sangli congrtess news : ‘स्थानिक’ निवडणुकीपूर्वीच काँग्रेस नेत्यांमध्ये जुंपली पृथ्वीराज पाटलांचे खासदार, आमदारांना आव्हान: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यातच होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील यांनी जयश्री पाटील यांना पुन्हा काँग्रेसच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत असतानाच शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. थेट प्रदेशाध्यक्षांसमोर बंडखोरी करणार्या जयश्री पाटील यांना पक्षात घेऊ नये, अशी मागणी करत आ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील यांना आव्हान दिले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. याचा परिणाम आता पक्ष वाढीवर होणार आहे.
sangli congrtess news : ‘स्थानिक’ निवडणुकीपूर्वीच काँग्रेस नेत्यांमध्ये जुंपली पृथ्वीराज पाटलांचे खासदार, आमदारांना आव्हान
लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला जिल्ह्यात चांगले दिवस आले होते. आ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली खा. विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रम सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील या पाच नेत्यांनी एकी केली होती. लोकसभेची उमेदवारी मागण्यापासून ते निवडणूक होईपर्यंत या पाच नेत्यांची एकी कायम राहिली. त्याचा चांगला परिणाम लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला झाला. दहा वर्षांपासून काँग्रेसच्या हातातून गेलेली लोकसभेची जागा पुन्हा काँग्रेसला मिळाली. खा. विशाल पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यानंतर होणार्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दोनाचे चार आमदार करण्याची संधी चालून आली होती. पण या निवडणुकीत नेत्यांची एकी विस्कटली.
सांगली व मिरजेच्या जागेवरून दोन गट पडले. मिरजेची जागा काँग्रेस पक्षाला मिळणार, या आशेवरून भाजपचे मोहन व्हनखंडे यांना काँग्रेस पक्षात घेण्यात आले. पण ऐनवेळी ही जागा मित्रपक्षाला गेली. तर दुसरीकडे सांगलीच्या उमेदवारीवरून जोरदार वाद झाला. विधानसभेसाठी काँग्रेसपक्षाकडून शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी उमेदवारी मागितली होती. पक्षाने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली आणि जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली. खा. विशाल पाटील यांच्यासह अनेक पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक जयश्री पाटील यांच्या पाठीशी राहिले. त्यामुळे जयश्री पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.
गेल्या आठवड्यात या संदर्भात आ. विश्वजीत कदम यांनी कडेगाव येथे बैठक देखील घेतली होती. या बैठकीला जयश्री पाटील यांच्यासह भाऊ समर्थक माजी नगरसेवकांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र या बैठकीला पृथ्वीराज पाटील यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जिल्ह्यातील अध्यक्षांची बैठक मुंबईत घेतली. या बैठकीत पृथ्वीराज पाटील यांनी थेट आ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील यांना आव्हान देत जयश्री पाटील यांना पक्षात घेऊ नये, अशी मागणी प्रदेशाध्यक्षांकडे केली. काँग्रेसचा पराभव त्यांच्यामुळे झाला असून भाजपचा त्यांना छुपा पाठिंबा होता असा आरोप केला आहे.
काही महिन्यात निवडणुकीची बिगुल वाजणार आहे. पण काँग्रेस नेत्यांमध्ये एकी नसल्याने काँग्रेस कार्यकर्ते आता संभ्रमात पडले आहेत.
त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांमध्येच चांगलीच जुंपली आहे. जिल्ह्यात महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकांच्या निवडणुका तोेंडावर आहेत. काही महिन्यात निवडणुकीची बिगुल वाजणार आहे. पण काँग्रेस नेत्यांमध्ये एकी नसल्याने काँग्रेस कार्यकर्ते आता संभ्रमात पडले आहेत. राज्यातील काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे. तशीच परिस्थिती जिल्ह्यातील काँग्रेसची आहे. या परिस्थितीमध्ये नेत्यांनी एकी करणे आवश्यक होते. भविष्यात होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन दुसर्या फळीतील पदाधिकार्यांना बळ देणे आवश्यक होते. पण तसे होताना दिसत नाही. यामुळे भविष्यात होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला याचे परिणाम भोगावे लागणार आहेत.
नेत्यांच्या गटबाजीने कार्यकर्ते पक्ष सोडण्याच्या तयारीत..
लोकसभेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी एकी दाखविली. पण ही एकी विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत टिकली नाही. आता महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत. तरी देखील जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते एकत्रित निर्णय घेत नसल्याने पक्षाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे मनपा क्षेत्रातील अनेक माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक याबरोबर ग्रामीण भागातील माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



