sangli crime news : अग्रण धुळगाव खून प्रकरणी पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा : 2017 साली यात्रेत केला होता तरुणाचा खून. : सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रण धुळगाव येथे श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित तमाशात दंगा करणार्यांचा पंचकमिटीकडे तक्रार केल्याच्या रागातून अशोक तानाजी भोसले याचा गुप्ती, कुकरीने भोसकून निर्घृण खून केला होता. या खून प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. डी. वाय. गौड यांनी पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर यातील एक आरोपीचा सुनावणी सुरु असताना मृत्यू झाला. याकामी सरकारी पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद अंकुश भोकरे यांनी काम पाहिले. या खटल्यात एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले.
sangli crime news : अग्रण धुळगाव खून प्रकरणी पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा : 2017 साली यात्रेत केला होता तरुणाचा खून.
संदीप दादासो चौगुले (वय 26), विशाल बिरुदेव चौगुले (वय 23), नानासो उर्फ सागर माणिक चौगुले (वय 20), कुंडलिक उर्फ कोंडीराम पांडुरंग कनप (वय 25) आणि विजय आप्पासो चौगुले (वय 23 सर्व रा. अग्रण धुळगाव) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. तर सागर बाळासो चौगुले हा मयत झाला आहे. तर बिरू पांडुरंग कोळेकर या संशयीताला निर्दोष करण्यात आले आहे. यापैकी संदीप व विशाल चौगुले गेली 7 वर्ष न्यायालयीन कोठडीत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, धुळगाव येथे यल्लमा देवीची यात्रा प्रत्येक वर्षी भरत असते. दी. 02 डिसेंबर 2017 रोजी देवीच्या यात्रेनिमित्त तमाशाचा कार्यक्रम होता. तमाशाच्या कार्यक्रमांमध्ये संशयित आरोपी दंगा करत असल्याची तक्रार मयत अशोक व व त्यांचा भाऊ प्रकाश भोसले यांनी केली होती. त्याचा राग मनात धरून रात्री एकच्या दरम्यान आरोपींनी अशोक भोसले गुप्ती कुकरी व काट्याने अशोक व प्रकाशवर खुनी हल्ला केला. अशोक यांच्या मांडीवर अनेक कमरेखाली धारदार हत्यारांनी भोकसून अनेक वार केले. अशोक याला कवठेमंकाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले तिथे डॉक्टरानी मृत घोषित केले.
याप्रकरणी कवठेमंकाळ पोलिसांमध्ये 7 आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास कवठेमहांकाळचे तत्कालीन निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी केला. यानंतर पुढील तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे तत्कालीन निरीक्षक राजन माने यांच्याकडे सुपूर्त केला होता. त्यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले. बचाव पक्षातर्फे फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांवर प्रचंड दबाव आणला होता.

परंतु पैरवी कक्षातील उपनिरीक्षक अशोक तुराई, श्रीमती वंदना मिसाळ, कवठेमंकाळ पोलीस ठाण्याचे वैभव काळे, शहाजी जाधव, दता बागनकर यांनी सरकार पक्षाला विशेषता साक्षीदारांच मनोधैर्य वाढविण्यासाठी व योग्य पद्धतीने साक्ष देण्यासाठी सरकार पक्षाला मदत केली. याशिवाय मयत अशोक यांचे वडील तानाजी भोसले भाऊ व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार प्रकाश भोसले दुसरा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ज्ञानेश्वर भोसले यांची महत्त्वपूर्ण साक्ष ठरली. तसेच सरकार पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयाचे अनेक न्याय निवाडे न्यायालयात हजर केले. या साक्षी व उपलब्ध पुराव्यावरून न्यायालयाने पाचवी आरोपींना शिक्षा सुनावली.
सर्व आरोपींना फाशी द्या : सरकारी वकिलांचा युक्तिवाद…
प्रत्यक्षात हातात हत्यार घेऊन गुन्हा केला नसला तरी गुन्ह्याच्या ठिकाणी हजर राहून अन्य गुन्हेगारांना गुन्हा करण्यास प्रोत्साहन देणे हा देखील गुन्हेगारच ठरतो. त्यामुळे अशोक भोसले खून खटल्यातील सर्व आरोपीना फाशीची शिक्षा सुनवावी म्हणजे समाजातील गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल असा युक्तिवाद सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी केला होता. शिक्षा झालेल्या आरोपी पैकी काही जणांनी प्रत्यक्ष मारहाण केलेली नव्हती. परंतु ते घटनास्थळी हजर होते. सरकार पक्षातर्फे सर्वोच्च न्यायालयाचा नित्यानंद विरुद्ध उत्तर प्रदेश या खटल्याचा न्यायनिवाडा हजर केला. न्यायालयाने हा निवाडा ग्राह्य धरून सर्व आरोपींना एकसमान शिक्षा सुनावली.
जल्लोषाची सर्व तयारी वाया गेली….
सर्व आरोपी निर्दोष सुटतील अशी आरोपींची व त्यांच्या समर्थकांची अपेक्षा होती. त्यासाठी निकालाच्या काही दिवस अगोदर आरोपींच्या गावातील साथीदारानी वाघ परत येतोयअशा स्वरूपाचे मोबाईलवर स्टेटस ठेवले होते. निकाला दिवशी न्यायालय परिसरात त्यांचे सुमारे शंभर समर्थक चार चाकी गाड्या घेऊन आले होते. गावात उघड्या जीपमधून मिरवणूक काढण्यासाठी गुलाल व अतिषबाजीची तयारी करण्यात आली होती. न्यायालयाने निकाल जाहीर करतात आलेले समर्थक न्यायालय आवारातून प्रसार झाले.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



