुकाने आहे. शासनाच्या फटाका विक्रीच्या नियमावलीचे कोणतेही काटेकोरपणे पालन न करता खुलेआम फटाके विक्री होत असताना विटा नगरपालिका व पोलीस प्रशासनाची गांधारीची भूमिका संशयास्पद वाटते. त्यामुळे या प्रश्नी जिल्हाधिकार्यानी स्वत: लक्ष घालून या घटनेस जबाबदार असणार्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी संतप्त नागरिकातून होत आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.