जयसिंगपूर/ अजित पवार
jain samaj news : नांदणीच्या संस्थान मठाला ’ अ ’ वर्ग दर्जा देण्यासाठी प्रयत्न करू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : नांदणी (ता.) शिरोळ येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाला ’ अ ’ वर्ग दर्जा प्राप्त करून देण्याकरता प्रयत्न करू. मठाच्या विकासाकरता ज्या काही व्यवस्था कराव्या लागतील त्या पूर्णत्वास नेऊ. असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
jain samaj news : नांदणीच्या संस्थान मठाला ’ अ ’ वर्ग दर्जा देण्यासाठी प्रयत्न करू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नांदणी (ता. शिरोळ) येथे आयोजित पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सवात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ते बोलताना पुढे म्हणाले, काळया आईची सेवा करून आपल्या देशाच्या आणि राज्याची सेवा करणारे जैन समाजाचे लोक आहेत. जैन समाजाची जी तत्वे आहेत ती जगा आणि जगू द्या अशी सांगणारी तत्वे आहेत. जगाच्या पाठीवर आपण विचार केला तर हजारो विचार तयार झाले. ते विचार संपून गेले. पण काहीच विचार असे आहेत ते शाश्वत आहेत.

शाश्वत विचारातला शाश्वत विचार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं जैन विचार आहे.
हजारो वर्षाचा जैन विचार हा पुण्यपुरातन विचार आहे. पण तोच विचार नित्य नूतन देखील आहे. सध्या जग वेगवेगळ्या नावाने का होईना आमचाच विचार स्वीकारत आहे हे भाग्य आहे. आपले सर्व आचार्य ज्याप्रमाणे त्याग करतात त्याप्रमाणे समाजाला सजग करणे समाजाला सन्मार्गात ठेवणे. हे कार्य आचार्यांच्या माध्यमातून होत आहे. खर्या अर्थाने अतिकठोर आणि कठीण तपस्या संपूर्ण जीवनभर करत ज्याप्रकारे सुविचार आपल्या आचार्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतात यामुळेच आपली जी पिढी आहे या पिढीमध्ये जे संस्कार आपल्याला पाहायला मिळतात.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, आचार्यश्रींनी आपले विचार जीवित आणि समृद्ध ठेवले आहेत.
एक सुसंस्कारित पिढी निर्माण करण्याचे काम सातत्याने चालले आहे. या मठाला अ दर्जा देण्याकरता राज्य शासनाच्या परीने विचारपूर्वक निर्णय घेऊ. मठाच्या विकासाकरता ज्या काही व्यवस्था कराव्या लागतील त्या पूर्ण करून घेऊ.

जैन समाजाकरता महामंडळ तयार केले आहे. हे महामंडळ नवीन आहे.
त्यामध्ये आपण काही सुधारणा सुचविल्या आहेत. नव्या पिढीला व्यवसायाच्या दृष्टीने नवीन योजना मिळाल्या पाहिजेत. यासाठी आम्ही कारवाई सुरू केली आहे. लवकरच हे महामंडळ बळकट करून त्याला चांगले आर्थिक पाठबळ देऊ .त्या माध्यमातून समाजातली नवीन पिढी स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. एक मजबूत पिढी उभा करण्याचे काम या महामंडळाच्या माध्यमातून कसं करता येईल. हा प्रयत्न आमचा निश्चित असेल.
आशीर्वचन देताना विशुद्धसागर महाराज म्हणाले, भगवान श्रीकृष्णाचा जन्म देवकीकडे झाला. पण त्यांचे पालन यशोदा ने केले आहे. भगवान महावीरांचा जन्म उत्तर भारतात झाला. पण दक्षिण भारताने भगवान महावीरांची वाणी सुरक्षित केली आहे. आचार्यांनी धर्माचे संयोजन दक्षिण मध्ये केले आहे. पण आपण दक्षिणेच्या मध्यावर आहोत. जिथे धर्म आहे तिथे सत्य आहे. रामाच्या शासन काळात जसे साधुसंत साधना करत होते. अशी साधना आता अखंड भारत देशात सुद्धा होणे गरजेची आहे. या साधनेत विघ्ने यायला नकोत.
यानंतर जिनसेन भट्टारक पट्टाचार्य म्हणाले नांदणी मठ हा दोन हजार वर्षांपूर्वीचा मठ आहे. महाराष्ट्रात दोन आणि कर्नाटकात 13 असे एकूण 15 मठ आहेत. त्यापैकी नांदणी येथील मठ 743 गावातील जैन धर्मियांचे आराध्यपीठ आहे. या मठा करता विशेष लक्ष देऊन मठाला उर्जितावस्था आणण्याकरता विशेष लक्ष द्यावे. असे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी यांची भाषणे झाली. या दोघांनी मठाला ’ अ ’ वर्ग दर्जा प्राप्त व्हावा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपल्या भाषणातून केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजेचे नेटके संयोजन केल्याबद्दल सागर शंभूशेटे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर, आम. राहुल आवाडे, आम. अशोकराव माने, आम. अमल महाडिक, आम. शिवाजी पाटील, उद्योगपती आण्णासाहेब चकोते, आम. सुरेश खाडे, माजी खासदार निवेदिता माने, माजी आम. सुरेश हाळवणकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., द.भा.जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, स्वरुपा पाटील-यड्रावकर, संभाजी भिडे, रावसाहेब पाटील, उत्तम पाटील, सरपंच संगिता तगारे, ललित गांधी यांच्यासह कमिटीचे पदाधिकारी, श्रावक-श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार सागर शंभूशेटे यांनी मानले.
म्हणूनच निमंत्रण स्वीकारले…
आपण मुख्यमंत्री झाल्यावर कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्याच कार्यक्रमाला आपण हजेरी लावली आहे. आचार्यांच्या दर्शनाबरोबरच आपल्या सर्वांचे दर्शन घेता येईल. त्याकरिता आम. राजेंद्र पाटील यड्रावकर आणि आम. राहुल आवाडे यांनी दिलेले निमंत्रण आपण स्वीकारले आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



