वर्षाला 18 हजाराऐवजी 12 हजार रुपये मिळणार, एकाच योजनेचा लाभ घेता येणार
जनप्रवास । अनिल कदम
ladki bahin yojna : सांगली जिल्ह्यातील 1 लाख महिला शेतकरी ‘नावडत्या बहिणी’ : दीड महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून जिल्ह्यातील सुमारे 1 लाख शेतकरी महिलांच्या लाभाला कात्री लावली जाणार आहे. या महिलांना वार्षिक 18 हजार रुपयांऐवजी नमो शेतकरी महासन्मान आणि पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत देण्यात येणारे प्रत्येकी सहा हजार देण्यात येणार आहेत. त्यामुळे या शेतकरी महिलांना वर्षाला 18 हजार रुपयांऐवजी 12 हजार रुपये मिळणार आहेत. याशिवाय लाडकी बहीण योजनेची रक्कम घेतलेल्या महिलांच्या खात्यातून नमो महासन्मान योजनेतून कपात केली जाणार आहे. त्यामुळे लाडकी बहीण आणि शेतकरी सन्मान या दोन्ही योजनांचा लाभ घेणार्या महिलांना सरकारने धक्का दिला आहे.
ladki bahin yojna : सांगली जिल्ह्यातील 1 लाख महिला शेतकरी ‘नावडत्या बहिणी’
मध्य प्रदेश सरकारने निवडणुकीपूर्वी लाडली बहना नावाची योजना जाहीर केली आणि या योजनेअंतर्गत मध्य प्रदेशातील महिलांना रोख रक्कम खात्यावर जमा केली होती. याचा परिणाम लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला जोरदार यश मिळाले. किंबहुना, एकतर्फी यश मिळाल्याने देशात आणि राज्यात भाजपला सत्ता बळकट करता आली. लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात जोरदार फटका बसल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या भाजप आणि शिवसेनेने गंभीरपणे विचार करून मध्य प्रदेशच्या धर्तीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. प्रतिमहिना 1500 रुपये रोख रक्कम महिलांना देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली.

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ही योजना आली
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ही योजना आली असली तरी अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात ही योजना आणली. तर भाजपने देवेंद्र फडणवीस यांना ’लाडका देवा भाऊ’ म्हणून राज्यभर प्रचार केला. विधानसभा निवडणुकीआधी तब्बल पाच हप्त्यांचे 2 कोटी 46 लाख महिलांच्या खात्यावर सात हजार पाचशे रुपये जमा करण्यात आले होते. अर्ज करतील त्या महिलांना लाभ देण्याचे धोरण राज्य सरकारने अवलंबले होते. विधानसभा निवडणुकीआधी कोणतेही निकष न लावता 2 कोटी 63 हजार महिलांचे अर्ज स्वीकारण्यात आले होते. त्यापैकी 2 कोटी 52 लाख महिलांना पात्र ठरविण्यात आले होते. नुकताच डिसेंबर महिन्याचा हप्ताही महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आला असून, आजअखेर 21 हजार 600 कोटी रुपये महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.
मध्य प्रदेशमध्ये लागू करण्यात आलेल्या योजनेबाबतही तेथील सरकारने निकष लावण्याचा निर्णय घेतला असून, सध्या केवळ 12 टक्केच महिलांना या योजनेचा लाभ मिळत असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्रात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर आता आर्थिक घडी नीट बसावी यासाठी वारेमाप खर्चाला आळा घालावा असा मतप्रवाह सुरू झाला आहे. यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरसकट देण्यात येणार्या लाभाला टाच लावली जाणार आहे. अडीच लाखांच्या वर उत्पन्न, चारचाकी वाहन आणि इतर निकष लावून महिला लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याबरोबरच राज्य सरकारच्या इतर योजनांचा लाभ घेणार्या महिलांचाही पत्ता कापण्यात येणार आहे. यामध्ये सर्वाधिक लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान आणि थेट लाभ हस्तांतर योजनेचा लाभ घेणार्या महिलांची संख्या अधिक आहे.

ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय लाईव्ह या व्हॉटसअॅप चॅनलला फॉलो करा, येथे क्लिक करा
योजना सुरू करण्याआधीच मागविली आकडेवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्याआधीच राज्य सरकारने ’डीबीटी’ आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेतील लाभार्थी महिलांची आकडेवारी मागितली होती. त्यामुळे कृषी आयुक्तालयातून पीएम किसान पोर्टलवरून आकडेवारी जमा करून महिला व बालविकास विभागाला देण्यात आली होती. 6 जुलैच्या आकडेवारीनुसार राज्यात कृषी विभागाच्या थेट हस्तांतर महिला लाभार्थ्यांची संख्या 10 लाख 90 हजार 465, तर नमो शेतकरी महासन्मान योजनेतील महिला अर्जदार 19 लाख 20 हजार 85 होती. यापैकी डीबीटी लाभार्थी 1 लाख 71 हजार 954, तर नमो शेतकरी महासन्मान योजनेतील लाभार्थी 18 लाख 18 हजार 220 इतक्या महिला होत्या.
सांगली जिल्ह्यात एक लाखावर महिला शेतकरी आहेत,
त्यांनीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे. या महिलांना नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत वार्षिक 6 हजार रुपये देण्यात येतात, तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत 18 हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे यापुढे केवळ 12 हजार रुपये प्रति शेतकरी महिला देण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील महिला लाभार्थी
नमो शेतकरी सन्मान योजना अर्जदार महिला : 1 लाख 2 हजार
थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) अर्जदार महिला : 47 हजार 3
लाडकी बहीण योजना अर्ज मंजूर ः 7 लाख 10 हजार
लाडकी बहीण पैसे जमा ः 5 लाख 7 हजार

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



