jayant patil news : गोवा विद्यापिठात राजारामबापू कला अकादमीच्या पुरस्कारांचे वितरण : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्यापासून गोवा व महाराष्ट्र राज्याचे अतूट नाते आहे. गोवा मुक्तीच्या लढ्यात महाराष्ट्रातील अनेक स्वातंत्र्य सैनिकां नी योगदान केलेले आहे. भविष्यात आम्ही साहित्य,कला आणि संशोधन क्षेत्रात आपल्या हातात-घालून काम करू,असा विश्वास गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. लोकनेते राजारामबापू पाटील हे लोकोत्तर नेते होते. त्यांनी शिक्षण,सहकार, साहित्य व शेतीच्या माध्यमातून सामान्य माणूस उभा करताना महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीत मोलाचे योगदान केलेले आहे. त्यांचे विचार व आदर्श नव्या पिढीला प्रेरणा दायी आहेत,असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
jayant patil news : गोवा विद्यापिठात राजारामबापू कला अकादमीच्या पुरस्कारांचे वितरण
गोवा विद्यापीठाच्या सभागृहात राजारामबापू पाटील ललित कला अकादमी,महाराष्ट्र राज्य आणि गोवा विद्यापीठ शणै गोंयबाब भाषा आणि साहित्य महाशाळा,मराठी अध्ययनशाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान 2025 पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. माजी मंत्री आ.जयंतराव पाटील,गोवा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.हरिलाल मेनन,महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे,अधिष्ठाता डॉ.अनुराधा वागळे, मराठी अध्ययनशाखेचे संचालक विनायक बापट,राजारामबापू पाटील सह.साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील,प्राचार्य आर.डी सावंत,अकादमीचे निमंत्रक प्रा.प्रदीप पाटील,माजी जि.प.अध्यक्ष देवराज पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
यावेळी मराठी भाषा व सांस्कृतिक इतिहासातील राष्ट्रीय योगदानाबद्दल डॉ.रमेश वरखेडे (नाशिक) यांना लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाटक व अभिनयातील योगदानाबद्दल अभिराम भडकमकर (मुंबई),कवियत्री मीनाक्षी पाटील (मुंबई),आदिवासी साहित्य संशोधनाबद्दल डॉ.तुकाराम रोंगटे (पुणे) यांना राष्ट्रीय ललित कला सन्मान,तर ललित लेखन व मराठी साहित्य प्रसाराबद्दल प्रकाश जडे (मंगळवेढा), अनिल सामंत (गोवा) यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
ना.सावंत पुढे म्हणाले,गोव्यामध्ये मराठी शाळा निर्मिती आणि मराठी भाषा रुजविण्या त मराठी शिक्षकांचा मोठा पुढाकार आणि सहभाग होता. भविष्यात दोन्ही राज्यातील समन्वय वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहेत. गोवा राज्य संगीत व नाटकात आघाडीवर आहे,याचा आम्हास अभिमान आहे. माजी मंत्री आ.जयंतराव पाटील हे राजारामबापूंचे विचार व आदर्श पुढे घेऊन जात आहेत. राजारामबापू पाटील यांनी सहकार,शेती व शिक्षण क्षेत्रात केलेले भरीव कार्य नव्या पिढीला प्रेरणादायी आहे. महाराष्ट्र राज्यात सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण भागा च्या विकासाला मोठी चालना दिली आहे. ही चळवळ अधिक गतिमान करायला हवी.
आ.जयंत पाटील म्हणाले,लोकनेते राजारामबापू पाटील यांचे कार्य व विचारांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचे काम अकादमी करीत आहे. अकादमीच्या माध्यमा तून साहित्यिकांना पुरस्कार देत त्यांना अधिक प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी ही प्राचीन भाषा आहे. मराठी भाषेत प्रभावी कार्य केलेल्या, साहित्यिकांचा सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.
सदानंद मोरे म्हणाले,आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत बापूंचे नांव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. सांगली ही नाट्य पंढरी आहे,तर गोवा हे कलेचे माहेरघर आहे. कला संस्कृतीत गोव्याने महाराष्ट्राला खूप दिले आहे. भविष्यात दोन्ही राज्यांनी एकमेकांच्या देवाण-घेवाणीमधून एकमेकाला समृध्द करीत एक सेतुबंध निर्माण करावा. आजचा कार्यक्रम ही त्याची सुरुवात आहे.
डॉ वरखेडे म्हणाले,आमच्या प्रयोग शिलतेची दखल घेत आपण आम्हास सन्मानित केले आहे. स्व.बापूंनी उभा केलेल्या कासेगाव शिक्षण संस्थेचे काम मोठे आहे. आ.जयंतराव पाटील यांनी संस्थेचा इतिहास लिखित स्वरूपात आणावा. कुलगुरू हरिलाल मेनन,प्राचार्य आर.डी.सावंत, प्रा.डॉ. अनुराधा वागळे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. विनायक बापट यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.
प्रारंभी प्रा.प्रदीप पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. समारंभ समितीचे समन्वय क डॉ.हेमंत अय्या (गोवा) यांनी आभार मानले. प्रा.संगीता अभ्यंकर यांनी सूत्रसंचालन केले.
याप्रसंगी नंदकुमार मोरे,बाळासाहेब पाटील,खंडेराव जाधव,शशिकांत पाटील, सचिन पाटील,संतोष पाटील,सुनिल चव्हाण, सतिश पाटील,विश्वनाथ पाटसुते,सुभाष कवडे,वसंत पाटील,मनिषा पाटील,अशोक आलगोंडी (बेळगाव),पांडुरंग पुठ्ठेवाड,अमृत तेलंग (नांदेड),अनंत कदम (लातूर),निकेत पावसकर,सरिता पवार (कणकवली),कृष्णा ढिम्बळे-पाटील (पुणे) यांच्यासह अकादमीचे सदस्य,तसेच महाराष्ट्र व गोव्यातील साहित्यिक,व गोवा विद्यापीठातील प्राध्यापक,विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
पंढरीच्या पांडुरंगाची मूर्ती आणि स्वयंपूर्ण गोवा बुक॥
आ.जयंतराव पाटील यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांना पंढरीच्या पांडुरंगाची आकर्षक मूर्ती भेट दिली,तर ना.प्रमोद सावंत यांनी स्वयंपूर्ण गोवा बुक देत आ.पाटील यांचा सन्मान केला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या कार्याचे कौतुक केले.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.