rajkiyalive

sangli maishal yojna news : म्हैसाळ योजना सौर ऊर्जेवर चालणार

sangli maishal yojna news : म्हैसाळ योजना सौर ऊर्जेवर चालणार : गतवर्षीच्या अर्थसंकल्पात म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढविणार्‍या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 1 हजार 594 कोटींची तरतूद करण्यात आली होती, वर्षाअखेरीस निधी देण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सौरऊर्जा प्रकल्पामुळे योजनेसाठी लागणार्‍या दरवर्षी सुमारे 398 दशलक्ष युनिट वीज उपलब्ध होणार आहे. सांगली जिल्ह्यातील चार व सोलापूर जिल्ह्यातील दोन तालुक्यातील 1 लाख 8 हजार 197 हेक्टर क्षेत्रास सिंचनासाठी पाणी मिळणार असून या निर्णयाने योजनेच्या वीजबिलाचा प्रश्न सुटणार असल्याचे स्पष्ट झाले.

sangli maishal yojna news : म्हैसाळ योजना सौर ऊर्जेवर चालणार

सौर प्रकल्पासाठी 1594 कोटींच्या निधीस मंत्रिमंडळाची मान्यता, वीजबिलाचा प्रश्न सुटणार

मुंबईत झालेल्या बैठकीत कृष्णा-कोयना उपसा सिंचन योजनेअंतर्गत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे व योजनेची ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी 1 हजार 594 कोटी रुपयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत ताकारी व म्हैसाळ अशा दोन स्वतंत्र उपसा सिंचन योजनांचा समावेश आहे.

सिंचन योजनेचा उद्भव कृष्णा नदीवर म्हैसाळ येथे आहे. येथून विविध टप्प्यांमध्ये 23.44 घनफूट पाणी उचलून त्याद्वारे सांगली जिल्ह्यातील मिरज, कवठेमहांकाळ, तासगांव, जत व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवेढा या तालुक्यातील अवर्षण प्रवण भागातील 1 लाख 8 हजार 197 हेक्टर क्षेत्रास सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

या प्रकल्पाच्या मंजुरीवेळीच प्रकल्पांतर्गत पाणी उपसा करण्यासाठी लागणा-या उर्जा स्त्रोतांमध्ये सौर उर्जा वापराचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा व अनुषंगिक अटी घातल्या होत्या. यामुळे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी लागणा-या विजेच्या वापरापोटी होणा-या खर्चात बचत होणार आहे. या ऊर्जा कार्यक्षम जलव्यवस्थापन व सौर ऊर्जा प्रकल्प राबविणेसाठी भांडवल निधीसहाय्याच्या प्राथमिक प्रकल्प अहवालास केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयानेही मान्यता दिली आहे.

योजनेचा वीज वापराचा खर्च कमी करणे व ग्रीन एनर्जी निर्मितीसाठी कायमस्वरुपी उपाय योजना म्हणून हा ऊर्जा कार्यक्षम जलव्यवस्थापन प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या करिता केएफडब्ल्यु जर्मन बँकेकडून 130 मिलियन युरो (अंदाजे 1 हजार 120 कोटी) कर्ज स्वरूपात व 474 कोटी राज्य शासनाची गुंतवणूक अशा 1 हजार 594 कोटी किंमतीच्या प्रकल्पासाठी त्रिपक्षीय करार करण्यास मान्यता दिली आहे.

ऊर्जा कार्यक्षम जलव्यवस्थापनात म्हैसाळ योजनेतील एकूण 108 पंपांपैकी 65 पंप नवीन ऊर्जा कार्यक्षम पंप पद्धतीचे असतील.

तसेच यात एपीएफसी व एससीएडीए- स्काडा यंत्रणा बसवणे व 200 मे.वॅ. क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी करणे, तयार झालेली वीज स्वतंत्र विद्युत वाहिनी द्वारे 220/33 के. व्ही नरवाड उपकेंद्रापर्यंत पुरवणे या कामांचा समावेश आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र वीज नियामक आयोग, महावितरण, तसेच प्रकल्पाकरिता लागणा-या वीज खरेदी करार व अनुषांगिक कार्यवाही करिता मुख्य अभियंता (विद्युत), जलविद्युत प्रकल्प, मुंबई समन्वय अधिकारी म्हणून काम पाहतील.

योजनेचे 65 पंप सौरऊर्जेवर चालणार
सिंचन योजनांच्या वीजबिलांचा प्रश्न सातत्याने भेडसावत आहे. वीजबिलांपासून कायमस्वरुपी सुटका होवून शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. म्हैसाळ योजनेतील 108 पंपांपैकी 65 पंप नवीन सौर ऊर्जा कार्यक्षम पंप पद्धतीने चालणार आहेत. त्यामध्ये एपीएफसी व एससीएडीए-स्काडा यंत्रणा बसवणे व 200 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी करणे. तयार झालेली वीज स्वतंत्र विद्युत वाहिनीद्वारे 220/33 के. व्ही नरवाड उपकेंद्रापर्यंत पुरवण्याच्या कामांचा समावेश असल्याचे जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज