rajkiyalive

sangli crime news : मिरजेत नशेचे इंजेक्शन आणि गोळ्या विक्री करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

मेडिकल व्यवसाय करणार्‍यांचा गोरखधंदा : तिघांना केली अटक : दीड हजार इंजेक्शन नशेच्या गोळ्यासह 14 लाखांचा मुद्देमाल जप्त.

 मेडिकल व्यावसायिकाकडून सुरु असलेल्या नशेच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप शिंदे यांना मोठे यश आले आहे. नशा करण्यासाठी वापरण्यात येणारे मेफेनटर्माइन नावाच्या इंजेक्शन आणि गोळ्यांचा बेकायदा साठा करणार्‍या सांगलीतील एका केमिस्ट शॉपचालकासह तिघांच्या मुसक्या आवळल्या.

sangli crime news : मिरजेत नशेचे इंजेक्शन आणि गोळ्या विक्री करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

तिघांकडून 6 लाख 16 हजार 641 रुपयांची तब्बल 1 हजार 507 इंजेक्शन तसेच नशेच्या गोळ्या आणि 8 लाख 30 हजार रुपयांची दोन वाहने असा एकूण 14 लाख 46 हजार 641 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. सांगली जिल्ह्यातील एवढ्या मोठ्या प्रमाणात नशेखोरीविरोधात झालेली ही पहिलीच मोठी कारवाई आहे. दरम्यान, या प्रकरणी विक्री करणारे, विकत घेणारे, स्टॉक कोठून आणला याची संपूर्ण पाळेमुळे खणणार असल्याचा इशारा पोलीस अधिक्षक संदिप घुगे यांनी पत्रकार बैठकीत दिला. यावेळी अपर अधीक्षक रितू खोकर, मिरजेचे उपअधीक्षक प्रणील गिल्डा, एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे उपस्थित होते.

अटक केलेल्यांमध्ये मुख्य आरोपी आशफाक बशीर पटवेगार (वय 50, रा. असुबा हॉटेलसमोर, पत्रकारनगर, सांगली) याच्यासह विक्री करणारे रोहित अशोक कागवाडे (वय 44, रा. शामरावनगर, आकांक्षा मेडिकलच्या वरील बाजूस, सांगली ) आणि ओंकार रविंद्र मुळे (वय 24, रा. गव्ह. कॉलनी, विजय कॉलनी, विश्रामबाग, सांगली) यांचा समावेश आहे.

सांगली, मिरजेसह जिल्ह्यात नशेखोरीच्या प्रमाणात वाढ होत असल्याच्या बर्‍यात तक्रारी पोलीस प्रशासनास प्राप्त झाल्या होत्या. वैद्यकीय वापरासाठी असलेल्या इंजेक्शनचा वापर बेकायदेशीरित्या नशा करण्यासाठी होत असल्याची माहिती पोलिसांना होती.

संशयितांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथके कार्यरत होती. सोमवारी महात्मा गांधी पोलीस ठाण्यातील कर्मचारी राहुल क्षीरसागर यांना डॉ. आंबेडकर उद्यानाच्या मागील बाजूस नशेकरिता वापरण्यात येणार्‍या औषधांची बेकायदा विक्री करण्यासाठी दोघेजण येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अन्न औषध विभागाचे निरिक्षक राहुल करंडे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने सापळा लावला. काही वेळाने दोन इसम येवून तेथे थांबले. एकाने त्याच्या पिशवीतून काही वस्तू काढून त्याच्या सोबत आलेल्या इसमाकडे दिल्या.

दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे नशेकरिता वापरत असलेल्या मेफेनटर्माइन इंजेक्शनच्या 51 बाटल्या आढळल्या. संशयितांकडे ही इंजेक्शन वापरासाठी वैद्यकीय अधिकार्‍यांची चिठ्ठी नव्हती. पोलीस चौकशीत दोघांनी त्यांच्याकडे असलेली इंजेक्शन केमिस्ट शॉपचालक आशपाक पटवेगार याच्याकडून घेतली असल्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीने सांगलीतील पत्रकारनगर येथे असणार्‍या पटवेगार याच्या घरावर छापा टाकला. त्याने प्रारंभी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली.

पोलिसांनी घरात तपासणी केली असता दुसर्‍या मजल्यावरील असलेल्या खोलीत इंजेक्शनचे लहान मोठे बॉक्स मिळून आले. त्यामध्ये इंजेक्शन आणि काही गोळ्या असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी सर्व मुद्देमाल हस्तगत केला. नशेखोरीच्या रॅकेटची व्याप्ती मोठी असल्याचा पोलिसांना अंदाज आहे. त्यादृष्टीकोनातून पुढील तपास करण्यात येत आहे. सदरची कारवाई महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप शिंदे, पोलीस उपनिरिक्षक संदिप गुरव आणि अफरोज पठाण, श्रेणी उपनिरिक्षक धनंजय चव्हाण आणि उदय कुलकर्णी, पोलीस कर्मचारी सचिन कुंभार, सर्जेराव पवार, राजेंद्र हारगे, विनोद चव्हाण, जावेद शेख, मोसिन टिनमेकर यांच्या पथकाने केली.

नशेच्या ड्रग्ज इंजेक्शनची पाळेमुळे खणणार : पोलीस अधीक्षक घुगे.

मिरज पोलिसांनी नशेसाठी वापरण्यात येणार्‍या इंजेक्शनचा मोठा साठा हस्तगत केला आहे. यामध्ये सध्या तीन संशयितांना अटक करण्यात आली असली तरी यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. केमिस्ट शॉपचालकास मेफेनटर्माइन इंजक्शनचा पुरवठा स्टॉटिक्सकडून की डिलर मार्फत झाला याची माहिती घेण्यात येत आहे. नागरिकांनी देखील नशेखोरीला हातभार लावणार्‍या काही संशयित इसमांची माहिती असेल तर त्यांनी पोलिस प्रशासनास द्यावी. जिल्ह्यातील नशेखोरीची पाळेमुळे खणून काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

बंदी असलेलेल्या इंजेक्शनची सांगली, मिरजेत अनेकांना विक्री…

पोलिसांनी हस्तगत केलेल्या इंजेक्शनचा वापर करायचा असेल संबंधित व्यक्तीकडे वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेली चिठ्ठी लागते. त्याशिवाय त्याचा वापर करता येत नाही. तसा केल्यास संशयितांवर औषधी द्रव्य व सौदर्य प्रसाधने अधिनियम कलम क अन्वये गुन्हा दाखल करण्यात येतो. मिरजेत अटक केलेले रोहित कागवाडे आणि ओंकार मुळे हे दोघे आशपाक पटवेगार याच्याकडून 360 रुपये किंमतीचे इंजेक्शन घेवून ते काळ्या बाजारात 800 रुपयांना विक्री करत असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. दरम्यान, सदरचे इंजेक्शन कोणी कोणी खरेदी केले, त्याचा वापर कशासाठी केला गेला याचा तपास आता पोलीस घेत आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज