माजी पदाधिकारी, नगरसेवकांशी संपर्क सुरू: कामांचा आढावा
vishal patil sangli news : महापालिकेच्या निवडणुकीसाठी विशाल पाटलांची पेरणी : लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचा वारू विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने रोखला. सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठ्या मताधिक्याने पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. आता महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. या निवडणुकीसाठी आता खा. विशाल पाटील यांनी पेरणी सुरू केली असून काँग्रेसच्या माजी पदाधिकारी, व नगरसेवकांशी संपर्क साधून अडीअडचणी सोडविल्या जात आहेत. मनपा क्षेत्रातील विकासकामांचा आढावा देखील घेतला जात आहे.
vishal patil sangli news : महापालिकेच्या निवडणुकीसाठी विशाल पाटलांची पेरणी
लोकसभेच्या निवडणुका मे महिन्यात झाल्या. या निवडणुकीत महायुतीचा पराभव करण्यासाठी काँग्रेस पक्षाबरोबर भाजपमधील नाराज व इतर काही पक्षातील लोकांनी अपक्ष उमेदवार खा. विशाल पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे या निवडणुकीत त्यांचा विजय सोपा झाला. तर राज्यात देखील काँग्रेसला चांगले यश मिळाले. पण हा विजयोत्सव चार महिनेच टिकला. विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे गणित बिघडले. जिल्ह्यात काँगे्रेसचे दोन आमदार असताना आणखी दोन आमदार वाढतील, अशी अपेक्षा होती. मात्र अपेक्षा भंग झाला. दोन आमदारांपैकी जिल्हाध्यक्ष असलेले विक्रमसिंह सावंत यांचा पराभव झाला. केवळ आ. विश्वजीत कदम हे जिल्ह्यात नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात निवडून आलेले एकमेव काँग्रेसचे आमदार राहिले.
लोकसभेच्या निवडणुकीत महापालिका क्षेत्रात विशाल पाटील यांना मताधिक्य होते.
मात्र विधानसभेच्या निवडणुकीत मताधिक्य घटले. त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी ही धोक्याची घंटा आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्यात वाद झाला. पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर जयश्रीताई पाटील यांनी बंडखोरी केली. काँग्रेसचे अनेक माजी पदाधिकारी व माजी नगरसेवक हे जयश्रीताई पाटील यांच्याबरोबर राहिले. त्यानंतर पक्षाने जयश्रीताई पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याने त्या पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे पृथ्वीराज पाटील देखील काँग्रेसमध्ये म्हणावे तसे अॅक्टिव्ह होताना दिसत नाहीत. त्यांच्यावर भाजपकडून देखील गळ टाकला जात आहे.
आ. गोपीचंद पडळकर व आ. सत्यजीत देशमुख यांनी पृथ्वीराज पाटील यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.
त्यामुळे महापालिकेत काँग्रेस पक्षाची ताकद कमी होत चालली आहे. आ. विश्वजीत कदम यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीसाठी खा. विशाल पाटील यांनी पेरणी सुरू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. यावर 25 फेबु्रवारीला सुनावणी होणार आहे. त्यामुळे मे महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता दाट आहे. त्या दृष्टीने आता खा. विशाल पाटील यांनी नगरसेवकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. तर पक्षापासून बाजुला चाललेल्या नगरसेवकांना पुन्हा काँग्रेसच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्याबरोबर बैठका घेत आहेत. काँग्रेसच्या तीन माजी महापौरांबरोबर देखील त्यांनी चर्चा केल्या आहेत.
सन 2018 च्या महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होती, तरी देखील अपयश आले होते.
या निवडणुकीत महाविकास आघाडीची ताकद वाढविण्यासाठी खा. विशाल पाटील यांचा प्रयत्न असणार आहे. त्या दृष्टीने त्यांनी फिल्डिंग देखील लावली आहे. त्यामुळे काँग्रेसचे काठावरचे काही नगरसेवक आता थांबले आहेत. निवडणुका लागण्यानंतर हे माजी नगरसेवक काय भूमीका घेणार? हे देखील महत्वाचे ठरणार आहे. पण विखुरलेली काँग्रेस एकजीव करण्यासाठी आता खा. विशाल पाटील रसावले आहेत.
सहा महिन्यात दोनवेळा मनपाचा आढावा
महापालिकेत प्रशासकराज सुरू आहे. राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजपच्या माजी नगरसेवकांची कामे जोमात होतात. या उलट काँग्रेसच्या माजी नगरसेवकांची कामे थांबली आहेत. त्यामुळे खासदारपदी निवड झाल्यानंतर महिन्यातच विशाल पाटील यांनी महापालिकेत आढावा बैठक घेऊन योजनांची माहिती घेतली. तर काँग्रेस नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामांच्या अडचणी सोडविण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या. दोन दिवसांपूर्वी त्यांनी दुसरी बैठक आयुक्तांबरोबर घेतली. त्यावेळी देखील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांची कामे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.